काश्मीर फाईल्स - सुन्न करणारा, अस्वस्थ करणारा चित्रपट.
भूतकाळातल्या भीतीदायक दृष्यांनी डोळे मिटायला लावणारा आणि भविष्यातल्या भीतीकडे
बघण्यासाठी डोळे उघडणारा चित्रपट.
इस्लामच्या क्रूर वरवंट्याखाली देशोधाडीला लागण्याच्या हिंदूंच्या हजारो
वर्षांच्या घटनांमधली एकतरी घटना जशी घडली तशी दाखवण्याचं धाडस करणारा चित्रपट.
'एका धर्माचे लोक', 'काही धार्मिक घोषणा', 'फक्त एका गटाच्या माथेफिरुंचं काम
असली' कुठलीही ढोंगबाजी न करता काश्मीर इस्लामवेडाने कसं पिसाटलं होतं हे धीटपणे
मांडणारा चित्रपट.
१९९० साली काश्मीरमध्ये हिंदुवंशविच्छेद म्हणजे 'अगा जे घडलेची नाही' असं भासवणाऱ्या धर्मवेडाला धर्मनिरपेक्षतेच्या
नावाखाली गोंजारणाऱ्यांचा बुरखा उतरवून त्यांचा विद्रुप चेहरा जगासमोर आणणारा
चित्रपट.
विचारस्वातंत्र्याचा आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा ढोंगी उदोउदो करणाऱ्यांची
परिक्षा बघणारा चित्रपट.
हिटलरने केलेल्या ज्यूंच्या हत्याकांडावर कितीतरी चित्रपट बनले, जगभर बघितले गेले. आज 'हिटलर', 'नाझी' हे शब्द शिवीसारखे वापरले जातात. आपल्याकडे मात्र परकीय आक्रमकांच्या ओव्या
गायल्या जातात. जागतिक सिनेपटलावर हे दृश्य बदलणारा चित्रपट.
दिग्दर्शक, निर्माता, कलाकार आणि त्यांचे सहकारी ह्यांचं उत्कृष्ट काम, धाडस ह्याबद्दल त्यांना त्रिवार वंदन!!
मराठी चित्रपटसृष्टीने 'श्वास'च्या रूपाने नवा श्वास घेतला असं आपण म्हणतो. तसंच 'काश्मीर फाईल्स'ने हिंदी चित्रपट
सृष्टीत नवा कालखंड सुरू केला; असं भविष्यात लिहिलं जाईल.
हा चित्रपट मला कुठेही भाजपस्नेही/काँग्रेसविरोधी असा वाटला नाही. त्यावेळी जे
सत्तेत होते, त्यांची कमीत कमी नावं घेऊन चित्रपट केला आहे. त्यामुळे राजकीय
अंगाने चित्रपट पुढे नेणं किंवा त्याला मागे ओढणं ह्या दोन्हीची आवश्यकता नाही.
मुद्द्याची ऐतिहासिकता आणि दाहकता त्याहून लाखपटीने जास्त आहे.
आता प्रश्न आहे की; 'पुढे काय?' अजून २५ वर्षांनी 'डोंबिवली फाईल्स', 'पुणे फाईल्स', ठाणे, बंगळुरू, चेन्नई, भुवनेश्वर, गुवाहाटी, लखनौ ... अश्या कुठल्याही फाईल्स वाढू नयेत असं वाटत असेल तर धर्मवेडाची 'पाईल्स'(मूळव्याध) कुठेही वाढून देता कामा नये. त्यासाठी आदर्श छत्रपतींचा आहेच.
स्वधर्माचा अनादर न करता दुसऱ्या धर्माचा आदर ठेवता येतो आणि दुसरा अन्याय
करायला धजावणार नाही इतकं सबळ स्वतःच व्हावं लागतं; हेच त्यांचं आयुष्य आपल्याला
सांगतं. वर्षानुवर्षे हेच घोकून घोकून आपल्याला आचरणात आणावं लागेल.
कौशिक लेले
No comments:
Post a Comment