रेट्रो टू मेट्रो-अहवाल

यंदाच्या गणेश उत्सवात अनेक विविध छटांचे कार्यक्रम सादर झाले. सादरही झाले आणि श्रोतृवृंद व प्रेक्षकवर्गाने ते साजरेही केले. त्यापैकीच लोकांच्या मनावर ठसा उमटवून गेलेला कार्यक्रम म्हणजेच स्वरनाद ने सादर केलेली गाण्याची मैफिल.

मित्रमंडळाच्या काही सदस्यांनी एकत्र येऊन सुरु झालास्वरनाद’. या स्वरनादाने आजवर अनेक वेगवेगळ्या संकल्पना घेऊन अतिशय उत्तमरीत्या आपल्या बाप्पासमोर सेवा सादर केली आणि श्रोत्यानां मंत्रमुग्ध करून सोडले. यंदाही स्वरनादची टीम आपल्या भेटीला आली ती एक वेगळीच संकल्पना घेऊन. एक अशी संकल्पना जी श्रवणीय तर होतीच पण त्याचबरोबर मेंदूला खाद्यही होती. संकल्पना होती रेट्रो टू मेट्रोची.

आजच्या भाषेत सांगायचं झालं तर या मैफिलीत एक ट्विस्ट होता. गायक,पेटी,तबला,वादक असा नेहमीचा ठेवणीतला कार्यक्रम न करता या कलाकारांनी कराओकेचा ट्विस्ट आणला होता. त्याचप्रमाणे गायक गातात आणि लोक नुसतं ऐकतात हे नेहमीचं समीकरण बदलून श्रोतृवृंदालाही या कार्यक्रमाचा हिस्सा बनवलं आणि कोडी घालून गाणी ओळखण्याचा खेळही चांगलाच रंगला.

गणरायाचे आवाहन करून चिन्मय यांनी स्वरनादचे सूर किती निरागस आहेत हे सर्वाना दाखवून दिले. त्यानंतर ज्योती यांनी आईये मेहेरबाअसं म्हणत प्रत्येकाला एका वेगळ्याच काळात नेलं. त्या काळात रमतो न रमतो तोच केदार यांनी जबसे तेरे नैना,मेरे नैनोसे लागे रेम्हणत प्रेमातील डोळ्यांचं महत्व आम्हाला सांगितलं. खरं तर कुठलीच मैफिल पावसाच्या गाण्यांशिवाय पूर्ण होत नाही. या नियमाला धरूनच लीना व क्षितिज यांनी आला आला वाराम्हणत येणाऱ्या पावसाची चाहूल दिली. नंतर योगेशनी घातलेल्या पहेली मधून परिणीतामधील जॅझ स्टाईलचं पहेली गाणं म्हणून आभाने सर्वांचाच मनापासून वन्समोअर मिळवला.

त्यानंतर पूर्वीच्या काळी हिरो आपल्या हिरोईनला कसं पटवायचा हे योगेश यांनी ये जवानी है दिवानीया गाण्यातून आम्हा सर्वांपर्यंत पोचवलं. अनायसे प्रेमगीतं चालू होती त्यातच केदार व क्षितिजा यांनी सांग ना रे मनाम्हणत घाबऱ्या जीवाचे मनाला प्रश्न विचारले. मग याच धाटणीच्या गाण्यामध्ये चिन्मयने सादर केलेलं तुमने मुझे देखातर केदार आणि लीना यांनी गायलेलं सपनेमें मिलती हैही गाणी खरच खूप श्रवणीय होती. तर जिया जलेंगाणं म्हणून क्षितिजाने प्रेमाची एक दुसरी बाजू दाखवून दिली.

त्यानंतर लीना,योगेश यांनी सुरेल असं ये रात भीगी भीगीहे गाणं सादर केलं. त्यानंतर ज्योती यांच्या सदाबहार लावणीने तर एक वेगळाच माहौल निर्माण केला आणि शिट्ट्यांच्या जोरावर वन्समोअर घेतला. ‘इशारो इशारो में म्हणत चिन्मय व क्षितिजा या जोडीने सर्वाना जागेवर खिळवून ठेवले तर आभा आणि ज्योती यांनी भरे नैनाम्हणत सर्वांच्याच डोळ्यांच्या कडा ओल्या केल्या. ‘यूँ ही चला चल राहीम्हणत योगेश,केदार, चिन्मय आम्हाला आयुष्याच्या सफरीवर घेऊन गेले,तर तिथून परत आल्यावर लीना यांनी 'दिलबर दिलसे प्यारे दिलबर' म्हणत आमचे स्वागत केले.

या संपूर्ण मैफिलीचा शिरोमणी ठरला तो म्हणजे केदार यांनी गायलेले अभि मुझमे कही बाकी थोडीसी है जिंदगीहे प्रत्येकालाच इमोशनल करून सोडणार गीत. सभागृहातील प्रत्येक माणूस डोळे बंद करून मनापासून हे गाणं ऐकत होता आणि हीच खरी त्या गाण्याची पावती होती आणि मग याच शांत वातावरणात मग माउली माउलीअसा गजर झाला. गणरायाला वंदन करून सुरु झालेली मैफिल पांडुरंगाच्या चरणी येऊन संपली. कधी जुनी,कधी नवी,कधी प्रेमगीत तर कधी भावगीत अशी रोलर कोस्टर राईड आम्ही सर्वानीच अनुभवली आणि सर्वानाच ती आवडली.



कोड्यांची उत्तर देताना बॅक बेंचर्सनी तर खूपच धमाल केली. यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे प्रत्येक पिढीतील व्यक्तीने आपापल्या काळातील गाणी अगदी अचूक ओळखली आणि याहीमुळे मैफिलीला चांगलीच रंगत आली. गायक कलाकार आणि श्रोतृवृंद यांच्या सहभागाने रंगलेली,सजलेली मैफिल सर्वांचीच संध्याकाळ समृद्ध करून गेली.

स्वरनाद कार्यक्रमाची लिंक : स्वरनाद

  ऍड. मधुरा ओगले-देव



No comments:

Post a Comment