नेहमीच नवनवीन विषयांवर कार्यक्रम
सादर करणार्या मित्रमंडळ बेंगलुरू ने १२ डिसेंबर २०२१ रोजी अशीच एक अनोखी भेट आपल्याला
दिली. स्पार्क जॉय इन युवर होम.....बाय ऑर्गनाइज़िंग - अर्थात घरातील
प्रत्येक गोष्ट जागच्या जागी ठेवल्यामुळे घरात येणारा, जाणवणारा आनंद.
‘घर आवरणे’ हा कोणाचा व्यवसाय असू
शकतो यावर सुरुवातीला विश्वासच बसत नव्हता. पण प्राची चावला यांची कंपनी Smiling
Spaces हेच काम
करते. जगात सध्या प्रसिद्धी पावलेली Marie Kondo या
प्रसिद्ध जपानी Professional Organizer हिच्या कंपनीचे मार्गदर्शन प्राचीने घेतले
आहे. त्यांच्या
कामाचे स्वरूप, त्या देऊ करीत असलेल्या सर्विसेस तसेच आपले आपण घर आवरताना कोणत्या
गोष्टींची काळजी घ्यायला हवी याबद्दल या कार्यक्रमातून माहिती आपल्याला मिळाली. हे घर
आवरण्याचे तंत्र 'Kon Mari' या नावाने ओळखले जाते.
स्नेहा केतकरांनी पाहुण्या प्राची
चावला यांची ओळख करून देताच लक्षात आले की आजचा विषय हा आपल्या अगदी जीवाभावाचा
आहे. घरभर पसारा किंवा पसार्यातच घर हे काही आपल्याला नवीन नाही. त्यामुळे प्राची
यांनी त्यांच्या प्रेझेंटेशन मध्ये केलेले मार्गदर्शन खरोखरीच विचार करायला
लावणारे आहे. बैठकीची खोली,
झोपण्याची खोली, स्वयंपाकघर अशा प्रत्येक
खोलीच्या आवराआवरीसाठी त्यांनी सखोल विचार केलेला आहे. ज्या वस्तू आपण सहा महीने - एक वर्षापासून वापरत नाही त्यांचे
काय करायचे, नेहमी लागणार्या, कधीतरी लागणार्या, अशा असंख्य वस्तू कुठे आणि कशा ठेवायच्या, रोज थोडा
वेळ किंवा सुटीच्या दिवशी जरा जास्त वेळ देऊन आपण घरातल्या अनावश्यक पसार्याचे
कसे व्यवस्थापन करू शकतो यासंबंधी त्यांनी अनेक टीप्स दिल्या.
अगदी कपड्यांच्या घड्या कशा कराव्यात, म्हणजे कमी जागेत
जास्त कपडे कसे ठेवता येतील, किंवा आहेत ते कपडे कसे एका
दृष्टीक्षेपात नजरेस पडतील हे देखील त्यांनी सांगितले. मुळात
त्यांचा भर आहे तो आवश्यक तेवढेच खरेदी करण्यावर. खूप वेळा
आपल्याकडे कोणते कपडे आहेत हेच आपण विसरतो. कारण ते कपाटात कुठेतरी मागे दडलेले
असतात. आजच्या
Use and Throw च्या जमान्यात आपण वस्तुच्या गरजेचा
विचार न करता त्यांची खरेदी आणि साठवण करत असतो. हेच कसे टाळता येईल यावरही प्राची
चावला यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या साध्या-सोप्या टीप्स वापरूनही जर घर
मनासारखे आवरले जात नसेल तर ‘स्मायलिंग स्पेसेस’ च्या व्यावसायिक मदतनीसाला जरूर
बोलवावे.
हा कार्यक्रम प्रेक्षकांपर्यंत
पोचवण्यासाठी श्वेता पानवलकर आणि वैभव काळे यांचे तंत्रसहाय्य लाभले. असेच
वैविध्यपूर्ण कार्यक्रम मित्रमंडळकडून सादर व्हावेत यासाठी खूप खूप शुभेच्छा.
ही मुलाखत पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:
https://www.youtube.com/watch?v=oHGdmN537go
-*-*-*-*--*-*-*-*-
मानसी नाईक
No comments:
Post a Comment