समुपदेशन-९ तणाव आणि मी -भाग १



आज 'तणाव' प्रत्येकाच्या शब्दकोशातील असलेला परवलीचा शब्द. त्यावर वाचनात आलेले अनेक लेख, माहिती अजून न संपणारी. तणाव हा एक अनुभव आहे. माणसाला स्वतःच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याची भावना !!!!!.जेंव्हा एखादे काम आपल्याला ठराविक वेळेत संपवायचे आहे, असा तणाव काम संपेपर्यंत असतो, थोडा वेळ टिकतो

काहीजण खूप कामाची जबाबदारी आपल्यावर घेतात, पण ती पूर्ण करताना त्यांना त्रास होतो. अशी परिस्थिती वारंवार उद्भवते. काहीजण प्रत्येक बाबतीत काळजी/चिंता (anxiety/worry) करतात, त्यांनाही तणाव जाणवतो
काही वेळेस जेंव्हा अवघड/कठीण परिस्थितीला बराच काळ सामोरे जाताना एखाद्याची सहनशक्ती संपते. संकटातून बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. असा तणाव जर दुर्लक्षित केला गेला तर मात्र घातक असतो. कारण यात प्रकृतीला शारीरिक/मानसिक धोका उत्पन्न होतो. कायम स्वरूपाचा आजार मागे लागण्याची शक्यता असते. तणावची सकारात्मक बाजू अशी की माणसाच्या आतील सुप्त गुणांना बाहेर यायला वाव मिळतो.

श्रीकांत २६ वर्षीय IT क्षेत्रात नोकरी करणारा तरुण,त्याच्या बरोबरचे सहकारी बरेच दिवस त्याच्या कामात होणाऱ्या चुका, चिडचिड त्याच्या लक्षात आणून द्यायचा प्रयत्न करत होते. काही दिवस कामातून ब्रेक घे, असेही सुचवले. पण तो काहीतरी कारणे देऊन टाळत राहिला. एक दिवस ऑफिसमध्ये त्याला चक्कर आली. डॉक्टरांनी तात्पुरती औषध योजना करून एकदा पूर्ण हेल्थ चेक करून घ्या असा सांगितले. सगळ्या टेस्टचे रिपोर्ट पूर्णपणे नॉर्मल आले होते. त्याचे टेन्शन कमी झाले, तरी चक्कर कशाने आली समजले नाही. शेवटी 'तणाव' हे निदान झाले. डॉक्टरांनी त्याला समुपदेशन घेण्याचा सल्ला दिला.

समुपदेशनाच्या प्रक्रियेत त्याचे ऑफीसला जाऊन/येऊन होणारे दीड तासाचे ड्रायव्हिंग हे त्रासदायी असून त्याचा ताण आहे असं समजलं. त्यानी मित्रांनी सांगितलेले सर्व उपाय करून पाहिले तरी ड्रायव्हिंगचा ताण काही कमी झाला नाही. याचे कारण असे आहे की प्रत्येक व्यक्तीची  परिस्थिती हाताळण्याची, तिला सामोरे जाण्याची पद्धत/ क्षमता वेगळी असते.

'तणाव' हा व्यक्तिसापेक्ष (individual) आहे. तणाव ही शरीराने दिलेली प्रतिक्रिया (रिस्पॉन्स) आहे. शरीर जेंव्हा कुवतीपेक्षा जास्त काम करते, तेव्हा त्याचा ताण पडतो. सतत पडणाऱ्या ताणामुळे तुमची प्रतिकार शक्ती सतत कार्यरत राहते. (Immune system). शरीराला ही झीज भरून काढायला पुरेसा वेळ मिळत नाही. जेंव्हा झोप, व्यायाम आणि आहार यांचे गणित जुळते त्यावेळी तणाव कमी असतो.

तणावाची नेमकी कारणे काय असावीत याचा विचार केला तर -स्वतः चे व्यक्तिमत्व - स्वभाव, आयुष्यात आलेले कटू अनुभव, शिक्षण, आर्थिक परिस्थिती, पालकत्व, अनुवंशिकता, शारीरिक आणि मानसिक प्रकृती, वय, धर्म, संस्कृती, इतर लोकांपेक्षा वेगळे असणारे गुणविशेष, कुटुंब व्यवस्था - एकत्र/विभक्त कुटुंब, कार्यक्षेत्र, कामाचे स्वरूप, वेळ, कौटुंबिक, आर्थिक आणि सामाजिक जबाबदारी, आजूबाजूचे वातावरण - हवा/पाणी/प्रदूषण.... अशी अनेक असू शकतात. समुपदेशनामुळे तणावाचे नेमके कारण सापडायला मदत होते.
तणावावर नियंत्रण ठेवले नाही तर त्याचे परिणाम व्यक्तीच्या आहार, आचार, विचार सर्वांवर प्रभावित झालेले दिसतात. हृदयरोग आणि संबंधित आजार, अल्सर, कमी होत जाणारा कामातील उत्साह, कामावर लक्ष केंद्रित न करता येणे, कामातील वारंवार होणाऱ्या चुका, सतत होणारी चिडचिड, ठरलेल्या कामात होणारी दिरंगाई, स्वतः;बद्दल निर्माण होणारी साशंकता (self-doubt ) नकारात्मकतेकडे झुकणारा दृष्टीकोन, त्वचेचे रोग असे परिणाम होऊ शकतात. काही वेळा तणावाच्या दृश्य परिणामावर काम केले जाते. पण कारण तसेच राहून जाते. यासाठी समुपदेशन हा पर्याय प्रभावी तसेच परिणामकारक ठरू शकतो.

बऱ्याच वेळा असे लक्षात आले आहे की परिणाम दिसेपर्यंत आपण अनामिक तणावाखाली आहोत याची कल्पना असत नाही. सकृतदर्शनी आपलं चांगलं चाललंय असे वाटत असते. त्यामुळे आपण इतरांनी केलेल्या सूचना, आपल्यात लक्षात येण्याइतपत झालेले बदल याकडे दुर्लक्ष न करता, त्यावर विचार करायला हवा. आपल्या नातेवाईक, सहकारी यांच्याशी संबंधांमध्ये दरी निर्माण होत नाही ना? हे असे काही ठोकताळे आहेत की ज्यामुळे आपण तणावात आहोत याची आगाऊ सूचना मिळू शकते.

तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जगण्याचा वेग नियंत्रित करणे हे फार मोठे आव्हान आहे. या वेगामुळे जीवनशैली बदलणे हे ओघानेच आले. पण आपल्याला त्यातही तणावमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करणे प्राप्त आहे. उपाय/पर्याय निश्चितच आहेत. त्याच्या विषयी वाचूया पुढील भागात.....



डॉ.पूर्वा रानडे


No comments:

Post a Comment