सैर कीटक विश्वाची

श्री. आलोक शेवडे (बुलढाणा - M.A. इंग्लिश - B.Ed.) यांचा २० जून २०२१ रोजी मित्रमंडळ बेंगळुरू आयोजित 'सैर कीटक विश्वाची' - Joy at finger tips - हा कीटकांच्या छायाचित्रणाशी संबंधित सादरीकरणाचा कार्यक्रम अतिशय उत्सुकतेने पाहिला.


२००७ पासून त्यांनी हा छंद जोपासला आहे. या छायाचित्रणाच्या कौशल्यासाठी त्यांची नाव नोंदणी २०११-१२ मध्ये लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये झाली आहे तसेच २०१८ मध्ये मोस्ट प्रेस्टीजीयस इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांना गौरविण्यात आले आहे. आत्तापर्यंत ३२५ कीटक प्रजातींचे त्यांनी फोटो काढले आहेत आणि २२१ पेक्षाही जास्त सादरीकरणं पूर्ण महाराष्ट्रात झाली आहेत. अनेक नामवंत व्यक्तींनी जसे की शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर, डॉक्टर राकेश कुमार , चित्रपट दिग्दर्शक राजदत्ता,अभिनेते मोहन जोशी यांनी या सादरीकरणाच्या शैक्षणिक मूल्यांसाठी त्यांचे कौतुक केले आहे.


 

कीटकांच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन जनतेला घडवणं हा श्री आलोक यांचा या सादरीकरणाचा हेतू आहे. एखादा कीटक मोठ्या पडद्यावर जेव्हा आपल्या व्हिडिओद्वारे स्वतःचे एक्स्प्रेशन सादर करतो तेव्हा तो एक कीटक राहत नाही तर ते एक व्यक्तिमत्व म्हणून आपल्या समोर येत असतं असं ते म्हणतात. कीटकांचे सौंदर्य, कीटकांचे व्यक्तिमत्त्व, कीटकांचा स्वभाव हे कीटकशास्त्रामध्ये अस्पर्शित असणारे विषय या सादरीकरणामधे दिसून येतात.

याचे तीन भाग आहेत. पहिला Still Photography म्हणजे त्यात फोटो कशाचा आहे, त्या कीटकाचे सौंदर्य काय आहे आणि फोटो काढताना श्री आलोक यांची काय भूमिका होती हे दाखवलं जातं. दुसरा व्हिडिओ त्यात कीटकांचे स्वभाव आणि मूड दाखवणारे व्हिडिओ आहेत आणि तिसरा प्रश्नोत्तरांचा.


कीटकांवर स्वरचित अशा अतिशय सुंदर श्लोकाने या सादरीकरणाची सुरुवात ते करतात. कीटकांचे छायाचित्रण, त्यांचा अभ्यास हे सर्व ही वनदेवता घडवून आणत आहे अशी त्यांची भक्तीपूर्ण भावना आहे.



या सादरीकरणामध्ये सुरुवातीला एशियन जायंट स्पायडर म्हणजे सिग्नेचर स्पायडर दाखवून ते आपल्याला अष्टभुजा देवीचे दर्शन घडवतात. खरंच देवीचं रूप दिसतं..ही जी कीटकांकडे बघण्याची नवी दृष्टी आहे ती अतिशय वेगळं काहीतरी देऊन जाते. कीटकांचे जिद्द, कीटकांचे अप्रतिम सौंदर्य दाखवताना ते फोटोग्राफी मधील तांत्रिक गोष्टी सांगून जातात. ज्याला आपण एक किडा समजतो, तो नागतोडा किती सुंदर दिसतो - डोळे, अंगावरचे ठिपके किती सुंदर दिसतात हे जाणवते. 'अहाहा काय अप्रतिम कलाकृती आहे निसर्गाची' हे समजून येतं. यानंतर प्रिन्स ऑफ ग्रासहॉप हा रूईच्या पानावरती जगणारा विषारी परंतु माळढोकचा आवडतं खाद्य असलेला असा विविधरंगी आणि दुर्मिळ होत चाललेल्या नागतोड्याचं दर्शन होतं. हा रुईचे झाड काढून टाकल्यामुळे दुर्मिळ होत चालला आहे.



प्रत्येक वेळी श्री आलोक ही जाणीव करून देतात की कीटक हा या निसर्ग साखळी मधला किती महत्वाचा दुवा आहे. असे ६५ नाकतोड्यांच्या प्रजातींचे त्यांच्याकडे फोटो आहेत. असे स्वच्छंदपणे जगणारे कीटक, जितकं आयुष्य असेल ते आनंदाने जगतात आणि निसर्गाने परत बोलावलं की मृत्यूसुद्धा सहजपणे स्वीकारतात. नंतर आपल्याला camoflauge होणारा कीटक बघताना अचंबित व्हायला होतं. खरं तर कळतच नाही की तो कुठे आहे. ही जी mimic होण्याची कला त्या कीटकांकडे आहे ती अजून मानवाकडे नाही. त्यानंतर येते ती काळीपिवळी विषारी गोम. मग अनेक प्रकारचे स्पायडर त्यांची सुंदरता सांगून जातात.

एक जम्पिंग स्पायडरचा सहा डोळे असणारा फोटो बघताना पहिल्यांदाच कळते की एक कोळी सुद्धा किती गोंडस दिसू शकतो. फोटो काढण्याचे तंत्र, डी फोकस कसं करायचं हे श्री आलोक सांगून जातात. मग येतात अळ्या म्हणजे कॅटरपिलर. या अळ्यांचा डिफेन्स मेकॅनिझम बघताना खूपच आश्चर्य वाटते. किती सुंदर दिसतात या अळ्या, हे या प्रेझेंटेशन मधे कळून येते

निसर्गाचे अद्भुत दर्शन होत असतं क्षणाक्षणाला. नंतर येतात ती रानफुलं, फुलपाखरू, Moth. यांची संरक्षण रचना बघून थक्क होतो. खरंच जसजसे आपण पुढे जातो तसतसं मंत्रमुग्ध होऊन जातो आणि एका वेगळ्याच जगामध्ये आपण विहरत आहोत याचा साक्षात्कार होतो.


भुंगा, Lichi shied bug च्या अंड्यापासून मोठे होईपर्यंतच्या सर्व स्थिती, त्यांचं वेष बदलणं अर्थात molting याची माहिती होते. अनेक Beetles, termite, vasps, Robberfly, चतुर , preying mantis, Violin preying mantis यांची विविधरंगी रूपं आपल्यासमोर येतात. कोळ्याने विणलेल्या जाळ्यातून भारताचा नकाशा आणि अखंड पृथ्वीचा गोल यांची concept फोटोग्राफी बघताना त्यातून निसर्ग देवतेने श्री. आलोक यांना दिलेला आशीर्वाद बघून आपण थक्क होतो. खरं तर निसर्ग आपल्याशी संवाद साधत असतो, आपण तेवढी संवेदनशीलता जपायला हवी.



इथे Still Photography चा भाग संपतो. नंतर व्हिडिओ दाखवले जातात. त्यात अळ्या तसेच लाल मुंग्या, माशी, अंडी देणारा ब्रिंजल beetle, जाळं विणणारा कोळी त्यात अडकलेला नागतोडा , Rhino beetle, स्पायडरचं मातृत्व दर्शन आणि अळ्यांचा लाव्हा पाहण्यात आपलं अनुभवविश्व समृद्ध होत जातं आणि श्री. आलोक यांच्याप्रमाणे आपणही या कीटकांच्या प्रेमात पडायला लागतो.


यानंतरचा प्रश्नोत्तरांचा भाग आपलं ज्ञान नक्कीच वाढवतो. प्रश्नोत्तरात मानवी स्वभाव आणि कीटकांची वर्तणूक यांची तुलना करताना ते कीटकांना अधिक सद्गुणी म्हणतात. आत्मसंयम हा एक कीटकांचा महत्त्वाचा गुण सांगताना, एकही मानवी दुर्गुण कीटकांमध्ये नाही असेही आवर्जून सांगतात. बहिणीने दिलेल्या कॅमेरातून प्रेरणा मिळून त्यांनी हा छंद जोपासला असे सांगत ते बहिणीविषयी कृतज्ञता व्यक्त करतात


या छंदासाठी त्यांनी आता स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. आपली व्हायब्रेशन्स कीटकांना नक्कीच पोहोचतात आणि त्यामुळे जर प्रेमाने आपण त्यांच्या जवळ आलो तर कीटक आपल्याला कधीच त्रास देत नाहीत. त्यामुळेच एकदाही असा कीटकाचा दंश त्यांना झालेला नाही. तसेच जितका माणूस आहे निसर्गासाठी हानिकारक आहे तितके कीटक हे हानिकारक नाहीत, हा एक आत्मचिंतनाचा मुद्दा सुद्धा ते मांडतात. तु आणि कीटकांचा संबंध ऐकताना तर आपली जिज्ञासा खूप वाढते. असं वाटतं आपल्याला अजून खूप ऐकायचं, पाहायचं आहे. माहितीचं भांडार आहे श्री आलोक यांच्याकडे जणू.


खरोखरच अशी रंजक सफर करताना आपण अगदी भारावून जातो. आता ही आणि अजूनही अनेक रंजक सफरी मोठ्या पडद्यावर बघायला मिळो ही ईश्वराकडे प्रार्थना.

 सैर कीटक विश्वाची' - Joy at finger tips हा कार्यक्रम बघण्यासाठी लिंक क्लिक करा 

 



कल्पना नंदे


 


No comments:

Post a Comment