ऋणानुबंध

कै. ती.मावशी,
सप्रेम नमस्कार,

किती वर्षं झाली आपल्याला प्रत्यक्ष भेटून, पण खरं तर त्याची आवश्यकताच कधी भासली नाही. कारण तुम्हाला मी विसरूच नाही शकत. १९९६ साली मला नोकरी निमित्ताने मुंबईत यावं लागलं. प्रश्न राहण्याचा होता आणि पारल्यात तुमच्याशिवाय उत्तम पर्याय नव्हता. पार्लेश्वर सोसायटी मध्ये तुम्ही मुलींना माफक दरात PG म्हणून ठेवत होता. माफक अटींची मान्यता झाल्यावर मी दोन वर्षात तुमच्या घराचा हिस्सा कधी आणि कशी झाले माझे मलाच आठवत नाही.


आज माझ्या संसारात मी रमले आहे. तुमच्याकडून छोट्या पण महत्त्वाच्या व्यावहारिक गोष्टींचे माझ्यावर नकळत संस्कार होत गेले. स्वयंपाकातली माझी आवड हास्यास्पद होती. प्रत्येक पदार्थाच्या चवीबद्दल तुम्ही आग्रही असायचा. त्याचा बोध आता होतोमी रहायला आल्याच्या वर्षीच तुम्ही माझी खाण्याची आवड ओळखून पाणीपुरीचा बेत आखलात. आईला पण पुण्याहून बोलावलं. मी ऑफिसातुन येईपर्यंत मजल्यावरच्या सर्वांना बोलवून ठेवले होते. माझ्या आयुष्यतला सर्वात संस्मरणीय वाढदिवस होता तो. खाण्याचे किती लाड पुरवलेत तुम्ही. खरं तर तुमची paying guest होते मी. पण मला मुंबईत भेटायला आलेल्या प्रत्येकाला तुम्ही घरी ठेऊन घेतलंय. माझे घरचे, मैत्रिणीएवढंच कशाला माझं लग्न ठरवताना दाखवण्याचा कार्यक्रमपण तिथे झालाय. त्यांच्यासाठी फराळाचे पदार्थ करून ठेवायचात. मोठ्या थाटात केळवण केलंत, माझ्या सासरी आणि माहेरी राहून गेलात. जावई म्हणून किती लाड केलेत सुमेधचे. नंतर नात म्हणून तन्वीचे. तुम्हाला मी भेटायला येणार असा फोन केला की तुम्ही गॅलरीत वाट पहात उभे राहायचात. आता पार्लेश्वरात आले की नजर घराकडे जाते. तुम्ही नसता गॅलरीत, पण तुमचे मार्गदर्शन मला नेहमी प्रेरित करते. तुमचे आशीर्वाद सदैव माझ्यासोबत राहतीलच अशी खात्री आहे माझी.

तुमची अंजू

- अंजली गाडगीळ



No comments:

Post a Comment