समुपदेशन - काळाची गरज- भाग 3


नीलिमा - नमस्ते डॉक्टर
डॉक्टर - बस नीलिमा. कशी आहेस? सौरभ कसा आहे?
नीलिमा - मला पूर्वीचा सौरभ हळू हळू परत मिळतोय. खूपच छान वाटतंय. मला समुपदेशन ही संकल्पना आणि त्याचं महत्त्व सर्वांपर्यंत पोचणं जरुरी वाटतं.
डॉक्टर - मागच्या भागात समुपदेशनाचे प्रकार पहिले. आज आपण समुपदेशनाचं महत्त्व यावर सविस्तर बोलू या. तसं पाहिलं तर समुपदेशन हे अगदी सर्वांसाठी आहे. किंबहुना ती काळाची गरज आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.

बदल हा निसर्गाचा नियम. सभोवतालच्या परीस्थितीशी मिळतंजुळतं घेणं हा एक निर्णय. "आमच्या वेळी असं नव्हतं" असं वाक्य जेव्हा कानावर पडतं तेव्हा समजावं की काळ बदलतो आहे याचा हा पुरावा आहे. नवीन तंत्रज्ञान, विज्ञान क्षेत्रातील प्रगती, आजूबाजूचं वातावरण, बदलणारी सामाजिक परिस्थिती याचा वेग पाहता त्याच्या बरोबरीने चालताना आपल्याला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं.

हीच केस बघ. 
वर्षा (नाव बदलून) वय-२२. एका छोट्या गावात राहणारी मुलगी. विलक्षण जिद्दीने शिक्षण पूर्ण करून शहरात एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळवली. आई वडील पण खूप खुश झाले. वर्षाची तयारी अगदी जोशात चालू होती. सगळंच नवीन-शहर, वातावरण, मैत्रिणी, स्वतंत्र राहायचं हे सगळं अनुभवायला मिळणार ह्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर अगदी ओसंडून वाहत होता. 
नव्या नवलाईची पहिली तीन-चार वर्षं संपली. नंतर तिला जाणवायला लागलं की कामात, जगण्यात, रोजचं जेवण-खाणं यात तोच तो पणा येऊ लागला आहे. दिवस सुरु होऊन संपतो कधी हे ही ळत नसे. तिला एकटेपणा जाणवू लागला. चिडचिड वाढू लागली. घरून फोन आला तरी बोलायला नको वाटायचं

तिलाही नेमकं समजत  नव्हतं आपल्याला नेमकं काय होतंय ? तिच्या कंपनीच्या HRनी समुपदेशन घेऊन बघ असा सल्ला दिला. पहिल्या एकदोन सिटिंगमध्ये तिची प्राथमिक माहिती समजल्यावर लक्षात आलं की नवीन वातावरणात adjust होण्यासाठी जी मानसिक तयारी लागते ती कुठेतरी कमी पडत होती. तिला जीवन सुकर कसं बनावता येऊ शकतं यासाठी वेळेचं नियोजन कसं करता येऊ शकेल याची कल्पना दिली. ती आपल्या hobbies /interests पूर्ण विसरली होती. फक्त काम काम काम... कारण आपण कुठे कमी पडलो तर?? ही एक अनामिक भीती. पण आता सगळं ओके चाललं आहे.

काही वेळा असंही होतं की प्रयत्न करूनही पाहिजे तसं यश मिळत नाही किंवा गोष्टी हाताबाहेर जाऊ लागतात, तेव्हा आपल्याला नेमकं काय, कशामुळे होतंय, आधी मला असं कधी झालं नव्हतं, हे सगळं माझ्याच बाबतीत का? नेमकं कुठे चुकतंय? असे अनेक प्रश्न पडतात आणि अनुत्तरीत राहतात. या मानसिक तणावांचा परिणाम शेवटी झोप, जेवण यावर होतोच; अस्वस्थ, बेचैन वाटणं , मन कशात न रमणे असा होतो. प्रत्येकाची तणाव सहन करण्याची शारीरिक/ मानसिक क्षमता वेगवेगळी असते. हे जरी खरं असलं तरी बरेच काळ अशी स्थिती राहिली तर धोकादायक ठरू शकतं 
अशा वेळी समुपदेशनाची प्रक्रिया फारच उपयोगी पडू शकते. कारण ती एका सुरक्षित वातावरणात केली जाते. कुठलीही गोष्ट अगदी उघडपणे तुम्ही बोलू शकता. याचे कारण ती फक्त समुपदेशक आणि client यांच्यातचं गोपनीय ठेवली जाते. (except suicide / self-harm / harming to others on these criterias. )
ह्या प्रक्रियेत client ला त्याला अवघड वाटणाऱ्या परिस्थिती कडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन, नवीन विचारधारा मिळू शकते. स्वतःमध्ये असलेल्या क्षमता किंवा कमतरता यांची नव्याने जाणीव होऊ शकते. लोकांना एक प्रकारचा हा मदतीचा हातच मिळत असतो.

विशेष करून जर का नातेसंबंध  बिघडले असतील, घरगुती हिंसाचार, कुटुंबातील एखाद्याला  मानसिक आजार झालेला असेल, अचानक गंभीर रोगाचं निदान झालं असेल, मुलांच्या बाबतीत निर्माण होणाऱ्या पालकांच्या चिंता यावर समुपदेशनाने चांगला फायदा होतो. 
मध्ये एक ७२ वर्षांच्या आजी त्यांच्या ७७ वर्षांच्या यजमानांना घेऊन आल्या होत्या.
त्यांचं म्हणणं  असं होतं कि आजकाल त्यांचे यजमान बराच वेळ नुसते बसून राहतात. विचारलं  की कसला विचार करताय? काही होतंय का तुम्हाला? बरं वाटत नाही का? डॉक्टरकडे जायचं का? कशालाही उत्तर देत नाहीत, नुसतं एकच वाक्य- मला काहीही झालेलं नाही. शेवटी आमच्या डॉक्टरांनी सायकॉलॉजिस्ट कडे जाऊन समुपदेशन घेऊन पहा असं  सुचवलं.

बराच वेळ त्यांना दिल्यावर त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा आलेख वाचून दाखवला. आणि त्यांना वाटत होतं कि कितीतरी गोष्टी मी करायला हव्या होत्या पण माझ्या भित्र्या स्वभावामुळे मी मागे राहत गेलो. अशी एक खंत म्हणा, एक सल म्हणा सारखी वाटत होती. आपली मुलं आपल्या जवळ नाहीत त्यामुळे काही झालं  तर काय? अशीहि भीती. अशा सगळ्या संमिश्र भावना त्यांना स्वस्थ राहू देत नव्हत्या. 
सगळं बोलून झाल्यावर त्यांचं त्यांनाच हलकं वाटलं. ते म्हणाले, हे मी बायकोला सांगू शकत नाही, कारण तिला उगीच कशाला त्रास? एकटाच विचार करतो त्यामुळे डोकं दुखतं.
त्यांचं सगळं बोलून झाल्यावर त्यांना आजचा दिवस कसा घालवायला आवडेल, याचा विचार करायचा, जमेल तसं आणि जमेल तितकं काम करायचं असं सांगितलं. 
बरोबर आणि चूक ह्या परस्पर सापेक्ष कल्पना असतात. त्यात न फसता आपल्याला काय काय करता येईल याचा विचार होणं गरजेचं आहे. थोडासा हलकाफुलका झेपेल इतका व्यायाम, श्वसनाचे व्यायाम, नियमित आहार आणि विरंगुळा अशा विचारांचा कसा चांगला परिणाम होतो  याचा अनुभव घेणं  आवश्यक होतं. शेवटी निर्णय मात्र त्त्यांनीच घ्यायला हवा. पण एक आठवडा करून पहा आणि नंतर ठरवा असं सुचवलं. आता अधून मधून आपणहोऊन फोन करतात.

प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. प्रत्येक गोष्टीत फायदा-तोटा असतो. एखाद्या गणिताचं  उत्तर एकच असतं, पण ते सोडवायच्या पद्धती एकापेक्षा जास्त असू शकतात. समुपदेशनामुळे स्वतःची नव्याने  ओळख व्हायला मदत होते. प्रत्यक्ष गोष्टीकडे/ अवघड परिस्थितीकडे  त्रयस्थाच्या भूमिकेतून पाहता येतं
नवीन विचारधारा, नवा दृष्टिकोन यामुळे संकटांशी सामना करण्याची एक ताकद येते. काही वेळा स्वभावात असलेल्या गुण दोषांमुळे आपलं नेमकं काय बरोबर आहे आणि काय चुकतं आहे हेही समुपदेशनातील चिकित्सा पद्धतीमुळे समजण्यास सोपं जातं.

जेव्हा आपण एका भूमिकेतून नवीन भूमिकेत जातो, जसं मुलगी आई होते, मुलगा बाप  होतो, तेव्हा त्या भूमिकेशी निगडित जबाबदाऱ्या समजायला (parental guidance) समुपदेशनाची मदत नक्कीच होते. आता marriage counselling ही कल्पना पण समाजात बऱ्यापैकी रुजत चालली आहे. एवढंच  नव्हे तर बायकांना menopause च्या काळात होण्याऱ्या शारीरिक बदलांची जाणीव आणि त्यांना कसं सामोरं जावं याबद्दल आधी कल्पना दिली तर ती येणाऱ्या बदलांना समर्थपणे हाताळू शकते. 
काही वेळा जुन्या घटनांचा खोलवर परिणाम आपल्या मानसिकतेवर आणि पर्यायाने सध्या जगत असलेल्या जीवनावर होत असतो. तसेच त्यांचे पडसाद तुमच्या वागण्यातून, बोलण्यातून उमटत असतात. काहीवेळा  समजगैरसमज उद्भवतात. नाती/आप्त-स्वकीय यांच्यात दुरावा निर्माण होतो. अशावेळी मी स्वतः कसा आहे? का आहे? हे  समजायला समुपदेशनाची प्रकिया चांगली परिणामकारक ठरते.
जीवनात तुम्ही कोणत्याही टप्प्यावर असा, अगदी लहान बालकांपासून ते वृद्धांपर्यंत  समुपदेशक आपल्याला नेहमीच मदतीचा हात देऊ शकेल. थोडक्यात समुपदेशन हे काही प्रॉब्लेम आल्यावरच घ्यावं सं नाही, तर ते आपलं जीवन सुकर व्हावं यासाठीचं साधन आहे.

डॉक्टर Poorva Ranade Ph.D. (Psy.)



No comments:

Post a Comment