श्रावणाचं आपल्याकडे फारच कौतुक केलं जातं. इंग्रजी भाषेत म्हणतात ना over rated तसंच काहीसं श्रावण महिन्याबाबत आहे असं
मला उगीचंच वाटत असे....म्हणजे आता वाटतंय की उगीचच वाटत असे. तेव्हा मात्र माझं
मत मला शंभर टक्के खरं वाटत होतं..... पण मला वाटतं तेव्हा माझी आणि श्रावणाची
भेटच झाली नव्हती. ती भेट घडवून आणायला माझ्या आईची एक मैत्रिण कारणीभूत ठरली.
ती मावशी व्रत-वैकल्य नकोत या मताची तर आई मनापासून व्रत-वैकल्य करणारी.
यावरून त्या दोघींमध्ये मतभेद झालेले देखील मला आठवतंय. तिचं कुटुंब काही वर्षांनी
अमेरिकेला स्थाईक झालं. साधारण दहा एक वर्षांनी ती अचानक घरी आली.....तो श्रावणाचा
महिना होता. ती आली तेच आरडाओरडी करतच........'नीले
श्रावणाची सवाशीण आलेय ग तुझ्या घरी.....उद्या शुक्रवार आहे. तेव्हा उद्या छान
कडबू, आळूवड्या, मसाले भात, बटाट्याची भाजी, चटणी, कोशिंबीर,
मटकीची उसळ आणि पुऱ्या असा खास श्रावणी बेत झाला पाहिजे.....तयारीला
एक दिवस हवा म्हणून आज आले सांगायला, नाहीतर उद्या थेट
जेवायलाच धडकले असते.....आणि हो संध्याकाळी मसाले दूध आणि तुझी स्पेश्यालीटी
मसाले चणे...... इतके वर्ष अमेरिकेत राहून आपल्या श्रावणाला खूप मिस
केलं ग.....तेव्हा सगळी कसर भरून काढणार आहे.....आणि हो मी यंदा चक्क तुझ्यासारखा
लाखोलीचा नेमही केला आहे.’
हे इतके सगळे पदार्थ असतात श्रावणी शुक्रवारी हे काही नवीन नव्हतं. पण या
सगळ्याचं इतकं अप्रूप वाटू शकतं हे त्या दिवशी कळलं. त्या दिवशी खऱ्या अर्थाने
श्रावणाची आणि माझी भेट झाली आणि श्रावण over rated नाही तर आपण त्या महिन्याला पुरेपूर न्याय देतो हे ही समजलं. पावसाचा भर
ओसरून रिमझिम सुरु झालेली असते. माती भरपूर पाणी प्यायल्याने तृप्त होऊन आपल्याला
फुलं, पानं, भाज्यांचं सढळ हाताने दान
देत असते......ते दान न स्वीकारता सृष्टीच्या वैभवाचा अपमान करू, तर आपल्यासारखे करंटे आपणच.....या विचारासरशी मी श्रावणाच्या जी प्रेमात
पडले ती आजतागायत.
श्रावणात ना धड पाऊस ना उन्हं ना थंडी....या मधल्या काळात तब्बेतीची जास्त काळजी घ्यावी लागते म्हणून उपासतापास, व्रतवैकल्य केली जातात. आमच्याकडे श्रावणात कांदा-लसूण खात नाहीत....या मागचं हे कारण माहिती नव्हतं. तोवर आई सांगते म्हणून खायचं नाही इतकेच माहिती होते. पण कारण समजल्यावर सगळे मनापासून केलं जाऊ लागलं. शुक्रवारच्या मसाले दूध-चण्यातली......सोमवारच्या धान्य फराळातली....मजा समजू लागली. सृष्टीतला रसरशीत ताजेपणा कळत होता पण तो आता मनाला भिडू लागला होता, जाणवू लागला होता.
त्या वर्षी मावशीने लाखोली व्हायचा नेम केला होता आणि तो तिने एक लाख रुपये
दान देऊन पूर्ण केला होता. आम्ही लहान असतांना आईही लाखोली वाहात असे. लाखोली
वाहण्यामागे देवधर्म कमी तर सामाजिक भान जास्त असते. पावसापाण्याचे बाहेर कुठे
जाऊन देवाधर्माचे काही करणे शक्य नसते. म्हणून मग घरातूनच दान-धर्म केला
जातो......कसलीही लाखोली वाहिली जाऊ शकते........लाख गहू, तांदूळ, साखर, कडधान्य,
डाळी, कसलेही दाणे किंवा इच्छेनुसार पैसे
देवाला वाहून ते दान केले जातात. एकशे आठाचाही नियम केला जातो. यात १०८ पाने किंवा
फुले वाहिली जात असत.
माझ्या आजीने यामागचं कारण ही सांगितले होते.....श्रावणात खूप फुलं येत. ती
फुलं मातीत पडून अजून चिखल होऊ शकतो. पण जर हीच पान-फुलं देवाला वाहून, निर्माल्य म्हणून झाडाखाली टाकली तर त्याचा खतासारखा उपयोग
होऊ शकतो. पानं-फुलं पाण्यात वाहून जाऊन पाण्याचा नाश करण्यापेक्षा मातीत टाकून
मातीला सुपीक बनविता येऊ शकतं. हा विचार त्या दिवसापासून डोक्यात अगदी फिट्ट बसला! आपल्याकडच्या प्रत्येक नेम नियमामागे सामाजिक किंवा पर्यावरणाशी
असणारी बांधिलकी आहे. हे सगळं कळण्यासाठी माझी आणि श्रावणाची अशी भेट व्हावी
लागली.
मनीषा सोमण
No comments:
Post a Comment