समुपदेशन ७- Career Guidance


मार्च-एप्रिल ऐन परीक्षेचा काळ. ज्यांची मुले दहावी/बारावीत असतील त्यांच्या घरात सर्वजण परीक्षामय झालेले असतात. ह्या लेखात मुद्दाम "करिअर" हा विषय जरा खोलात जाऊन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. १०वी/१२वीची मुलांची परीक्षा म्हणजे आई वडिलांनी एका दिव्यातून जाण्यासारखे आहे. त्याची तयारी दहावी/बारावीचे वर्ष सुरु व्हायच्या आधीच सुरु होते. या वर्षी आता काही करता येणार नाही. मुलाचे/मुलीचे महत्वाचे  वर्ष आहे. सगळ्यांची डॉक्टर, इंजिनिअर होण्याची मनीषा.... त्याला लागणारे सर्व प्रयत्न सुरु झालेले असतात.

रोज एकदा तरी कानावर पडणारं  वाक्य - "पहिल्यापासून अभ्यास कर, बाकी काही नको." मुलंसुद्धा मनातून ठरवत असतातच की मला चांगले मार्क्स मिळालेच पाहिजेत. मग मला हवा तो कोर्स निवडता येईल. मात्र ह्याचे ही मनावर दडपण येण्याची शक्यता असते.

पालकांची एक अनामिक काळजी म्हणजे मुलांचे पुढे चांगलं होईल ना? आज इतकी स्पर्धा आहे त्यात टिकाव लागेल ना? यात चूक काहीच नाही. मुलांनाही हा प्रश्न पडत असतोच. पण रोज त्यावर चर्चा आणि येणारी बंधनं याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. पुढे काय होणार? या विचारांनी माझा 'आज' बिघडत नाही ना, याचा विचार करायला हवा. पालकांनी किंवा मुलांनी कुवत आणि क्षमता याचा विचार करून आणि एकमेकांशी चर्चा करून कोणते करिअर निवडावे हे ठरवावे.

परीक्षेपूर्वी आहार-विहार-विचार यावर लक्ष असावे. झोपेचे/ अभ्यासाचे वेळापत्रक असावे. परिक्षेमध्ये आजच्या पेपरचा विचार करायचा. पालकांची वाक्यं "give your best" अशी असायला हवीत. परीक्षेनंतरही बऱ्याच स्पर्धात्मक-competitive परीक्षांना सामोरे जायचे असते. त्यामुळे करीअर option विचारात असले पाहिजेत. एकमेकांशी चर्चा करून Plan B तयार ठेवला पाहिजे.



मिथिला (नाव बदलून)दहावीला ९४% मिळवून ऊत्तीर्ण झाली. तिने कॉमर्स घेतले

आज ती C.A. होऊन इंटरनॅशनल कंपनीत नोकरी करते आहे. तिच्या सगळ्या मैत्रिणी सायन्सला गेल्या. तेंव्हा तिलाही असे वाटले आपणही सायन्सला जाऊ. जेंव्हा तिने करिअर निवडण्यासाठी professional guidance घेतला तेंव्हा तिची नैसर्गिक आवड analytical skills मध्ये असल्याचे स्पष्ट झाले. मग तिने कॉमर्स निवडले. सांगायचा मुद्दा असा, की कोर्स निवडताना काही गोंधळ असेल तर professional guidance जरूर घ्यावा.

कोर्स निवडण्यापूर्वी -

आता जरी सगळी माहिती मिळत असली तरी. स्वतः ती नजरेखालुन घालावी. समजा मुलगा/मुलगी हॉस्टेलवर राहणार असतील तर विशेष पूर्व तयारी करणे जरुरीचे असते. हॉस्टेलवर राहण्यासाठी जी मानसिक तयारी लागते त्याची सुरुवात घरीच करावी. त्यासाठी स्वावलंबन आणि स्वयंशिस्त याची फार जरूरी असते. त्याच बरोबर 'time management skills' म्हणजे 'वेळेचे व्यवस्थापन' करता येणे महत्वाचे. आज बाहेर राहताना बरीच प्रलोभने वाटेत असतात. मित्रांची निवड, सभोवतालचे वातावरण, शिक्षक, शिकवण्याची पद्धत याचा बारकाईने अभ्यास करावा.

चिन्मय (नाव बदलून)१२वीची परीक्षा ७५% मिळवून पास झाला. अर्थात अपेक्षित कॉलेजमध्ये प्रवेश मिळवू शकला नाही. आता काय? आपल्या करीअरची वाट लागली. म्हणून नाराज झाला. नैराश्य येऊन खाणे-पिणे-झोप या सगळ्यांवर परिणाम झाला. घरात मोकळे वातावरण असून, आई वडिलांनाही तो स्वतःच आपण कसे दोषी आहोत/नालायक आहोत हे पटवू लागला. तो दुसरा काही विचार करण्याच्या मनःस्थितीत नव्हता. याचे मुख्य कारण असे होते की त्यांनी 'प्लॅन बी' चा विचार केलेला नव्हता. समुपदेशन केल्यानंतर, त्याला बरेच पर्याय सुचवल्यामुळे आज तो हॉटेल व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम करतो आहे.

काही वेळा आई वडिलांच्या महत्वाकांक्षा मुलांच्या करिअर निवडीबाबतचे निर्णय घेताना अडचण ठरू शकतात. त्यावेळी मात्र व्यावसायिक मार्गदर्शन अतिशय उपयोगी ठरतो. वडील IIT होते तसेच मुलानेही IIT त जाण्यासाठी प्रयत्न करावेत असे आईला मनापासून वाटत होते. त्यासाठी नववी यत्तेपासून क्लासेस सुरु झाले. बारावी नंतर मुलाला IIT ऐवजी NIT त ऍडमिशन  मिळाली. इंजिनियर होऊन बाहेर पडला. पण मुलाची आवड पूर्णपणे बदलून त्याला वित्तीयक्षेत्रातच (finance) करिअर करायचे आहे असा जवळ जवळ एक धक्का मुलाने आई वडिलांना दिला. सध्या तो कॉमर्समध्ये पदवी घेत आहे. हेच आधी केले असते तर वेळ, पैसे आणि कष्ट वाचले असते.

पालक आणि मुलांमधील संवाद हा मुद्दा मुलांचे भविष्य ठरविताना महत्वाचा असतो. निवडलेल्या करिअर बाबतच्या निर्णयामुळे येणारे धोके, निर्माण होणारे प्रश्न, आपण calculated risk घेतो आहोत ना? याची सविस्तर चर्चा यामुळे उत्तरे शोधण्यास मदत होते. वेळ मिळतो.

अजून एक असेही पालक पाहायला मिळाले की ज्यांना त्यांच्या एकुलत्या एका मुलाला शिक्षणासाठी हॉस्टेल वर ठेवायचे नव्हते. मुलाला चांगल्या बाहेरच्या प्रख्यात कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली होती, पण आई/ वडील मुलाला लांब ठेवण्यास तयार नव्हते. आज मुलगा त्यांना रोज दोषी ठरवतो आहे की तुमच्यामुळे माझी संधी गेली. घरात रोज भांडणे, मुलगा अभ्यास करत नाही. नीट कॉलेजमध्ये जात नाही. परिणाम परीक्षेत नापास होण्यात झाला. परिस्थिती कशी हाताळावी हेच समजेना. समुपदेशनासाठी मुलगा यायला तयार होईना. त्याचे म्हणणे मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्हालाच समुपदेशनाची गरज आहे. बऱ्याच प्रयत्नानंतर मुलगा अभ्यास करायला तयार झाला आहे.

सर्वात महत्वाचा मुद्दा आणि आजचे आव्हान म्हणजे "developing suicidal tendencies among children" कसे रोखता येईल. त्यामध्ये मुख्य कारणं म्हणजे अपेक्षित निकाल लागल्यामुळे येणारं नैराश्य, मित्र, लोक आणि नातेवाईक काय म्हणतील? याचे दडपण, आता सर्व पुढे जाण्याचे मार्ग बंद झाल्याची भावना/कल्पना.यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे पालकांचे मनापासून केलेले सहाय्य, वेळ पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने केलेले समुपदेशन ही उपयोगी येऊ शकते.

शिक्षण हा आयुष्याचा एक भाग आहे आयुष्य नव्हे .....

ALL THE BEST to Parents and their Wards


डॉ.पूर्वा रानडे 


No comments:

Post a Comment