"न्यूयॉर्कच्या स्टोनी ब्रूक युनिव्हर्सिटीत आर्थर ॲरन नावाच्या मानसशास्त्राच्या प्रोफेसरने आपलं पूर्ण करीयर प्रेमावर संशोधन करण्यात
घालवलं." रविवारच्या कॉफी सोबत मी चर्चेला सुरुवात
केली.
"असतात असे काही वेडे ", ती.
"ऐक तर. १९९७ साली त्याने त्याचा एक संशोधनात्मक लेख
प्रकाशित केला. बऱ्याच संशोधनानंतर त्याने ३६ प्रश्नांची एक प्रश्नावली तयार केली.
त्यानंतर काही अनोळखी जोड्यांना ह्या प्रयोगासाठी तयार करून त्यांना ते प्रश्न
एकमेकांना विचारायला लावले. हे प्रश्न सुरवातीला सोपे आणि हळूहळू अधिकाधिक पर्सनल,
किंवा इंटिमेट होत जातात. ह्या प्रयोगाशेवटी त्यातल्या बहुतेक
जोड्यांना एकमेकांना पुन्हा भेटावंसं वाटलं, काहींना
एकमेकांविषयी आकर्षण वाटू लागलं, काहींची तर म्हणे पुढल्या
काही महिन्यांत लग्नं झाली. एवढंच नाही. तर पुढे त्याने असंही म्हटलंय की
रिलेशनशीपमधे असलेल्यांनाही ह्या प्रश्नांद्वारे एकमेकांना नव्याने ओळखता येईल.
किंबहुना पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पडता येईल. Isn't that amazing?"
"हो रे. खरंच. पण तू एक बघितलंस? '३६' प्रश्न होते त्यात."
"मग?"
"अरे, आपल्याकडे ही लग्नं जुळवताना ३६ गुण जुळवले जातात.
हा निव्वळ योगायोग म्हणावा की काही स्पेशल आहे यात."
"मला त्यातलं कसं कळणार. माझं तर लव मॅरेज झालं बुवा." मी आळस देत म्हणालो.
"अवगुण जुळले की लव मॅरेज होतं.", आठवडाभर न आवरलेल्या, घरभर झालेल्या पसाऱ्याकडे नजर फिरवत ती म्हणाली.
"कळलं.. आवरतो. तुझ्याशी ३६चा आकडा मला परवडणार नाही."
ती हसून "Good boy..." म्हणाली. रविवारची सुरुवात तर compliment ने झाली होती.
पण खरंच, काहीतरी स्पेशल आहे ह्या ३६मधे. नाही का?
टीप-आर्थर ॲरनच्या रिसर्चबद्दल अधिक जाणण्यासाठी ही लिंक वापरा:
https://journals.sagepub.com/doi/abs/10.1177/0146167297234003
त्यातल्या प्रश्नावलीचा प्रयोग केल्यास तुमचा अनुभव नक्कीच शेअर करा.
No comments:
Post a Comment