पाजू आनंदे


डॉक्टर, आपणबर्थ प्लॅनकधी करायचा?”
अग, आपल्याकडे कोणी करत नाही.
पण तुम्ही दिलेल्या फाईलमध्येच दिलेलं आहे ते.
ठिक आहे, आपण करू या.

प्रसूतीसाठी एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये माझी नावनोंदणी केली होती. तिथलेप्रोटोकॉल्सप्रमाणित होते. नॉर्मल डिलीव्हरी आणि सी-सेक्शन डिलीव्हरी यांचं एकूण प्रमाण याचंही त्यांचं ऑडिट असायचं म्हणे. त्यामुळे नॉर्मल डिलीव्हरी होण्यावर भर होता. अशा ठिकाणीहीबर्थ प्लॅनची ही अवस्था. अर्थातच इतर ठिकाणी विचारायचंच नाही. पण हा दोष हॉस्पिटलचा नाही. हा आपल्या परिस्थितीचा आहे. आपल्या तोकड्या अनुभवविश्वाचा आहे. आपल्या अपुर्‍या अभ्यासू वृत्तीचा आहे.बर्थ प्लॅनकरायला पेशंटची तेवढी मजल हवी ना, तेवढा अभ्यास हवा ना! प्रसूतीच्या वेळेस त्या स्त्रिला काय हवं, काय नको हे सांगायला ते आधी ठाऊक हवं ना!

माझ्या आजूबाजूला अभ्यास करणार्‍या स्त्रिया (आणि त्यांच्याबरोबरीनं त्यांचे पालक साथीदार) मला दिसायला लागल्या आहेत. अभ्यास करून भरमसाठ मार्क एक वेळ नाही मिळवले तरी चालतील. पण आपलं आयुष्य अभ्यासपूर्वक असावं, असं मात्र मला प्रकर्षानं वाटतं.पडलं की पोहता येईलअसं आयुष्याच्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टींबद्दल तरी करू नये, असं जाणवतं.

माझ्या बर्थ प्लॅनमध्ये आम्ही लिहिलं होतं की नॉर्मल डिलीव्हरीच्या सर्व शक्यता पडताळून पाहीपर्यंत सी-सेक्शन करायचं नाही.एपीड्युरलद्यायचं नाही. बाळ जन्माला आल्या आल्या, नाळही कापण्यापूर्वी ते आईच्या छातीवर द्यायचं. बाळालाब्रेस्ट क्रॉलसाठी प्रयत्न करू द्यायचा. प्रसूतीच्या दरम्यान साथीदार (नवरा) सोबत असणार.

ला लेशे लीगच्याद वुमनली आर्ट ऑफ ब्रेस्टफीडींग’ (La Leche League’s The womanly art of breastfeeding) या पुस्तकानं माझी भरपूर मानसिक तयारी झाली होती. या पुस्तकानं मलाअंगावर पाजण्याच्याकलेची खंदी पुरस्कर्ती बनवलं. ब्रेस्ट फीडिंगचे अगणित फायदे या छोट्याशा लेखात मावणार नाहीत, तेव्हा हे पुस्तक मुळातूनच वाचावं असं आहे.

http://www.animatedimages.org/
cat-breastfeeding-1017.htm
बाळाला पाजणंया अतीव सुंदर प्रक्रियेला घेऊन आपल्याकडे खूप समज गैरसमज आहेत. आणि ज्याला एकजण गैरसमज म्हणेल तोच दुसर्‍या कोणासाठी योग्य समज असतो. म्हणजे गैरसमजांचं शिकार होणार्‍या समाजमनाला हे ठाऊकच नसतं की ते शिकार आहेत. एक अगदी साधा समज, “माझं दूध बाळाला पुरत नाहीए!आईच्या मनावर आजूबाजूच्या स्त्रियांनी हे इतकं बिंबवलेलं असतं. खरंतर दूध येत असेल तर ते वाढवणं सहजच शक्य असतं कारण तेपॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझमआहे. म्हणजे जेवढं जास्त पाजलं जाईल तितकं जास्त दूध येईल. मग दूध कमी पडण्याचा प्रश्न कुठे येतो. पण अशा गंडग्रस्त आया पाहिल्या की मला त्यांच्या आजूबाजूच्या मोठ्या स्त्रियांचाच राग येतो.

मूल जरा मोठं होऊन दात यायला लागले की कधीतरी दात स्तनांना लागतात. मुलांसाठी तोंडात येणारे दात ही नवीन गोष्ट असते आणि त्यांना सगळ्याच गोष्टी चावून बघायच्या असतात. हे दुखतं हे खरंय, पण स्तनपान संपवायचं हे कारण असू शकत नाही. कारण यावर अगदी साधा मार्ग आहे, आणि जवळ जवळ सर्वांना तो लागू पडू शकतो. बाळ चुकून किंवा मुद्दामून चावल्यावर स्तनपान शांतपणे थांबवायचं. बाळाला मिनिटभरासाठी खाली ठेवायचं. बाळाला समजावून सांगायचं, की हे दुखतं, आणि मग परत पाजायला घ्यायचं. काही बाळांना हे एकदाही पुरतं तर काहींना हे दोन चारदा केल्यावर कळतं. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईचा आपल्या बाळावर विश्वास हवा की आपलं बाळ हे आपल्याला त्रास द्यायला मुद्दाम करत नाहीए, तर तो त्याचा शिकण्याचा, गोष्टी करून बघण्याचा भाग आहे. आणि हे थांबवलं नाही तर त्याच्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला त्याचा अन्न स्रोत, भावनिक आधार स्रोत त्याच्यापासून दूर जाणार आहे.

हॉस्पिटलमधून घरी येऊन थोडेच दिवस झाले होते मला. खोलीत माझी आई आणि कुमार वयातली माझी भाची होती. मी मोकळेपणानं पाजायला घेतलं. स्तन झाकण्याचा कुठलाही प्रयत्न न करता! मी पहिलटकरीण. त्यामुळे अजून तरी मला ती कला पूर्ण अवगत नव्हती. आणि बाळ अंगावर पीत असताना त्याचा चेहरा बघणं जसं  आनंदाचं असतं तसं दिशादर्शकही असतं. तान्ह्या बाळाचं नाक दाबलं जात नाही ना, हे बघणं आवश्यक असतं. लोकलज्जेस्तव छाती झाकण्याच्या आग्रहात हे सगळं कसं जमावं! आईनं तिच्या समजुतीनुसार मला हे सुचवलं. तिच्या मते माझ्या कुमार वयातील भाचीवर याचा वाईट परीणाम होऊ शकतो. मला राग आला होता. आणि मी आईचं ऐकलं नाही, याचा तिलाही राग आला होता. हा आणि अशासारखे अनुभव आता अनेक पहिलटकरणींना येत असतील. पिढीतलं अंतर हे नेहमीचं कारण आहेच. वेगाने वाढणार्‍या माहिती तंत्रज्ञानाची त्यात भर पडलीए. माहिती देण्यामध्ये आता मागच्या पिढीचीमोनोपोलीराहिली नाहीए. मागच्या पिढीच्या माझ्या घरातल्या स्थानिक प्रतिनिधीपेक्षा पुस्तकांच्या दुनियेत आणि इंटरनेटवर भेटणारी, चेहरा नसलेली, लुडबुड न करता गोष्टी सांगणारी आख्खी मागची पिढीमलाअधिक भावते.

मूल वर्षाचं होता होता, माझ्या गायनॅकला भेटायला गेले होते. अतिशय प्रेमळ आणि स्वतःच्या कामात आणि ज्ञानात प्रवीण असे हे डॉक्टर. माझं त्यांच्याशी पेशंट म्हणून चांगलंच जमलं होतं. पण यावेळेसच्या संवादानंतर मात्र मला काही काळ तरी अगदीच कसंतरी झालं. त्यांनी मला अंगावर पाजण्याबद्दल विचारलं. मीही त्यांना समाधानानेअजून छान चालू आहे’, असं सांगितलं. त्यावर त्यांच्या आलेल्या प्रतिक्रियेने माझ्या मनात राग, दुःख असं सगळं उचंबळून आलं. ते म्हणाले, “आपण काही सोमालियात नाही इतक्या मोठ्या मुलाला अंगावर पाजण्यासाठी!आणि हसले. अंगावर पाजण्याबद्दलच्या विचारांची मला स्पष्टता होती. मूल जसं मोठं होत जातं तसं ते अंगावर पिणं कमी करत जातं आणि इतर अन्न खाण्याचं प्रमाण वाढवत जातं. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे कठोर हृदयाने वगैरे मुलाचं पिणं बंद करण्याची गरज नाही अशी माझी धारणा होती (आजही आहे!). आपल्या लहानग्यांना कितव्या वर्षापर्यंत पाजावं हा पूर्णपणे आईचा निर्णय असावा. आणि कुठलाही निर्णय न घेता रोजचा दिवस पार पाडला तरीही ते मूल कधी ना कधी आपोआप थांबणारच आहे. आज पिल्लू साडेतीन वर्षांचं आहे. आता शाळेत जायला लागल्यावर एकमेकांबरोबरचा वेळच कमी झाल्यावर अंगावर पिण्याचं प्रमाण आपोआपच कमी होत गेलं. आता तो फक्त पहाटे पहाटे झोपेत दूध पितो. आणि त्यासाठी अजूनही आम्ही एकत्रच झोपतो. आई म्हणून मला याबद्दल काहीच तक्रार नाहीए. उलटपक्षी आनंदच जास्त आहे. अंगावर पिणं कमी होत जातंय तसं दूधाचं प्रमाणही कमी होतंय आणि आता हळूहळू हे कधीतरी संपणार याची मानसिक तयारी सुरू झाली आहे. त्याने आता अंगावर पिणं बंद करावं असं मी कधीच सुचवत नाही. पण आपल्या आजूबाजूची मोठी मुलं, माणसं तसं करत नाहीत हे मात्र त्याच्या निदर्शनास आणून दिलंय.

बाळाला पाजण्यासारख्या नैसर्गिक आणि तरल प्रक्रियेला एक उरकून टाकायचं काम आपण कधी करून टाकलं, आपलं आपल्यालाच कळलं नाही. आई व्हायचं मनापासून आणि विचारपूर्वक ठरवलं की ओघाने येणार्‍या या पुढच्या गोष्टींसाठी आपण अधिक तयार असतो. मग ते काम न होता, आनंदाचे क्षण ठरतात, आपली झोळी भरून टाकणारे! हा आनंदसेल्फीकाढून सोशल मिडियावर प्रसारित करण्याची गरजच नसते. कारण त्यात कोणालादाखवणंनसतंच, तो असतो निखळ आनंद. आयुष्यात सगळ्यांना न मिळणारा आणि खूप कमी  काळासाठी टिकणारा!

प्रीती ओसवाल 


No comments:

Post a Comment