‘शनिवार वाड्यातील अस्वस्थ हुंकार ’
हे प्रहसन रविवार २१ मार्च रोजी मित्रमंडळ बेंगलुरू तर्फे सादर करण्यात आले.
कोरोनाच्या सावटामुळे अर्थातच ऑनलाईन. इतिहासाची जाण, मातृभाषेची ओढ आणि
नावीन्याची आवड असा त्रिवेणी संगम या कार्यक्रमात पहायला मिळाला. लेखिका आणि
सादरकर्त्या गंधाली सेवक आणि त्यांना साथ देणार्या अस्मिता ओक, नेहा भदे आणि
रूपाली गोखले या सगळ्याजणींनी आपल्या सादरीकरण तसेच भाषेवरील प्रभुत्वाने
कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला. विषयप्रवेश करण्यासाठी स्नेहा केतकर
यांनी केलेले सुतोवाच सुरेखच होते. आपण काय पाहणार आहोत याची नेमकी कल्पना
त्यामुळे दर्शकांना
आली.
जनसामान्यांना माहिती असलेला पेशवाईचा इतिहास
तसेच त्याला समांतर परंतु तितकाच दुर्लक्षित पेशव्यांच्या स्त्रियांचा इतिहास ही
‘शनिवार वाड्यातील अस्वस्थ हुंकार’ या प्रहसनाची मुख्य संकल्पना होती. त्याकाळी
स्त्रियांना उपलब्ध असलेले अधिकार, शिक्षण, त्यांची राजकीय, सामाजिक कर्तबगारी,
राजकारणासाठी कुटुंबियांकडून झालेली त्यांची ससेहोलपट अशा अनेक अंगाना स्पर्श
करणारे लेखन हा प्रहसनाचा महत्वाचा भाग होता.
यात
सहभागी झालेल्या सर्व स्त्रियांनी विविध पेशवेकालीन स्त्रियांची पात्रे तशाच
पारंपारिक पोशाखातच सादर करून छान वातावरणनिर्मिती केली होती. पेशवाईचा जवळपास
दीडशे वर्षांचा इतिहास अवघ्या ४५ मिनिटांमधे मांडणे हे काही सोपे काम नाही. पण
लेखिका आणि सादरकर्त्या सार्याजणींनी मिळून हे शिवधनुष्य लिलया पेलले आहे.
या
कार्यक्रमासाठी नरेन नंदे आणि श्वेता पानवलकर यांचे तंत्रसहाय्य लाभले. सगळ्यांचे
विडिओ बनवून घेऊन ते पद्धतशीरपणे एकमेकांत गुंफून युट्यूब वर सादर करणे अशा किचकट
कामांची पूर्तता आनंदाने केल्याबद्द्ल या दोघांचे आभार मानावे तितके थोडेच.
प्रत्येक
मराठी मनाला अंतर्मुख करायला लावणारा हा कार्यक्रम प्रत्यक्ष रंगमंचावर बघायला ही
रसिकांना नक्कीच आवडेल.
बाहेरच्या
भीतिदायक वातावरणात देखील नवनिर्मितीमध्ये खंड न पडू देता सतत वेगवेगळ्या
मार्गांनी रसिकांच्या भेटीला येणार्या या सर्व गुणी मंडळींचे मन:पूर्वक अभिनंदन!
मानसी नाईक
No comments:
Post a Comment