ध्यासपर्व हा अमोल पालेकर दिग्दर्शित चित्रपट आहे. अर्थातच हा रघुनाथ धोंडो कर्वे आणि त्यांची पत्नी मालती यांचा जीवनपट नसून त्यांनी घेतलेल्या जीवनव्रताच्या ध्यासाचा हा चित्रपट आहे. चित्रपट त्यांच्या वैयक्तिक जीवनाची एकरेषीय मांडणी करतो. परंतु ही रेषा म्हणजे जीवनव्रतापायी तत्कालीन समाजाशी केलेल्या संघर्षाची कहाणी आहे. इथे फक्त र.धों. कर्व्यांनी घेतलेला ध्यास आणि त्या ध्यासापोटी पत्करलेली फरफट नसून, त्यांची पत्नी मालती हिने तितक्याच एकरूपतेने आणि समर्पणाने केलेली साथ, त्याचबरोबर त्यांचीही झालेली फरफट यात आहे. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतीय समाज विचाराने सनातन होता. धर्माच्या नावावर स्त्रियांवर वर्षानुवर्ष अन्याय होत होता. व त्यातच अनेक विचारवंत स्वातंत्र्याची स्वप्नेही बघत होते.
चित्रपटाची सुरुवात एका बाळंतिणीच्या
वेदना,
किंकाळीने होते. ही किंकाळी, ह्या वेदना, छोटा रघुनाथ ऐकत असतो. तिला मुलगी होते, पण बाळंतीण यात वारते. अनेक बाळंतपणांमुळे बाईची प्रकृती खालावते, त्यामुळे तिचे जगणे कठीण होते. ह्याचप्रमाणे घरातील विधवांचीही परिस्थिती
फार काही वेगळी नसते.
आजूबाजूला चाललेले हे सर्व, छोटा रघुनाथ बघत असतो. इथेच त्याच्या भविष्यातील समाज प्रबोधनाची
बीजे
पडली असावीत असे वाटते.
लग्नानंतर गिरगावातल्या एका चाळीत त्यांनी
बिऱ्हाड केले. मुळात कर्व्यांचा स्वभाव फटकून वागण्याचा
असल्यामुळे,
चाळीत त्यांचे कोणाशी संबंध नव्हते. त्यांच्या अशा स्वभावामुळे मालतीबाईंचीही
आजूबाजूच्या बायकांशी मैत्री नव्हती. मालतीबाईंची
शाळेची नोकरी चालू होती. कर्व्यांना
पाश्चात्य विचार,
पाश्चात्य राहणी आवडायची. त्यामुळे त्यांचे फ्रेंच क्लबमध्ये जाणे
असायचे.
सोबत मालतीबाई असत. पुढे उच्च शिक्षणासाठी कर्वे एकटेच पॅरिसला
जातात.
गणिताचे उच्च-शिक्षण त्याचबरोबर संततिनियमन या विषयावर
अभ्यासही त्यानी केला.
भारतात परतताना त्यांनी संततिनियमनावरील
साधने आणि साहित्य बरोबर आणले. परंतु आल्यावर त्यांनी मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये
प्राध्यापक म्हणून नोकरी केली, ती त्याचबरोबर त्यांचे संततिनियमनाचे
काम चालू राहील या अटीवर. फ्रेंच
पदवी असल्यामुळे विल्सन कॉलेजमध्ये त्यांना बढती मिळाली नाही. पुढे कॉलेजने त्यांच्या संततिनियमनाच्या
कामावरही आक्षेप घेतला.
परंतु तत्ववादी कर्व्यांनी तडजोडीस नकार
देत थेट राजीनामा दिला. यामध्ये
त्यांनी आपला संसार आणि हाती घेतलेले काम कसे चालेल, याचाही विचार केला नाही. यापुढे पूर्णवेळ संततिनियमनावर समाज प्रबोधन, समुपदेशनाचे काम करण्याचा निर्णय त्यांनी
घेतला.
मालती बाईंनी त्यांच्या ह्या कामात पूर्णपणे
साथ आणि पाठिंबा दोन्ही दिले. समाजाच्या
दृष्टीने हा विषय अश्लील होता. केंद्राकडे
अनेक महिने कोणीही फिरकले नाही. होता
नव्हता तो सर्व पैसा प्रबोधन साहित्य छापण्यासाठी खर्ची पडला. आर्थिक परिस्थिती अगदी ओढगस्तीला आली
होती.
र.धों.ना नोकरीही मिळत नव्हती. मालतीबाईंच्या पगारावर, घर जेमतेम चालत होते. अशावेळी कर्व्यांनी नैरोबीला त्यांचा
भाऊ शंकर जो सर्जन होता त्याच्याकडे जायचे ठरविले. नैरोबीतही काही महिने राहून नोकरी मिळाली
नाही.
त्यांनी भारतात परत यायचे ठरविले. परंतु परत येण्याआधी स्वतःवर नसबंदीची
शस्त्रक्रिया करून घेतली. अर्थातच
याला मालतीबाईंची मान्यता/परवानगी
होती.
ही नसबंदी करण्यामागे दोन हेतू होते. एक म्हणजे वाढलेले वय, त्यामुळे मुलाची जबाबदारी नको; दुसरे म्हणजे, समाजामध्ये जो नसबंदीबद्दल गैरसमज आहे
तोही दूर होईल.
भारतात आल्यावर केंद्र सुरु केले. केंद्रासाठी लागणारे साहित्य छापून देण्यास
नकारच येत होता.
समाजामध्ये हेटाळणी, अपमानित वागणूक मिळत असे. खटले भरले गेले, दंड भरावा लागला यांतून होणार मनस्ताप
हे सर्व सोसून केंद्र चालविणे, दिवसेंदिवस
त्यांना अवघड होत होते. पण
कोणतीही वैचारिक तडजोड मात्र ते करत नव्हते. या सगळ्या मनस्तापापायी मालतीबाईंची तब्येत
खालावत जाते.
अनेक तपासण्या करूनही आजाराचे योग्य निदान
होत नाही.
मालती बाईंना पूर्ण विश्रांतीचा सल्ला
असल्याने,
त्यांची मदत नसते. दोघांची नोकरी नाही, घर चालविणे दिवसेंदिवस कठीण व्हायला लागते. मामा वरेरकर त्यांना राजकारणात यायचा
सल्ला देतात.
पण स्वतंत्र विचारांची माणसे राजकारण्यांना
नको असतात असे र.धों त्यांना सांगतात. मामा आणि इतर मंडळींना मात्र ते फारसे
रुचत नाही.
र.धों.ना स्वातंत्र्य चळवळीपेक्षा भारतातील
संततिनियमनावर काम करणे जास्त महत्वाचे वाटले कारण त्यावेळी
या विषयावर महाराष्ट्रातच
काय, पण देशातसुद्धा असे काम करणारे कोणी नव्हते. नाही म्हणायला म्हैसूरला एक केंद्र होते. पण ते फक्त विवाहित स्त्रियांसाठीच चालविले जाणारे केंद्र
होते.
११ वर्ष सपत्निक चालविलेल्या केंद्रावर
सरकारने आणलेले निर्बंध यामुळे त्यांना अनेक अडचणी आल्या. अखंड काम करणारे र.धों. आणि एकीकडे मालती बाईंची अगदी निरवानिरवीची भाषा. त्यात मालती बाईंना र.धों.चे कठोर, परखड बोलणे, टोकाची भूमिका घेणे, यामुळे आपल्यानंतर ते एकटे पडण्याची भीती
वाटते.
परंतु आपण त्यांची पत्नी असण्याचा अभिमानही
वाटतो.
त्यानंतर मालतीबाईंच्या मृत्युने मात्र र.धों. अगदी एकाकी होतात.
भारताला स्वातंत्र्य मिळते. परंतु नवीन कायद्याप्रमाणे कोणतेही अधिकृत
शास्त्रीय शिक्षण नसल्याने केंद्र चालविणे, औषध बनविणे हा गुन्हा ठरू शकतो, म्हणून त्याना केंद्र बंद करावे लागते. नवीन आलेल्या सरकारकडून र.धों.च्या बऱ्याच अपेक्षा होत्या. संततिनियमनाला
प्राधान्य
नसल्याने साधने आयात करण्याचा त्यांचा प्रस्तावच फेटाळला जातो. १४ ऑक्टोबर १९५३ रोजी एकाकी र.धोंचे निधन होते. र. धों. नावाचे वादळ, आणि त्या वादळाची तितक्याच समर्थपणे साथ करणारी
मालती यांच्या विसाव्या शतकातील ध्यासपर्वाचा हा चित्रमय आलेख सुन्न करणारा आहे. एका समाजाने साथ न दिलेल्या योध्याची
पत्नी होण्याचे अग्नीदिव्य करणाऱ्या मालतीचाही हा चित्रपट आहे हे प्रकर्षाने
नमुद करावेसे वाटते.
No comments:
Post a Comment