शिवजयंती सोहळा


आई भवानीच्या कृपेने, आशीर्वादाने आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीने शिवजयंतीचा सोहळा ३१ मार्च रोजी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. जेव्हा तुम्ही तुमच्या महाराष्ट्र, मातीपासून दूर असता; तेव्हा आजच्या आणि पुढल्या पिढीला महाराजांचे शौर्य, त्यांच्या गोष्टी, त्यांचे राजकीय डावपेच आणि राज्यासाठी केलेली वणवण हे सगळ्यांना कळणे फार महत्त्वाचे आहे. शिवाजी महाराजांनी जसा लोकांना एकत्र आणून राज्य उभा करण्याचा ध्यास घेतला होता, तसाच काहीसा छोटासा प्रयत्न बंगलोर मित्रमंडळाने सर्व बंगलोरमधील मराठी बंधूभगिनींना एकत्र आणून शिवजयंती उत्सव साजरा करून केला. संस्कार रुजवणे आणि संस्कृतीचा वारसा पुढे नेणे हे यापेक्षा काही वेगळे नाही हे सर्वांना मनोमन जाणवले. ह्या कार्यक्रमातील काही वैशिष्ठ्ये पुढील प्रमाणे-

श्वेता पानवळकरने नेहेमीप्रमाणे तिच्या खुमासदार निवेदनाने शिवजयंती सोहळ्याची प्रस्तावना केली.

सोहळ्याची सुरुवात श्री. व सौ. कांबळे ह्यांनी दीप प्रज्वलन करून झाली. 


एकीकडे कॅरम आणि टेबल टेनिसच्या स्पर्धा रंगात आल्या होत्या; तर दुसरीकडे समूह गान, लेझीम नृत्य, छोटुकल्यांचं नाटक ह्याची लगबग सुरू होती.दीप प्रज्वलनानंतर मित्र मंडळाचे सदस्य कै. विजय जोशी  ह्यांना सर्व उपस्थितांनी २ मिनिटे शांत राहून श्रद्धांजली अर्पण केली.

सौ. ज्योती कुलकर्णी आणि त्यांच्या ग्रुपतर्फे समूहगान सादर करण्यात आले. ह्या सदरामध्ये ३ गाणी सादर करण्यात आली. त्यामध्ये मिहिका फडके आणि श्रद्धा कमते या चिमुकल्या मुलींनी सुद्धा गाणी सादर करून योगदान दिले.निमिष बोडस, राजस डहाळे आणि अनन्या वझे ह्यांनी सादर केलेले "अफझलखानाचा वध" हे नाटुकले अफलातून होते. पुढच्या पिढीला ह्या गोष्टी माहीत असणे आणि त्यांच्या मनावर त्याचा खोलवर परिणाम होऊन त्याबद्दल अभिमान वाटावा असे हे सादरीकरण होते. ह्या छोट्या मावळ्यांचे कौतुक करावं तितके थोडेच...

ह्या सुंदर नाटुकलीनंतर मंडळींच्या अपेक्षा खूपच वाढल्या होत्या आणि तेव्हाच "कुण्या गावाची... " ह्या गाण्यावरच्या लेझीम नृत्याची वेळ झाली.


शिवजयंती उत्सव प्रतिवर्षी दिमाखात साजऱ्या करणाऱ्या मित्रमंडळ बेंगलोरने २०१९ च्या शिवजयंती सोहोळ्यात प्रथमच लेझीम प्रात्यक्षिक करायचे ठरवले. या नावीन्यपूर्ण कार्यक्रमाला अर्थातच सरिता, स्वाती, अस्मिता, स्नेहा, भारती, रूपाली, ज्योती, अपर्णा, अनघा या उत्साही सदस्यांनी भाग घेऊन चांगलीच दाद दिली. आणि मग पल्लवीच्या मार्गदर्शनाखाली, अनुष्काच्या नृत्य संकल्पनेतून मुंबई-पुणे-मुंबई- ३ या चित्रपटातील “कुण्या गावाची...” या गाण्याच्या ठेक्यावर लेझीमच्या सरावाला सुरुवात झाली. मुख्य म्हणजे या पथकाला वयोगटाची मर्यादा नसल्यामुळे अगदी ३० वर्षांपासून ६० वर्षांपर्यंतच्या सदस्या यात सहभागी झाल्या. २-३ आठवड्याच्या सरावामध्ये सगळ्यांचा सूर छान जुळून आला. अगदी शेवटी संगमनेरकर काका, आभा, अनुष्का हे ध्वजधारक सरावात सामील झाले आणि लेझीम संचाला पूर्णत्व आले. पारंपरिक वेशभूषेत लेझीम सादर झाले. सर्व कलाकारांचा समन्वय, अचूकता, जोरदार उत्साह, दमदार जोश, शब्द - नृत्य - संगीत यांचा मस्त ठेका यांचा परिपाक असलेले लेझीम प्रात्यक्षिक सर्वच प्रेक्षकांच्या मनाला खूपच भावले. शिट्टया आणि आरोळ्यांच्या आवाजात लेझीम प्रात्यक्षिक संपले असे अस्मिता ओक (मित्रमंडळ बंगळुरूच्या माजी अध्यक्षा व लेझीम परफॉर्मर) यांनी आपले मनोगत मित्रमंडळच्या फेसबुक पेजवर मांडले.


ह्या लेझीम नृत्य प्रकारानंतर श्वेताने ‘शिवाजी म्हणतोहा छोटासा खेळ लहानग्यांबरोबर खेळला. विशेष म्हणजे ह्या खेळाला मोठ्यांनीसुद्धा तितक्याच उत्साहाने दाद दिली.


शिवाजी म्हणतो ह्या खेळानंतर सर्व उपस्थित लोकांनी रुचकर आणि स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेतला.

जेवणानंतर बक्षीस समारंभ पार पडला आणि मान्यवरांनी सर्व विजेत्यांचे, स्पर्धकांचे आणि वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या सादरीकरणामध्ये सहभागी झालेल्या मित्र मंडळाच्या सदस्यांचे आभार मानले.

विजेत्यांची नावे:

कॅरम:
पुरुष: राहुल पटवर्धनमहिला: भाग्यश्री कुलकर्णीटेबल टेनिस:
विजेते: दत्तप्रसाद चंदावरकर 

उप विजेते: स्वप्नील फडके
काही नाती जपायची असतात... तर काही पुढच्या पिढीसाठी योग्य रीतीने आणि योग्य वेळेत उलगडायची असतात. तसेच काहीसे शिवरायांचे, आपल्या मातीचे, महाराष्ट्राचे आणि आपले नाते असते...

जशी जशी आपली मुलं मोठी होतात तसं तसं आपल्या मातीशिवाय त्यांना त्यांच्या मातीशी घट्ट वीण विणायला शिवरायांच्या गोष्टींसारखंच सूत हवं, कितीही दूर असलो तरी आपल्या मातीशी इमान राखायला शिवबांच्या संस्काराशिवाय अजून काय हवं...

जय शिवाजी ।। जय महाराष्ट्र||

अनिकेत जोशी

No comments:

Post a Comment