सणवार

 

सणवार ...आनंद..   आणि....स्त्रिया.....

 

पंधरा दिवसांवर आले बाई गौरी गणपती! आत्ता पासून तयारीला लागायला हवं.....हे संपलं की पुन्हा नवरात्र आहेच.....सवाष्ण,ब्राम्हण, कुमारिका,उपास..... खरं तर आजकाल हे सगळं आता माझ्याच्याने होत नाही....पण सोडताही येत नाही....पिढ्या न पिढ्या आमच्याकडे हे सगळं आत्ता पर्यंत करत आले आहेत!

 

हे आणि असं बरंच काही! सणवार जवळ आले की अवती-भवतीच्या बायकांकडून, मैत्रिणींकडून ऐकायला मिळतं. खरं तर सण निर्मिती माणसाच्या आनंदासाठी झाली आहे. सण आला की सगळी मुले,मोठी माणसे आनंदित होतात. स्त्रीलाही त्याचा आनंद असतो. पण त्या आनंदाला एक दडपण असतं, काळजी असते, ताण जाणवतो. तो निखळ आनंद नसतो. असं का ?

 

ज्या काळात हे सणवार कसे साजरे करावे हे ठरवलं गेलं तो काळ आता राहिला नाही. पण प्रथा मात्र त्याच राहिल्या. उलट अनेक बाबतीत अनेक गोष्टी बायकांनी स्वतःहून हौसेपोटी वाढविल्या.

 

आमची पिढी खूप लहान असताना मोठ्या सणांना आम्ही सगळे चुलत, सख्खे एकत्र यायचो. खूप दिवसांनी भेटायचो. खूप ओढ असायची भेटायची. बाहेरगावचे आम्ही सगळे पुण्यातल्या मोठ्या घरी एकत्र जमायचो. मोठे कुटुंब असल्याने आजी, काका -काकू, आत्या, जवळच राहणारे मामा-मामी, आजोबा-आजी असा नातेवाईकांचा गोतावळा होता. गणपती आणि दिवाळी हे सण एकत्र साजरे व्हायचे.

 भेटल्यानंतर तो संपूर्ण दिवस मोठी मंडळी हास्यविनोदात रंगलेली असायची. चहाच्या फेर्यांवर फेऱ्या व्हायच्या. आजीसुद्धा खूप आनंदी असायची. दात नसलेल्या बोळक्यात खदखदून हसायची. भल्यामोठ्या कढईत पोहे ,उपीट फस्त व्हायचं. आम्ही मुले मस्ती करण्यात दंग असायचो. आंघोळीसाठी मोठ्यांचा ओरडा सहन करावा लागायचा. घरात खूप समृद्धी नव्हती पण आनंदीआनंद होता.


 पहिला गप्पांचा भर ओसरला की सगळ्या जावा-जावा ,नणंदा झडझडून कामाला लागायच्या. आजी रिंग मास्टर होती. कधी आणि कोणी काय करायचं हे ती ठरवायची. ती सूचना देत असताना जावा-जावां मध्ये नेत्र पल्लवी व्हायची, गालातल्या गालात सगळ्या सासूची मस्त उडवायच्या! सगळ्यांना कामे वाटून दिली की सगळ्या कामाला लागायच्या. त्या काम करण्यातही आनंद होता. कारण बरोबर छोट्या छोट्या मदतीला कोणीतरी असायचं. कोणी पूजेची तयारी करत असायचं तेव्हा कोणीतरी सगळ्यांसाठी चहा करायचं, कोणी बच्चेकंपनीच्या खाण्यापिण्याची काळजी घ्यायचं ,तर कोणीतरी सडा-रांगोळी करायचं, कोणी भाज्या चिरून ठेवायचं, नारळ खवून ठेवायचं, कोणी गाद्या गुंडाळून ठेवायचं, केरवारे करायचं, तेव्हाच कोणीतरी लहान मुलांना आंघोळ घालायचं. दडपण न घेता, हसत-खेळत सगळ्यांची कामे चालायची. भाजी, आमटी केली तिला पोळ्या कराव्या लागत नव्हत्या.जी पोळ्या करायची तिला ताटं पानं घ्यावी लागायची नाहीत. आणि जेवायला वाढायची तिला मागचं खरकटं आवरावं लागायचं नाही. सतत कामं असली तरी त्याची संपूर्ण जबाबदारी नव्हती. मधून मधून थोडी विश्रांती मिळायची. कामे करता करता गप्पांमध्ये हात हळूहळू चालायचा. सगळ्यांनाच काही ना काही तरी आयतं मिळायचं.

 

यथावकाश घरातील सगळ्यांची लग्नं झाली. घरं पुरेनाशी झाली, सगळे विभक्त झाले.कोणी नोकरीनिमित्त बाहेरगावी गेले, काही बायकांनी नोकर्या पत्करल्या.विभक्त कुटुंब पद्धती आली. स्वातंत्र्याबरोबर स्त्रीच्या जबाबदाऱ्या आणि कामे ही वाढली.मुलांचे सगळे उरकून, सगळ्यांचा नाश्ता उरकून, स्वयंपाक पाणी, सगळ्यांचे डबे, स्वतःचा डबा, मागची झाकपाक, मोलकरणीला सूचना, मुलांना सूचना, नवऱ्याला सूचना, असे सगळे दिव्य पार पाडून आणि दोन घास स्वतःच्या पोटात घाईघाईने ढकलत बाई ऑफिसात जाऊ लागली. तिथेही वेळेत पोहोचण्याचे बंधन, घरी नवऱ्याच्या ऑफिसच्या वेळेचे बंधन, मुलांच्या स्कूल बसच्या वेळेचे बंधन, असे मिनिट... सेकंद काट्यावर बाईचे धावणे सुरू झाले. 

 

ऑफिसमध्येही तिला स्वतःला प्रूव्ह करावे लागते. कामाचे रिझल्ट्स द्यावे लागतात. तिथेही डेडलाईन्स पूर्ण कराव्या लागतात. वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतात. त्या कामाच्या रगाड्यातही लंच ब्रेक मध्ये ती ऑफिसमधील मैत्रिणींमध्ये दोन घटका रिलॅक्स व्हायला शिकली. चार वाजता टेबलवर येणारा रेडिमेड चहा तिला आनंद देऊ लागला. ती सगळी एनर्जी गोळा करून पुन्हा घरच्या ओढीने धावू लागली. पुन्हा चहा-नाश्ता, मुलांबरोबर दिवसभराचा आढावा, आणि पुन्हा भाजी, किराणा आणि स्वयंपाक, जेवणं! 

   

मात्र यातही वेळ काढून पूर्व संस्कारांमुळे देवाला दिवा दाखवून मुलाबाळांसाठी, नवऱ्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी त्याची प्रार्थना करायला ती विसरली नाही. त्यामुळेच की काय नव्या युगाचे वारे कितीही वाहिले तरी अद्याप आपली संस्कृती घट्ट पाय रोवून उभी आहे. सणवार कमी प्रमाणात, आधुनिक पद्धतीने साजरे होत असले तरी अजून टिकून आहेत यातच त्यांचे महत्व सामावलेले आहे.

 

माधुरी राव






 

No comments:

Post a Comment