सैनिकाच्या मनातलं

 

 


"तुला आमचा अभिमान वाटतो का रे?" मी जरा कचरतच अमितला विचारलं.

अमित आमचा शाळेतला मित्र. आधीपासूनच अतिशय स्मार्ट, बिनधास्त आणि तेवढाच संवेदनशीलही. आम्ही सगळे जेव्हा सायन्स, कॉमर्स, आर्टच्या त्रिकोणात अडकलो होतो तेव्हा हा NDA एन्ट्रन्सची तयारी करत होता. मेजर अमित गोखले. आजही तो सुट्टीत घरी आला की जुन्या दोस्तांना भेटतोच. आज सगळे त्याच्याच घरी भेटलो होतो. आम्हाला त्याचा किती अभिमान वाटतो हे त्याला आम्ही अनेक वेळा सांगतो. पण आज का कुणास ठाऊक, मला हे त्याला विचारावंसं वाटलं.

 

"म्हणजे काय? तुम्ही तर माझे दोस्त आहात. आपापल्या क्षेत्रात उत्तम प्रगती करताय. Of course I am proud of you. काल आई म्हणत होती, अनिकेतने जॉब सोडून स्वतःची स्टार्टअप सुरु केलीये. आणि एका वर्षात पन्नास एम्प्लॉईज़ झालेत. अवॉर्डही जाहीर झालंय म्हणे त्याला मुख्यमंत्र्यांतर्फे. किती अभिमानाची गोष्ट आहे ही. I must meet him."

 

"तसं नाही रे. आमचा म्हणजे एकंदरच civilians चा, ज्यांचं तुम्ही संरक्षण करता."

 


"हो वाटतो ना. आपले खेळाडू जेव्हा देशासाठी मेडल्स, ट्रॉफी घेऊन येतात तेव्हा वाटतो. आपले शास्त्रज्ञ आणि इंजिनियर्स जेव्हा मंगलयान सारखं अशक्यप्राय प्रोजेक्ट रेकॉर्ड वेळेत यशस्वीपणे पार पाडतात, किंवा एकशे चार सॅटेलाईट्स एका स्पेस वेहिकल मधून लाँच करायचा विक्रम करतात तेव्हा. डॉक्टर्स अगदी गुंतागुंतीच्या केसमध्ये organ transplant करून लोकांना जीवदान देतात तेव्हा. मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या प्रमुख पदावर भारतीय निवडले जातात तेव्हा... अशी अनेक उदाहरणं आहेत. थोडक्यात सांगायचं तर, जेव्हा भारतीय नागरिक आपापल्या क्षेत्रात उच्च कामगिरी बजावतात तेव्हा निश्चितच अभिमान वाटतो... पण... तरीही बऱ्याचदा काही गोष्टींची चीड ही येते."

"कोणत्या?"

"विषय निघालाच आहे तर मी जरा स्पष्टच बोलतो. चीड येण्याचं पहिलं कारण हे की आपली एकूण क्षमता पाहता मी दिलेली उदाहरणं खूपच कमी आहेत. आणि ह्याचं कारण आहे आपली सुमार, सामान्य दर्जा चालवून घ्यायची वृत्ती. आपल्या कामात आणि आपल्यासाठी केलेल्या दुसऱ्यांच्या कामातही. जे काम कराल ते असं करा की नंतर वाटता कामा नये की यार अजून एक संधी मिळाली असती तर आपण याहून चांगलं केलं असतं. आम्हाला हे कायम सांगितलं जातं की this is the only chance. Give your best. आम्हाला दुसरी संधी दिली जात नाही."

 "हे खरंच तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे."

 "अजून एक अस्वस्थ करणारं कारण सांगू? आम्ही जेव्हा ड्युटीवर असतो ना, तेव्हा आम्हाला एकच सरहद्द दिसते. आपल्या देशाची सरहद्द. त्या सरहद्दीच्या आतले सगळे आपले एवढंच आम्हाला कळतं. पण इथे आत आल्यावर अनेक सीमारेषा आम्हाला दिसतात. आपणच तयार केलेल्या. आपल्यालाच विभागणाऱ्या. त्या राखण्याचा दावा करणारी, स्वतःला सैनिक म्हणवणारी, काही मूठभर माणसं. काळजीही वाटते, की ह्या सीमारेषांची आणि त्यांच्या भ्याड सैनिकांची संख्या वाढतेय. लक्षात ठेवा. there is only one border and we are the only army is protecting it. जेव्हा ह्या आतल्या कृत्रिम सीमारेषा नाहीश्या होतील तेव्हाच खऱ्या अर्थाने देशाच्या प्रगतीला वेग येईल. आणि तुला आज जी शंका आली ती कधीच येणार नाही."

खरंच, आपल्या जवानांना आपला अभिमान वाटेल असं काहीतरी करून दाखवायची वेळ आली आहे.

जयहिंद!


मानस


No comments:

Post a Comment