वयाच्या तिसर्या वर्षापासून शाळा सुरु होणार हे ऐकल्यावर खरं तर आनंद झाला. पण ह्या शाळेचे नेमके स्वरूप कसे असेल? किंवा एकंदरीतच सध्या अनुभवत असलेली जी अभूतपूर्व परिस्थिती आहे, त्यानंतर शाळांच्या भूमिका ह्या तशाच रहाणार की त्यात बदल व्हायला हवेत? कारण मुळात आजकाल अगदी वर्षापासूनच्या मुलांवर टीव्ही, मोबाइलच्या माध्यमातून संस्कार व्हायला सुरुवात होते.
बडबडगीते कोणत्याही भाषेतील असोत, छोट्या
मोठ्या गोष्टी ह्या तेव्हापासून सुरु झालेल्या असतात. ही गाणी, गोष्टी पहाताना अगदी दोन वर्षाच्या मुलाला अक्षर ओळख व्हायला सुरुवात
होते. पुढे ज्युनियर आणि सिनियरमध्ये त्यांना ठराविक पद्धतीने, ठराविक जागेत लिहायची सक्तीही सुरु होते. अशावेळी, मुलाच्या
क्षमतेचा विकास झालेला आहे की नाही ह्याचा विचारही केला जात नाही. पण सध्या तो
विषय नको, त्यावर वेगळी स्वतंत्र चर्चा होऊ शकते. आत्ता फक्त
स्पर्धेच्या जगात जगताना सर्वांनी जिंकायलाच हवे हे एकच उद्दीष्ट डोळ्यासमोर
असलेल्या पालकवर्गाला धरुन विचार करुया. त्यामुळे आता फक्त वय वर्ष तीन असलेल्या
मुलांचा शाळेत प्रवेश घ्यायचा पहिला टप्पा त्यावर बोलूया.
जन्माला आलेलं प्रत्येक मूल हे त्याच्याही नकळत त्याच्या क्षमतांचा शोध
घेतच असते. आपल्या बोलण्याला, आवाजाला हुंकार देणे,
प्रतिसाद देणे, कुशीवर वळणे, पालथे होणे, एकाच खोलीत, त्यात
नेहमीच्या सतत संपर्कात असणार्या व्यक्तींना, वातावरणाला
कंटाळून रडारड करणे, घराबाहेर दिसणार्या झाडांशी, पक्षांशी बोलायला बघणे, हळूहळू घराबाहेर जाण्यासाठी
हट्ट करणे ह्या सगळ्या क्रियांमधून त्या बाळाची नाविन्याची ओढ आपण बघत असतो आणि
शक्य तेवढी पुरवितही असतो. बाळाचे रोज नवे खेळ आणि रोजचे नवे उद्योग ह्यापुढे
पालकांची ताकद (शारीरिक, मानसिक, वेळ
आणि क्वचित आर्थिक) कमी पडायला सुरुवात होते आणि आपोआप शाळा नावाच्या सोयीमध्ये
आपण आपल्या मुलांना दाखल करतो.
शाळा ही बहुतांश पालक सोय म्हणूनच बघतात. घराजवळ, आपल्या आर्थिक दर्जाला साजेशी, त्यातल्या
त्यात आपले मूल उत्तम शिकेल, हुशार म्हणवले जाईल पण आपण
त्यात अडकले जावू नये, म्हणजेच आपल्याला सगळ्या अंगांनी
झेपेल अशी मुलाची सोय होणारी संस्था म्हणजे शाळा असे म्हणता येऊ शकेल. मग ही
दृष्टी जर असेल त्यात गैर काय आहे? गैर नक्कीच नाही.
संसाराच्या, कामाच्या व्यापात,
मुलांची चांगली सोय बघणे हे योग्य आहे. पण वयाच्या तिसर्या
वर्षापासून लिहायला सुरुवात केल्यानंतर पहिली-दुसरीमध्ये म्हणजे साधारण सहाव्या
सातव्या वर्षी देखील आपण त्यांना शिक्षण म्हणून केवळ माहितीचा खजिना त्यांच्यावर
लादत असू तर त्या शिकण्यामध्ये किंवा शाळेमध्ये रस निर्माण होण्यासारखे त्याला
काहीच दिसत नाही. यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा येतो. ज्या मुलांना
पालकांकडून वेळ, किंवा त्याबदल्यात समोर टीव्ही अथवा मोबाइल
मिळतो त्या मुलांच्या प्राथमिक शिक्षणाला घरातच सुरुवात होते हे मान्य केल्यास,
जे पालक वेळ किंवा टीव्ही, मोबाइल वर योग्य
अभ्यासाशी निगडीत माहिती मुलांना देऊ शकत नाहीत, अशी मुले इतर
मुलांच्या तुलनेने मागे रहातात. शाळांमधून त्यांच्यावर विशेष परिश्रम घेतले जातीलच,
याचीही खात्री नसते. अशावेळी अभ्यासाची नावड मुलांच्या मनात
कायमस्वरुपी घर करु शकते आणि ते जास्त धोकादायक आहे!
मागच्या काही दिवसांत जेव्हापासून सर्वत्र ऑनलाइन शिक्षणाला सुरुवात झाली
तेव्हापासून जेव्हा मुलामुलींचा शाळा हवीच, शाळेत
जायचे आहे असे सूर ऐकू यायला लागले. तेव्हा त्याचे कारण विचारल्यावर
मित्र-मैत्रिणींची आठवण येते, शाळेत जाऊन मज्जा करायची आहे
हे समजले. म्हणजेच काय, तर शिकायची ओढ ह्या अनुषंगाने शाळेची
आठवण येणारे कमीच असतील. आणि त्याचे कारण फार स्वाभाविक आहे. ते म्हणजे मुलांना
व्यक्त होण्यासाठी त्यांची स्वत:ची हक्काची जागा लागते, जेथे
त्यांची अभिव्यक्ती होत असते, त्यांना स्वातंत्र्य आणि
क्षमता ह्यांचा समन्वय साधण्याला वाव असतो. शिक्षण म्हणजे त्यांना जे शिकायची,
जाणून घ्यायची उत्सुकता आहे, त्यांना
ज्यामध्ये रस आहे (अगदी संगीत, चित्रकला किंवा खेळ) याबाबतचे
अद्ययावत ज्ञान पुरावणारे गुगल त्यांच्याकडे उपलब्ध आहेच) मग खरंच शाळेची भूमिका
काय असायला हवी?
शाळा ही वास्तू मुलांनी केवळ मित्रमैत्रिणी किंवा टाईमपास इतकीच मर्यादित न
राहता मुलांना रमवेल, त्यांचा भावनिक आणि
सामाजिक विकास होईल अशी हवी. शिक्षण किंवा परिक्षा इतकाच शाळेचा परिघ मर्यादीत न
रहाता, एकमेकांच्या सोबत, एकमेकांना
घडवत प्रयोग करणारे, विविध प्रयोगांना प्राधान्य देणारे
प्रकल्प शाळा किंवा त्या सदृश संस्थेतून होणे ही सध्याची गरज आहे.
निरिक्षणातून शिक्षण हा शिक्षणाचा सर्वात महत्त्वाचा पाया आहे. घराबाहेर
रांगत जाणाऱ्या बाळाला आपण ओरडतो किंवा नुसतेच डोळे मोठे करुन दाखवतो. आपल्या
हावभावातून त्याला घराबाहेर जायचे नाही हे समजते. पुढच्या वेळी, बाहेर जायचे झाल्यास ते आजुबाजुच्या माणसांचे आधीच
निरिक्षण करते. जर इतर लोकांच्या हावभावातून नकारात्मक भाव जाणवला नाही तर ते
त्याची कृती चालू ठेवते. पण जराजरी शंका आली तर ते तिथेच थांबते. वाचन आणि आकलनाची
पहिली क्रिया सुरु होते ती ह्या पायरी पासून. फक्त मोठे झाल्यावर हळूहळू ह्या
वाचनाचे आणि आकलनाचे संदर्भ बदलत रहातात. पण निरिक्षणातून वाचन आणि आकलन हे सुरुच
असते. म्हणूनच, गायकाच्या घरातील मूल लहानपणापासून गाऊ
लागते. चित्रकाराच्या घरातील मुले अगदी सहज रेषा आणि रंगांमधून चित्रे रेखाटू
शकतात. किंवा रोजच्या रोज व्यायाम अथवा खेळाडू पालकांच्या मुलांना खेळ, स्पर्धा आणि त्यासाठी लागणार्या मनाच्या तयारीची सवय असते. म्हणून जेव्हा
माझे मूल ठराविक पद्धतीने घडावे किंवा ठराविक सराव त्याने नियमित करावा अशी
पालकांची जेव्हा अपेक्षा असते, तेव्हा त्या पद्धतीने
पालकांनी आपल्या वर्तनात बदल करायला हवा. तसा वेळ पालकांकडे नसल्यास निश्चितच
शाळेतील शिक्षकांनी ही भूमिका घ्यायला हवी.
थोडक्यात शाळा ही फक्त सहा तास आणि आठ विषय यापुरती मर्यादीत राहून चालणार
नाही तर मुलांचे आवडते विषय, त्यांच्यासोबत चर्चा आणि
त्यावर विचार करण्यासाठी ठराविक मोकळा वेळ ह्या सगळ्यांचा शाळेच्या तासिकांमध्ये
अंतर्भाव व्हायला हवा. त्याप्रमाणेच, जसे एखादे मूल बोलायला
लागले की ते काही एकेक अक्षर क्रमाने किंवा बाराखडी प्रमाणे बोलत नाही. शब्दही
सुरुवातीला फक्त दोन अक्षरी, नंतर तीन त्यानंतर मोठे शब्द
उच्चारायला हवेत अशी आपली कोणाचीच अपेक्षा नसते. त्याप्रमाणेच लिहिताना मुलाला
समजतील, लक्षात रहातील अशी अक्षरे सुरुवातीला किंवा थेट छोटी
छोटी वाक्ये, नंतर शब्द आणि त्यातून आपोआप अक्षर असा
शिकण्याचा उलटा क्रम त्यांच्यासाठीही आनंददायी ठरतो.
वाचन आणि विचार व्यक्त करण्याची क्षमता आली की आपोआप ते लिहिण्यासाठी उत्सुक
होतील. जबरदस्तीने, शंभर वेळा गिरवून,
घोटवून जर अक्षरे लक्षात रहाणार असतील तर तीच अक्षरे नजरेखालून
शंभरदा गेल्यानेही लक्षात रहाणारच की! राहता राहिला प्रश्न लिहिण्याचा, तर आपणही त्याच अनेकदा लिहिण्याच्या प्रक्रियेतून यशस्वीरित्या बाहेर
निघालो असलो तरी आपले स्वत:चे अक्षर काही छापील नाही. किंवा माझ्याबरोबर शिकलेल्या
सगळ्यांची अक्षरे ज्या शिक्षकाने शिकवली अगदी त्यांच्या अक्षरासारखी नाहीत.
म्हणजेच, अक्षर कसे असावे हे जसे प्रत्येक मूल (खरं तर
त्याचा मेंदू) ठरवत असतो, तसेच नेमके काय शिकायचे, किती शिकायचे आणि कसे शिकायचे हे देखील तोच (मेंदू) ठरवतो! मग आपण काय
फक्त हातावर हात ठेवून बघत रहायचे का? तर नक्कीच नाही. पण
मुलांना अनुभवांचे अवकाश, त्यांच्या वैचारिक आणि भावनिक
प्रगल्भता व अभिव्यक्तीसाठी आपण पुस्तके आणि नानाविध प्रयोगांचा थोडक्यात कृतीचा
समावेश नक्कीच करु शकतो.
उदाहरण द्यायचे तर सुईत दोरा घालता न येणार्या आईच्या हातात आजीचा चष्मा
नेऊन देणार्या चार वर्षाच्या मुलाला समजते की जे नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही, तिथे चश्म्याचा वापर होऊ शकतो म्हणजे संकल्पना कळली आहे.
आईच्या हातातून सुई जमिनीवर पडली आणि तिला काही केल्या ती सापडेना, अशावेळी आपल्या खेळातून चुंबक घेऊन आलेली सहा वर्षाची मुलगी जमिनीवरून
हातातले चुंबक फिरवते आणि चुंबकाला चिकटलेली सुई पटकन आईला देते. ह्याचाच अर्थ
मुलीचा अभ्यास उत्तम सुरु आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही! शाळेमध्ये
वर्षानुवर्षे रवा आणि लोखंडाचा किस एकत्र झालेला आहे, तो
वेगळा करण्यासाठी करण्यात येणारा प्रयोग घरात/प्रत्यक्षात अनुभवला जातो का?
जेव्हा अनुभव देण्यासाठी प्रयोगशाळा तयार असेल तेव्हा मनाच्या टीप
कागदाने अनुभव घेणारेही तत्पर असतील. प्रत्येक प्रयोग यशस्वी झालाच पाहिजे असे
नाही. कारण फसलेल्या प्रयोगातूनही शिक्षण होणारच आहे.
अनुजा सामंत
No comments:
Post a Comment