‘कट्टा’ साठी नवीन लेखमाला सुरू करताना अनेक विषय डोळ्यासमोर
होते. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात वाचकांना क्षणभर विसावा देणारा
‘कट्टा’ जास्तीत-जास्त विषयांना
स्पर्श करणारा असावा हीच आम्हा सर्वांची इच्छा होती.
विविध विषयांचा विचार करतानाच अचानक लक्षात आले की सामान्य वाचकांना
माहिती असलेल्या सुप्रसिद्ध हिंदी साहित्यिकांशिवाय, हिंदी साहित्याला
समृद्ध करणारे इतर अनेक लेखक, कवी, कथाकार
आहेत, जे हिंदी भाषिकांमधे ओळखीचे आहेत, परंतु सर्वसामान्य भारतीय वाचक त्यांच्यापासून काहीसा लांब राहिला आहे.
अशाच काही लेखक-कवींची ओळख करून देणारी मानसी
नाईक यांची नवी लेखमाला घेऊन येत आहोत ‘ओळख हिंदी साहित्यविश्वाची’.
लहानपणापासून जीवनाला स्पर्शून जाणारे अनेक अनुभव! त्या अनुभवांचे
शिल्पकार ठरणारी सहवासात आलेली लहान-मोठी माणसे मनाच्या कप्प्यात
खूप मोठी ‘ठेव’ ठेवून जातात. त्यांचा मागोवा कधी प्रफुल्लित करतो तर कधी तेव्हा बोचलेल्या काट्यांचा पुन:प्रत्यय देतो. कधी रेशीमधाग्यांच्या मुलायम गोफात मनाला
गुंफवून टाकतो तर कधी शब्दातीत अवस्था करून टाकतो. अनुभवांची
ही विविधता वाचकांसमोर व्यक्त करणारी शर्मिला पटवर्धन फाटक यांची ‘जीवनस्पर्शी’ ही लेखमाला या वर्षी आपल्या भेटीला येते
आहे.
“सृष्टीमध्ये बहु
लोक, परिभ्रमणे कळे कौतुक।” समर्थ रामदासस्वामींच्या
या वचनाला जागून मनमुराद भटकंतीला बाहेर पडावे. ईश्वराने निर्माण
केलेली ही सृष्टी म्हणजे एक खजिना आहे. तो आकळायला हवा असेल
तर डोळे आणि कान उघडे ठेवून सर्वत्र हिंडायला हवे. ठराविक चाकोरीबद्ध
फिरणे कामाचे नाही. अशीच ‘डोळस भटकंती’
करणारे आशुतोष बापट त्यांचे आगळे-वेगळे अनुभव
त्यांच्या लेखमालेतून आपल्यासमोर मांडत आहेत.
'ग
गझलेचा'
या लेखमालेत दर महिन्याला ख्यातनाम
गझलकार सुरेश भट यांच्यापासून ते अलीकडच्या काळातील गझलकारांच्या निवडक गझलांचे रसग्रहण
वाचायला मिळेल. हया लेखमालेसाठी युवा कवी आणि गझलकारा कल्याणी आडत लेखन करत आहेत.
सतत नावीन्याची ओढ असणारे कट्टाचे वाचक या नव्या आणि वेगळ्या लेखमालांना
भरभरून प्रतिसाद देतील ही अपेक्षा.
कट्टा टीम
No comments:
Post a Comment