सावलीचं सुख

 


आई, Don't get nervous! You are not fluent in English but you can understand the language very well,  Be confident!

जा आत, तुझी flight take off  होईपर्यंत मी बाहेरच थांबतोय.  बोर्डींग पास मिळाला की फोन कर. सीटवर बसल्यावर मोबाईल एरोप्लेन मोडवर टाक. बारीक सारीक सूचना करत लेकाने बेंगलोर एअरपोर्टच्या Departure door पाशी तिचा निरोप घेतला. बॅग, गळ्यातील पर्स, हातातला मोबाईल सावरत ती गोंधळलेल्या मनःस्थितीत आत प्रवेश करती झाली. काचेच्या दारापलीकडे  लेक दिसत होता फक्त! दीर्घ श्वास घेत तिनं स्वतःला स्थिर केलं. आजूबाजूला नजर टाकून भल्या मोठ्या चकचकीत परिसराचं दडपण तिनं झुगारुन दिलं.

लेकानं दिलेल्या एक एक सूचना आठवत तिनं सगळ्या प्रोसिजर पार केल्या. बोर्डींग पास घेउन गेटवर येउन बसत तिनं सुटकेचा निश्वास सोडला. हुश्श... जमलं की सगळं.. उगीचच घाबरत होतो आपण. ती मनाशीच पुटपुटली. एअरपोर्टवर येईपर्यंत, 'मी गेले असते रे ट्रेननेच', असं तिचं तुणतुणं चालूच होतं. पण लेकानं ऐकलं नाही. फ्लाईटनीच जायचं आणि ते ही एकटीनं, म्हणजे भीती जाईल. गोड बोलून, विंडो सीटचं, जवळून दिसणाऱ्या आकाशाचं मिष दाखवत तिच्या गळी उतरवलंच आपलं म्हणणं. शेवटी ती ही तयार झाली या पहिल्या वहिल्या विमान प्रवासाला.

दाराबाहेर थांबलेल्या लेकाला तिनं 'जा' म्हणून फोनवर सांगितले. मी आता करेन सगळं मॅनेज. तिचा confidence वाढलेला तिच्या आवाजावरून त्याला ही जाणवला. 'बघ, जमलं ना सगळं, उगाच घाबरत होतीस, भाषा, वावराचा बाऊ करत होतीस. बाहेरुन सगळचं पाॅलिश्ड वाटत असतं ग! पण प्रत्यक्षात तिथं गेल्यावर समजतं, आपल्याशी साम्य सांगणाऱ्या खूप गोष्टी पण असतातच ना! फक्त आपण आत्मविश्वासाने तिथंवर जायला हवयं. आहेच माझी आई डॅशिंग! विंडो सीट आहे. मस्त एंजॉय कर प्रवास.' आता मात्र लेकानं खरंच निरोप घेतला.

ती मनाशीच हसली. असंच, हो अगदी असंच कधीतरी मागं २०, २२ वर्षांपूर्वी घडलेलं होतं. पात्रं ही दोनच होती पण भूमिका वेगळ्या होत्या. ती जडावलेली दुसऱ्या गर्भारपणाने आणि तो तिचं छोटंसं पिलू. अगदी तिच्या उबदार जगात अलगद वावरणारं. शिशुवर्गात ॲडमिशन झाल्यावर त्याला शाळेत, बाहेरच्या जगात एकटं सोडताना तिची घालमेल आणि त्याचं असुरक्षित वाटणं, दोघांनीही असंच अनुभवलं होतं. त्याला नव्या दप्तर, बाटली, मित्रमैत्रिणींचं अमिष दाखवत तिनं शाळेत जाण्यासाठी तयार केलं होतं. तो ही तिचं बोट धरुन नाचत शाळेच्या आवारात गेला.



पण त्या जगात प्रत्यक्ष गेल्यावर मात्र त्याचे  कावरेबावरे होणे तिलाही अपेक्षितच होते. आईचं बोट सोडताना त्याचं सगळं अवसान गळालं. 'तू नको ना मला सोडून जाऊ. मला नको शाळा, दप्तर,  मित्र.' त्याची इवलीशी मिठी तिच्या पायाला बसली. तिचं अवघडलेपण लक्षात घेन बाईंनीच त्याला उचलून घेतलं. 'मी आहे ना.. आपण खुप मजा करु... नवे मित्र, नवे खेळ, नवा खाऊ.' त्या त्याची समजूत घालत आत घेन निघाल्या. 'नको मला काही... आई हवीय.... आई नको जाऊस तू मला सोडून..' त्याच्या नाकडोळ्यातलं पाणी एक होन सांडून गेलं. ती गेलीच नाही घरी. बसून राहिली पारावर. दोन तास तर आहे शाळा. ती ही पहिल्यांदाच त्याच्यापासून इतका वेळ लांब राहीलेली. 'नकोच जायला. . घेनच जाऊ पिलाला'. तिचा पायच निघाला नाही. आठच दिवसात तो शाळेत रुळला. नवं जग, नवी क्षितिजं त्याला साद घालू लागली, रुंदावत राहीली.

अशाच एखाद्या क्षितिजाशी आता तो तिची 'आई' होन काळजी घेतो. त्याच्या उंचावलेल्या खांद्यावरुन, त्याच्या मोठ्या झालेल्या सावलीत, आपली प्रौढ सावली मिसळून ती विसावू पाहते. निमित्तं काय मिळतच राहतात आठवणींना. मागे पडून गेलेले हळवे, ओले क्षण परत माघारी दुसऱ्या रुपात येन भेटून जातात.

तिच्या फ्लाईटची announcement नाजूक आवाजात होते. ती हलकीशी होन फ्लाईटच्या दिशेने चालू लागते. विंडो सीटवरुन जेव्हढं येईल तेव्हढं आकाश कवेत घेण्यासाठी.............

सौ. विदुला जोगळेकर



No comments:

Post a Comment