दिवाळी आणि फराळ म्हणजे शोले मधल्या
जय-वीरूची जोडी म्हणायला हरकत नाही. इतके दिवाळी आणि फराळाचे जन्मजन्मांतरीचे घट्ट
नाते आहे. लाडू, करंजी, चकली, चिवडा, शेव, शंकरपाळे, अनारसे, कडबोळे हे सगळे जणू
हातात हात घालूनच जन्माला आले असावेत. फराळाने भरलेले ताट पाहिले की वाटते 'ही दोस्ती तुटायची
नाय' म्हणत सगळे एकदमच पोटात गडप व्हावेत.
ही फराळ तयार करण्याची पूर्ण प्रोसेस
तर आटपाट नगरातल्या कहाणी सारखी असते बरं का! लाडू तिथला राजा आणि चिरोटा
प्रधान. बाकी तिखट
गोड मंडळी असतातच दिमतीला. दिवाळीच्या चार ही दिवसात हे फराळाचे पदार्थ आपल्या
जिभेवर, पोटावर पर्यायाने आपल्या मनावर राज्य करतात. त्यात जर आपल्या आजी, आई यांच्या हातांचा सुगंध मिसळला
असेल तर माझ्यासारख्या सासुरवाशिणीसाठी ते 'सोने पे सुहागा' ठरते. फराळाच्या चवीसोबत त्यांच्या
मायेचा खमंगपणा त्यात मिसळलेला असतो. म्हणूनच दिवाळी संपली तरी ती चव जिभेवर
रेंगाळत राहते आणि आपली खुमारी टिकवून ठेवते.
मला अजूनही आठवतेय, वसुबारसेच्या दिवशी आजी फराळ करायला
सुरवात करायची. पहिला मान असायचा करंजीचा. नैवेद्याच्या पाच करंज्या झाल्या की
करंजीचा पहिला घास गाईला मिळायचा आणि मग मला. करंजीच्या उरलेल्या पिठाचे चिरोटे
केले जायचे. मला चिरोटा म्हणजे अनेक साड्या एकावर एक नेसलेली एखादी ठमाकाकू
असल्यासारखा वाटायचा. दुसर्या दिवशी मान असायचा लाडूचा. बेसन आणि रवा लाडू आजी आणि
मामी मिळून बनवायच्या. आजीकडे बाईसाब नावाची एक मदतनीस होती. लाडू झाले की ती
माझ्या दोन हातात दोन दोन लाडू देवून माझी दृष्ट काढायची. तिचा भारी जीव होता
माझ्यावर. कायम मला म्हणायची,"
गांगुबाय लई मोटी हो, डागदर हो पण मला सुई मारू नको हा.."
डागदर तर काही मी झाले नाही आणि ती ही बिचारी काळाच्या पडद्याआड
गेली...पण आजही लाडू करताना तिचे भोकरासारखे मायाळू डोळे आणि कोपरापर्यंत गोंदलेले
हात आठवतात. लाडूंची
अजून एक मजा अशी असायची की रव्याचा लाडू जमला तर जमला, नाहीतर इतका कडक व्हायचा की बत्त्याने फोडून खावा लागायचा. मग मी तो
माझ्या हक्काच्या सवंगड्याला आमच्या चंद्री गायीच्या खोंडाला बाळयाला खायला
घालायचे. माझ्या वाट्याचे अर्धेअधिक लाडू त्यानेच खाल्ले असावेत.
त्या दिवसात वासुदेव, कुडमुडया जोशी, खंडोबाचा वाघ्या, नंदीबैलवाला असे सगळे घरी यायचे. त्यांना त्या खुळखुळ्यासारख्या वाजणार्या करंज्या देताना जाम मजा यायची. डोक्यावर हात ठेवून हे लोक तोंडभरून आशीर्वाद द्यायचे, तेव्हा तर जगात भारी असल्यासारखे वाटायचे. त्यांच्याकडच्या आशीर्वादाचे मोल आज ही करता येणार नाही. कपाळावर टेकवलेल्या चिमूटभर गुलाल किंवा भंडार्याची सर जगातल्या कुठल्याच मेकपला येणार नाही.
कोल्हापूरला मात्र वेगळीच रीत होती.
फराळाचे सगळे पदार्थ एका ताटात भरून ते ताट हाताने विणलेल्या रूमालाने झाकायचे आणि
तो खजिना गल्लीतल्या शेजारी पाजारी नेवून द्यायचा. तसा तो खजिना आमच्याही घरी
यायचा आणि एकाच पदार्थाच्या किती निरनिराळ्या चवी असू शकतात याचा शोध लागायचा.
पुडाची वडी किंवा कोथिंबीरीची वडी हा खास फराळाचा पदार्थ असायचा. आणि प्रत्येक
घराबरोबर या पुडाच्या वडीची चव बदलत असे. चिवडा या चमत्काराबद्दल तर काही बोलायलाच
नको. भाजक्या पोहयांचा, तळलेल्या पोहयांचा, पातळ पोहयांचा,दगडी पोहयांचा, भवानी
पोहयांचा असे वेगवेगळे चिवड्याचे बकाणे मारून खेळायला पळताना जाम मजा येत असे.
खरी धमाल तेव्हा यायची जेव्हा चकलीच्या एकेका तुकड्यासाठी भांडणे सुरू व्हायची किंवा लाडूंच्या डब्याने तळ गाठलेला असायचा. चिवड्याच्या तळाशी फोडणीचा खमंगपणा उतरायचा. तेव्हा खरा फराळ हवाहवासा वाटू लागायचा. करंजी तर केव्हाच संपलेली असायची आणि मग उगाच भोंडल्यातले करंजीच्या सपिठीचे गाणे आठवायचे. त्याबरोबर आठवायचे खेळायला मिळणारे माहेर आणि कोंडून ठेवणारे सासर...माझ्या नशिबाने मला दोन्हीकडे 'माहेरच' मिळाले. पण तरीही दरवर्षी दिवाळीचा फराळ करताना या सार्या आठवणी ताज्या होतात. म्हणतात की जसजसा पदार्थ मुरत जातो, शिळा होत जातो तसतशी त्याची चव किंवा खमंगपणा अजूनच वाढत जातो. आपल्या आठवणींचे पण तसेच असते कदाचित...जसजशा जुन्या होत जातात तसतशा अजून खुमासदार होत जातात. आणि आपल्या चवींची साठा उत्तराची कहाणी सुफळ रीतीने जपत राहतात.
मानसी चिटणीस
No comments:
Post a Comment