साताऱ्याजवळ असलेल्या उरमोडी धरणाजवळ अस्सल सातारी जेवण जेवण्याचा योग आला. ठोसेघरचा धबधबा आणि परळीचे पुरातन मंदिर पाहून भरपूर दमछाकही झाली होती आणि सपाटून भूकही लागली होती. तेजस फार्मस् मध्ये झणझणीत अस्सल सातारी जेवणावर मस्तपैकी ताव मारला. जेवताना समोरच धरण आणि त्याला लागूनच असलेली पाचुच्या रंगाची,मऊ वेलवेट अंथरल्यासारखी दिसणारी भातशेती.
वाटेत एके ठिकाणी पाऊस लागला मग काय गरमागरम भजी तर हवीच. मजा आली. दीर,जाऊ,छोट्या सोबत एक दिवस निसर्गाच्या
सानिध्यात मस्त एन्जॉय केला.
जेवणाचा बेत:-
भाकरी/पोळी
ठेचा
काराळ्याची चटणी
कांदा लिंबू टोमॅटो काप
कुरडई
झणझणीत भरली वांगी
मटकीची उसळ
म्हाद्या
उडदाचे घुटं
इंद्रायणी देशी तांदुळाचा भात आणि आम्रखंड.
एकदम मस्त होते. बऱ्याच वर्षांनी खाल्ले.
एकदम मस्त होते. बऱ्याच वर्षांनी खाल्ले.
म्हाद्या:-
शेंगदाण्याचे कूट साधारण जाडसर असावे. शेंगदाणा तेलात फोडणी करून त्यात बारीक
चिरलेला कांदा त्यावर लसूण मिरची चा ठेचा / कांदा लसूण मसाला घालून परतून त्यावर
कूट घालून परतून थोडेसे पाणी घालून वाफ आली की मीठ घालून छान परतून घ्यावे. गरमगरम
भाकरी बरोबर खावे.
उडदाचे घुटं:-
उडीद डाळ मूठभर घेऊन स्वच्छ कापडाने पुसून तेलावर बदामी रंगावर भाजून कूकरला
लावावी. मग 3 शिट्या देऊन डाळ थोडी घोटून
घ्यावी.कढईत फोडणी करून त्यात सुकं खोबरं,जीरं,मिरची,लसूण,कोथिंबीर याचं वाटण वाटून
फोडणीवर घालून परतून पाणी आणि मीठ घालावे ...उकळी आली की घोटलेली डाळ घालून परत
छान उकळी येऊ द्यावी. गरम गरम प्यावे. (मिरे,चिंच ऑप्शनल...कोणी कोणी घालतात)
थंडी पावसात नुसतेही प्यायला आवडेल असे.
सौ.श्वेता अनुप साठये
No comments:
Post a Comment