समर शेष है

 


समर शेष है, नहीं पाप का भागी केवल व्याध

जो तटस्थ है समय लिखेगा उनके भी अपराध

 दिनकर.

सुप्रसिद्ध कवी रामधारी सिंह ‘दिनकर’ यांनी लिहिलेल्या वरील ओळी वाचनात आल्या आणि विचारचक्र सुरू झाले. वास्तविक पाहता दिनकरजींनी 'समर शेष है ही कविता स्वातंत्र्यप्राप्ती नंतर काही वर्षांनी त्या वेळच्या परिस्थितीवर भाष्य करताना लिहिली होती. अनेक हुतात्म्यांनी प्राणाहुती देऊन मिळवलेल्या स्वातंत्र्याचे आपण योग्य प्रकारे जतन करत आहोत का देशासाठी एक सामान्य नागरिक म्हणून आपण आपली कर्तव्ये बजावत आहोत का असा खडा सवाल त्यांनी या कवितेतून केला होता.

दिनकरजी म्हणतात युद्ध अजुन संपलेले नाही. प्रत्यक्ष ब्रिटिशांशी युद्ध संपले असले तरी गरीबी, निरक्षरता, बालविवाह, बेरोजगारी, अंधश्रद्धा, जातीव्यवस्था इत्यादी शत्रूंशी आपल्याला आता युद्ध करावयाचे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या गोष्टीना प्रत्यक्षपणे जबाबदार असणारेच फक्त पापी नाहीत तर तटस्थपणे हे पहात रहाणारे देखील तितकेच अपराधी आहेत. चुकीच्या गोष्टीचा, अन्यायाचा विरोध न करणे म्हणजे अप्रत्यक्षपणे त्या पापात सहभागी असणे होय.

पुरातन काळापासून हा तटस्थपणा चालत आलेला आपल्याला दिसतो. जसे रामायण काळात सीता निर्दोष आहे, पवित्र आहे हे माहिती असताना देखील केवळ एका धोब्याच्या सांगण्यावरून रामाने तिला स्वत:च्या आयुष्यातून बेदखल केले, तेव्हा तत्कालीन थोर ऋषी-मुनी, बाकी सारा समाज तटस्थ राहिला. कोणी ही रामाला तुझे चुकते आहे हे सांगितले नाही, किंवा सीतेला पाठिंबा दर्शविला नाही. तसेच महाभारतात द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगी सभेत उपस्थित भीष्म, द्रोण आदी विभूतिंनी तटस्थपणाच अंगिकारला होता, ज्याचा परिणाम म्हणून कुरूक्षेत्राचे युद्ध लादले गेले आणि आर्यावर्तातील लाखों योद्ध्यांचा संहार झाला.

मंडळी, तटस्थ राहणे म्हणजे देखील अपराध आहे हे दिनकरजींचे विचार आज ही तितकेच संयुक्तिक आहेत. कसे ते बघूया. आपल्यापैकी किती जण समोर एखादी चुकीची गोष्ट घडत असताना तिचा विरोध करतात? समोरच्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात? किंवा सत्याच्या बाजूने उभे राहतात? जाऊदे, फारच मोठ्या गोष्टी झाल्या या.

एक साधंसं उदाहरण घेऊया. रस्त्यावरून जाताना आपल्यासमोर एखादा अपघात झाला तर आपल्यापैकी कितीजण तिथे थांबून चूक कोणाची आहे ते पाहतात किंवा गरजेप्रमाणे अपघातग्रस्त व्यक्तिला मदत करतात? बहुतेकदा आपण गडबडीत असतो, अर्थात आपले ही कुठेतरी महत्वाचे काम असते, त्यामुळे पटकन ट्रॅफिकमधून पुढे कसे जाता येईल हेच आपण पाह्तो आणि घटनेकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष करतो. आपली सद्सद्विवेकबुद्धि (जागृत असेल तर) आपल्याला कर्तव्याची जाणीव देत असते. पण व्यवहार त्यापेक्षा अधिक ताकतवान असतो, जो आपल्याला पुढे ढकलतो आणि आपणही चालायचंच म्हणून सोडून देतो. हेच ते तटस्थ रहाणे आणि अपराधात सामील होणे. पण ज्यांच्यावर परिस्थिती ओढवलेली असते त्यांच्या आयुष्यात किती बरं उलथापालथ होत असेल?

वरचेवर लोकांमधेमला काय त्याचे?’ ही भावना बळावत चालली आहे, संवेदनशीलता, माणुसकी कमी होत आहे असे आपण सर्रास म्हणतो. पण मी एक व्यक्ती म्हणून किती जागरूक आहे? ज्या ज्या प्रसंगी शक्य तेव्हा मी लोकांची मदत करतो का? स्वत:चा फायदा नसतानाही कोणासाठी लढतो का हा ही विचार करणे आवश्यक आहे.

भूकंप, पूर, वादळे, बॉम्बस्फोट अशा अनेक प्रसंगी आपदग्रस्त लोकांसाठी मदतीचे लाखो हात पुढे येतात. आपणही ‌बर्‍याचदा प्रासंगिक तयार झालेल्या एखाद्या फंडात देणगी देऊन मोकळे होतो. पण नुसती देणगी देऊन आपली सामाजिक जबाबदारी संपत नाही. दुर्घटना होऊन गेल्यावर तिचे पडसाद कित्येक वर्ष मागे उरतात. त्यावेळी ही लोकांना मदतीची गरज असते. तेव्हा आपण करतो का मदत त्यांना ? काळाच्या ओघात आपण अशा घटना विसरूनही जातो. प्रत्येक वेळी आपण स्वत: जाऊन तिथे मदत करणे निश्चितच अपेक्षित नाही. पण आपल्या रोजच्या आयुष्यात, जिथे कुठे आपण राहतो त्या परिसरात गरजवंताला मदत करणे हे तर आपल्या हातात आहे, होय ना

कर्मण्येवाधिकारस्य मां फलेषु कदाचनहे आचरणात आणणे कठिण आहे. त्यातून आपण सामान्य संसारी माणसे. कोणतेही काम आपण काहीतरी लाभ असल्याशिवाय करत नाही. तरीही समोरच्याला शक्य ती मदत करणे, जमलंच तर उपलब्ध साधनांचा वापर करून अन्यायाला वाचा फोडणे हे आपल्याला नक्कीच शक्य आहे. कारण असे न करणे म्हणजेच पापात भागीदार होणे आणि पर्यायाने समाजाची, देशाची प्रगती खुंटवणे. चला तर मग, कवी दिनकरांनी लक्षात आणून दिलेला आपला कातडीबचाऊ तटस्थपणा सोडून देऊन प्रत्यक्ष कामाला लागू या.


मानसी नाईक



 

No comments:

Post a Comment