रेषा...

क्षण न क्षण वाट पहात होता... तिची...
सवय झाली होती की
एकट्याने लढायची हिम्मत नव्हती,
म्हणून वाट पहायची?

हिम्मत नाही असं नाही...
पण सोनेपे सुहागा म्हणतात ना, तसं काही तरी...
ती आहे, हीच खूप आधाराची बाब होती...
हे होणार माहीत होतं, तरी...
जीव शेवटपर्यंत गुंतला होता...
पर्यायच नव्हता,
कसं आणि कधी,
घडत गेलं, ह्याचा विचार केलाच नाही,
त्याची गरजही पडली नाही...
पण आज,
जेव्हा तुझा हात हातात घेतल्यावर,
तुझ्या हातावरच्या रेषा नेहमीप्रमाणे,
खूप काही सांगून गेल्या...

स्वतःला सावरत  जेव्हा तुझ्या पायांना नमस्कार केला,
तेव्हा तुझ्या तळपायावरील रेषा (रेषा की भेगा),
आज पहिल्यांदा दिसल्या, कारण... कारण...

आज तू त्या शय्येवर झोपून होतीस...कायमची!
ह्या आधी तुला माझ्याआधी झोपताना पाहिलंच नव्हतं गं...!

तळपायावरील रेषा पाहून, सावरलेला मी,
पुन्हा कोसळलो...

भाळावरील रेषांचे विचार, आत्मसात करून,
करांच्या ओंजळीतील रेषा त्यांना गोंजारत असताना,
तळपायावरील रेषांची फरफट पाहून,
तुझ्यामुळे, माझी आयुष्य रेषा,
किती बलवान आहे, ह्याची खात्री हृदयाला चिरत गेली,
आणि,
तुला अग्नीला समर्पित करताना,
अग्नीच्या रेषांमधल्या धगीमध्ये,
जीवन बहारदार करण्यासाठीचे,
तुझे जळणे एकरूप झाले...!


-आरुशी दाते

No comments:

Post a Comment