शततंत्री वीणेचा सिद्ध

 

शततंत्री वीणेचा सिद्ध

पंडित शिवकुमार शर्मा


 आपल्या संस्कृतीत एक श्लोक प्रसिद्ध आहे.

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते । पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥

 ब्रह्मतत्वाबद्दल उहापोह करणाऱ्या या शांतीमंत्राचा साधारण रूढ श्लोकार्थ असा की', "आत आणि बाहेर सर्वत्र पूर्णब्रह्म भरलेलं आहे. पूर्णातूनच पूर्ण प्रकट होतं. आणि पूर्णातून पूर्ण जरी काढलं तरी शेवटी पूर्णच उरतं". हा श्लोक पूर्णब्रह्मतत्वाविषयी आहे पण ब्रह्मसहोदर ज्याला म्हणतात अशा संगीतासाठी पण तो संपूर्णपणे लागू पडतो. ज्या व्यक्ती संगीतलीन होतात त्या जणू ब्रह्मलीनच होत असतात.

या ब्रह्मसहोदर संगीताच्या साधनपथावर काही साधकांना एखाद्या क्षणी, एखाद्या क्षणासाठी, आत्मानुभव येतो आणि पुढे मग ती संगीतयात्रा समर्पण भावाने सुरु राहते. त्यात काही असेही साधक असतात जे एखाद्या अपूर्ण गोष्टीतूनही पूर्णत्वाची अनुभूती स्वतः घेतात आणि आपल्या माध्यमातून ती अनुभूती दुसऱ्यांनाही देतात.

 


जगप्रसिद्ध संतूर वादक पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांच्या बाबतीत ही गोष्ट तंतोतंत लागू पडते असं मला मनापासून वाटतं. संतूर सारख्या एका शास्त्रीय संगीताच्या दृष्टीने अपूर्ण लोकवाद्यातील पूर्णत्व आपल्या तपस्येने शोधून काढून, त्याला आपल्या कठोर साधनेने सिद्ध करून, स्वतः त्या पूर्णत्वाची अनुभूती घेऊन ती आपल्या वादनातून इतरांना अनुभवायची संधी उपलब्ध करून देणारे प्रख्यात संतूरवादक पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा हे असेच एक संगीतसाधक, नव्हे नव्हे, संगीतसिद्ध.

शिवजींचं देहावसान झालं हे जेव्हा कळलं तेव्हा, मला माझे संवादिनीचे गुरुजी संवादिनीजनक पंडित मनोहर चिमोटे यांचं देहावसान झालं, त्यावेळी माझ्या मनाची जी अवस्था झाली होती ती आठवली. तशीच काहीतरी हरवलेपणाची जाणीव आणि तितकंच तीव्र दुःख अंतःकरणात या बातमीनेही दाटून आलं. पंडित चिमोटे यांचा माझ्या व्यक्तिमत्वावर आणि माझ्या संवादिनीवादनावर जितका प्रभाव होता तितकाच पंडित शिवकुमार शर्मा यांचा होता असं मी नक्की सांगू शकतो.

माझ्या संगीताच्या अभ्यासाच्या सुरुवातीच्या काळात शिवजींच्या अनेक मैफिली विद्यार्थ्याच्या भूमिकेतून तर ऐकल्या होत्या. त्याकाळात त्यांच्या प्रकाशित होणाऱ्या प्रत्येक ध्वनिमुद्रणाची कॅसेट मी माझ्या वाचवून ठेवल्या पॉकेटमनी मधून खरेदी करत असे आणि मग त्याची कित्येक श्रवण पारायणं करत असे. त्यांचा लयकारीचा विचार, बंदिशींचा साचा, वादनामागचा विचार समजून घेण्याचा प्रयत्न करत असे. त्यांच्या समोर बसून संगीत शिकण्याचा योग कधी आला नाही. पण त्यांची सांगीतिक प्रतिमा समोर ठेवून मी एकलव्यासारखा त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करत राहिलो. दुःख एकच आहे की एकलव्याला त्याच्या गुरुजींचा आशीर्वाद प्रत्यक्ष लाभला पण ते भाग्य आता माझ्या नशिबी नाही.

मी शिवजींच्याकडून अप्रत्यक्ष पद्धतीने संगीत तर शिकलोच पण त्याच बरोबर संगीत क्षेत्रासारख्या, चित्रपट क्षेत्रासारख्या मोहमयी जादुई दुनियेत राहूनही एका अलिप्त योग्यासारखं कसं राहायचं ते शिकलो. हजारो श्रोत्यांच्या समोर वादन करत असताना सुद्धा, अंतर्मुख होऊन ईश्वरी संधान बांधून 'त्याची' अर्चना आपल्या सुरांतून कशी करता येते ते शिकलो. स्वतः यशाच्या शिखरावर असताना लीन, नम्र, विनयशील मृदुभाषी कसं राहावं ते शिकलो. यश डोक्यात न शिरू देता आपल्या नित्याचा अभ्यास तितक्याच नेटानं आणि प्रामाणिकपणे विध्यार्थ्याच्या भूमिकेत राहून कसा करत राहायचं ते शिकलो.

एक कलाकार म्हणून इतके पुरस्कार, सन्मान, लोकप्रियता मिळूनसुद्धा माणूस म्हणून टिकून कसं रहायचं ते शिकलो. सगळ्यात मिळून मिसळून, साऱ्या रंगात रंगून सुद्धा आपला वेगळा रंग कसा राखून ठेवायचा ते शिकलो. आपल्या वाद्याला कुणी नावं ठेवली तर त्याला प्रतिक्रिया शब्दांपेक्षा आपल्या वादनातून कशी द्यायची ते शिकलो. इतकं कर्तृत्व गाजवून आणि एखाद्या वाद्याशी आपलं नाव जोडलं जावं इतकं यश पदरी पडूनही ते सर्व यश आणि कीर्ती "कृष्णार्पण" करून आपण केवळ ईश्वराचं एक माध्यम आहोत याची जाणीव आयुष्यभर कशी बाळगायची हे शिकलो.

शिवजींच्या जाण्याने संगीतविश्वातील एक युग संपलं हे तर खरंच. पण माझ्या आंतरिक विश्वात माझ्या द्रोणाचार्यांची, या शततंत्री वीणेच्या सिद्धाची, माझी आता कधीच भेट होणार नाही या जाणिवेचं शल्य मात्र दीर्घकाळ सलत राहणार हेही नक्की.

 

राजेंद्र वैशंपायन







 

No comments:

Post a Comment