सोशल

 

(स्वातंत्र्य आणि समानते च्या भ्रामक कल्पनेवर, निसर्गनिर्मित अंतर्बाह्य अंतर मिटवत चाललेल्या बुद्धी, विचार, वाणी, लेखणीला समर्पित..)



नसावीत कोणतीच नाती

इतकी सोशल

इतकाच भार त्यावर द्यावा

जितका त्यास सोसेल..

 

हर एक क्षण

नसावा गर्दीतला

कधीतरी त्यालाही

मोकळा श्वास घेऊ द्यावा...

 

आणि,

नसतातच क्षण न् क्षण

जगण्यातले भरीव

रिकामे क्षणही देतात

भरुन उरल्या क्षणांची जाणीव...

 

नसतातच  मुळी बोलक्या

सगळ्याच भावभावना

श्वासाइतक्याच खऱ्या तरीही

जाणिवेतल्या संवेदना

 

बद्धतेचे काच बांधून

सोसू नयेत वेदना

पण तरीही,

कुंपणाचे भान सुटून

आकाश ही कवेत येईना...



सौ विदुला जोगळेकर



No comments:

Post a Comment