भाग १
एक छानसं घर... तळ्याकाठी!
अशी अगदी सर्वांना आवडणारी कविकल्पना
असते...पण चक्क बंगलोरसारख्या दाट वस्तीच्या महानगरात रहात असून माझं घर खरंच एका
सुंदर तळ्याकाठी आहे.
आणि थोडेथोडके नाही - बंगलोरमध्ये हे
स्वप्न पूर्ण झालेले लाखभर तरी लोकं असतील... पाण्याशप्पथ! बंगलोरला बगिच्यांचं
शहर म्हणून ओळखलं जातं... बगीचे आहेतच, पण
त्या मानाने इथल्या तळ्यांना तेवढा भाव मिळाला नाही; नाहीतर
इथे भारतातल्या कोणत्याही शहरांपेक्षा जास्त तळी आहेत; २०० तरी
आहेतच... एके काळी १००० होती; पण
तेव्हा बंगलोर हे शहर म्हणून इतकं मोठं नव्हतं. या भागातल्या हजारो खेडी -
वस्त्यांकरता हे पाण्याचे जलाशय इथल्या लोकांनी उतारावर बांध घालून तयार केले आहेत,
पार १२व्या शतकापासून. समुद्रसपाटीपासून ९२० मीटर उंच पठारावरच्या या शहरात नदी नाहीच. पावसाचं पाणी जमिनीच्या
सखल भागात जमवून वापरण्याची इथली पद्धत आहे. वर्षातले ८ महिने
तरी या तळ्यात पाणी राहील इतकं पाणी जमतं. इथल्या गावांच्या रचनेला 'कोटे-पेटे-केरे' (संरक्षक भिंत-बाजारपेठ-तलाव) असं
म्हटलं जातं.
माझ्या घराच्या मागे 'विभूतीपुरा केरे' आहे. विभूतीपुरा हा
भाग इथल्या मठाचा भाग. या भागाचा इतिहास १३व्या शतकापर्यंत
मागे जातो. तसा उल्लेख शिलालेखातही सापडलाय.
विभूती केरे अंतर्गोलाकृती बंधारा - इगल आय व्ह्यू
मी घर घेतल्यावर मागच्या तळ्याभोवती (१.५ किमी) मॉर्निंग वॉक - जॉगला जायला सुरुवात केली. शहरात
घराच्या इतक्या जवळ विस्तृत खुला भाग असणं हे केवढं भाग्याचं! त्यात या तळ्याच्या
एका बाजूला पब्लिक सेक्टर कंपनीच्या मालकीची मोठी जागा आहे. तिथे जंगलच आहे आणि
अगदी जुनी दाट झाडी आहे. अशी नैसर्गिक हिरवीगार एक बाजू, ती
पण मनुष्य वावर नसलेली - काहीशी गूढ; त्यामुळे अधिक सुंदर
वाटते.
तळ्यावर जी लोकं सकाळी नियमित येतात
त्यांच्यापैकी काही स्थानिक कानडी बुजुर्ग रहिवाशांशी ओळख झाली. या तळ्याला दोन
कालवे दिसत होते; पाण्याचे inlet आणि outlet कॅनॉल असावेत. कुठला कोणता असं विचारलं
असता इथे कोणालाही त्याबद्दल माहिती नव्हती. पण त्या प्रश्नाच्या निमित्तानी
त्यांनी सरकार व जनता या दोघांना या तळ्याची देखभाल करत नाहीत म्हणून शिव्या घालून
घेतल्या. मला वाईट वाटलं... की यांना बेसिक माहितीही नाही, त्याबाबत
खेदपण नाही आणि उत्सुकतापण नाही!
मी एकदा कामाच्या निमित्तानी 'मिलिटरी कॅन्टोन्मेन्ट'च्या ऑफिसमध्ये
गेलो असताना तिथे भिंतीवर १०० वर्षांपूर्वीच्या नकाशावर
विभूतीपुरा केरे दिसलं. त्यात सर्व तळ्यांचा जो बंधारा होता तो अगदी स्पष्ट दाखवला
होता. मिलिटरीच्या दृष्टीने, सुरक्षेच्या दृष्टीने ते बंधारे
खूप महत्त्वाचे असतात याची जाणीव झाली. त्या निमिताने त्याचा उंच भाग - सखल भाग
याची पण कल्पना आली. गुगल मॅपमध्ये मी ह्या तळ्याचा आकार व व्याप पाहिला होता,
पण त्यात उंचसखलपणा, बंधाऱ्यांची बाजू व लांबी
काही दिसत नाही. शेवटी एका जुन्या मिलिटरी मॅपमुळे मला या तळ्याची नीट ओळख झाली.
तळ्याला उंच भागातून येणारे storm water drains पाणी देतात व
सखल भागाच्या शेजारून एक ओव्हरफ्लो कॅनॉल पण दिला आहे. कोणे एके काळी शेतीकरता
पाटातून पाणी सोडण्यासाठी बंधाऱ्याच्या खालून एक चालू बंद करता येणारी दगडी झडप
आहे. ही झडप/दरवाजा दगडी चिऱ्यानी उघडतो व बंद होतो. तो अवजड चिरा खालीवर
करण्यासाठी एक pulley आहे. १५व्या
शतकातील असावी... ग्रॅनाईट दगडाचे चिरे तासून आकार देऊन त्या pulley करता एक ८ फुटाची देखणी देवळी उभारली गेली आहे.
स्लुईस ग्रॅनाईट गेट बांधणी (१५ वे शतक)
त्या देवळीच्या वरच्या
चिऱ्यांवर महिरप व गजलक्ष्मी पण कोरली आहे. गेले ४०० ते ५०० वर्षं ही देवळी इथे उभी आहे - पण अगदी ताठ आणि सरळ उभी आहे...
स्थानिक सरकारनी भोवतीने घातलेले तारेच्या कुंपणाचे ८ फुटी
अँगल मात्र सरळ राहात नाहीत व ठिकठिकाणी खचतात - अशी अवस्था.
शहरातल्या नागरिकांना पाणी पाईपनी मिळतं, सांडपाणी नेण्याची व्यवस्था जमिनीखालून, पावसाचं पाणी बिल्डिंगच्या बेसमेंटमध्ये साचू नये यासाठी काँक्रिटच्या
भिंती असतात. अॅक्सिलरेटर पिळून कोणताही चढ सहज चढून जाता
येणाऱ्या गाड्या बुडाखाली असतात. साहजिकच या सगळ्यामुळे त्यांना शहराच्या
उंचसखलपणाबद्दल सहसा काही कल्पना नसते. पण एकदा उंचसखलपणाची जाणीव झाली की
आपल्याला शहर बघण्याचा चौथा आयाम मिळतो. (लांबी, रुंदी, उंची आणि 'खोली').
शहर बघताना उंची - खोली हे दोन वेगळे
आयाम होतात बरं का! बांधलेल्या इमारती - मंदिरं - टेकड्या - उड्डाणपूल -
पाण्याच्या टाक्या यांच्या उंचीचे अदमास-आलेख आपल्या डोक्यात असतात. अनेक शहरांची
ओळख त्याच्या स्काय-लाईनमुळे होते. पण उतार - खोली याची कल्पना सगळ्यांना
सामान्यपणे नसते.
मला चौथा
आयाम दिसल्यावर पाणी व्यवस्थापन व त्याचे स्थापत्य यातील तंत्र दिसायला लागले व
त्या संरचनेचा आनंद घेता यायला लागला. मग १६व्या शतकातील
सुभेदार केम्पेगौडाच्या काळात बांधलेले, शहरातल्या तळ्यांना
जोडणाऱ्या 'राज-कालव्यांची किंमत कळली. ब्रिटिश ऑफिसर सँकी
यांच्या काळात तेच काम अधिक मोठ्या प्रमाणात केले गेले हे जाणवायला लागले.
विभूतीपुरा तळ्यातून
दिलेल्या ओव्हरफ्लोच्या कॅनॉलमध्ये गाळ खाली बसून फक्त चांगलं पाणी पुढे जावं
यासाठी वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. पाणी जास्त झालं तर त्याचा बंधाऱ्यावर ताण येऊ
नये याकरता बांधलेला चंद्राकार बंधारा बांधला आहे. सुयोग्य ठिकाणी बांधलेली झडप,
तळ्यातल्या गाळानीच तळ्याच्या पात्रात घोड्याच्या नालाच्या आकाराचं
बेट बांधण्याची बहुपयोगी कल्पनांनी मी प्रभावित झालो.
गाळानं झालेले नालाकृती बेट - पक्ष्यांच्या प्रजननासाठी सोयीस्कर |
या तळ्यांच्याविषयी माहिती मला कॉलेजच्या
अभ्यास सहलीत मिळाली व ऐतिहासिक-भौगोलिक माहितीची पुस्तकं वाचून मी ती अजून
वाढवली.
२०१८ साली राज्य सरकारनी
प्रत्येक तळ्याला २ ते ४ कोटी एवढा
निधी तळ्याची स्वच्छता - डागडुजी - रखरखाव- सौंदर्यवृद्धी यासाठी दिला व
माझ्यासमोर अनेक दुर्लक्षित तळ्यांचे पुनरुज्जीवन सुरू झाले. तळ्याचे जलसंधारण व
व्यवस्थापन याबाबत १.५ वर्षाचे प्रात्यक्षिक घराजवळच बघायला
मिळाले.
तळे राखील तो पाणी चाखेल असं म्हणतात.
आता पाण्याचा नळ घराघरात आहे - त्याला २४ तास
पाणी आहे. ते तळ्यातले पाणी फारसे पिण्या-धुण्याच्या उपयोगाचे नाहीच. मग ती तळी
राखणाऱ्याला कोट्यवधी खर्चून मिळणार काय? याबद्दल पुढच्या
भागात बघू.
(क्रमशः)
No comments:
Post a Comment