चित्रपटाला भाषा, भूगोल, संस्कृती, राष्ट्र, यांच्या सीमा नसतात. खरे तर सर्वच कलांच्या बाबतीत असे म्हणता
येईल.
चित्रपट हे माध्यम प्रतिमांचे आहे. त्यामुळे गोष्ट सांगण्यासाठी तो शब्दांपेक्षाही
अधिक प्रभावी आहे.
चिनी चित्रपट दिग्दर्शक "चांग इमो" यांचा "द स्टोरी ऑफ च्यु ज्यु" हा चित्रपट, 'इमो' हे अभिजात कथाकार आहेत, हे सिद्ध करणारा आहे.
इतर चित्रपटांप्रमाणे इमोंचा हा चित्रपट
ही चीनच्या ग्रामीण
पार्श्वभूमीवर घडतो आणि त्याचे सार्वत्रिकतेचे मर्म असे, की ही जगातील कुठल्याही ग्रामीण भागातील गोष्टच
वाटते. तिकडे घडणारे
नाट्य प्रत्येकाला आपले वाटायला लावणारे किंबहुना आपल्या ग्रामीण जीवनाच्या जवळ जाणारे वाटते. च्यु ज्यु ही एका सर्वसाधारण शेतकऱ्याची
सामान्य अशी बायको आहे. ही
गरोदर असलेली स्त्री,
नवऱ्यावर झालेल्या अन्यायाच्या परिमार्जनासाठी, न्यायासाठी ठामपणे दाद मागते.
च्यु ज्युच्या नवऱ्याला मिरच्या साठविण्यासाठी
शेड बांधायची असते.
त्यासाठी तो सरपंचाची परवानगी मागतो. सरपंच ती परवानगी नाकारतो. त्यातून वाद निर्माण होतो आणि वादातून
मारामारीचे स्वरूप येऊन सरपंच च्यु ज्युच्या नवऱ्याला जांघेत लाथ मारतो. वेदनेने तळमळत तो घरी येतो. यावर आपल्याला न्याय मिळायलाच हवा यावर
च्यु ज्यु ठाम असते. परंतु
च्यु ज्युचा नवरा स्वभावाने गरीब असतो. तो "सोडून देऊया", असे सांगतो. च्यु ज्यु नवऱ्याला उपचारासाठी तालुक्याच्या
ठिकाणी नेते.
जखम जरी गंभीर नसली तरी ती च्यु ज्युच्या
जिव्हारी लागते.
परत आल्यावर ती सरपंचाला याविषयी जाब
विचारते.
सरपंचच काय तिचा नवरा सुद्धा, "इथेच मिटवून टाकू" अशा निर्णयाला येतात. परंतु जखम अशा ठिकाणी झालेली असते की "आपल्याला यापुढे मूल होणार की नाही?" या धास्तीने ती अस्वस्थ होते.
सरपंचाने विचारलेली तडजोड ती अमान्य करते. सरपंच ऐकत नाही म्हटल्यावर ती पोलीस ठाण्यात
तक्रार नोंदवते.
तिथेही पोलीस फारशी गंभीर तक्रार नसल्याचे
सांगून तक्रार नोंदवायला तयार नसतात. "समेट करून सोडून द्या", असे पोलिस सांगतो. पण इथे च्यु ज्यु इरेस पेटते. हे प्रकरण तडीस न्यायचेच अशा निर्धाराने
गरोदर च्यु ज्यु अतिशय खडतर प्रवास करून तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस कार्यालयात
जाते.
प्रत्येक ठिकाणी तिला अगदी सरकारी कार्यालयात
असतात तशी छापिल उत्तरे मिळतात. च्यु
ज्युचा हट्ट,
हेका कायम असतो. हे प्रकरण तडीस न्यायचेच हे तिने मनाने
ठरविले असते.
त्यात ती सर्व आर्थिक नुकसान भरपाई नाकारते. तिला सरपंचाकडून फक्त बिनशर्त माफी हवी
असते;
आत्मसन्मान परत हवा असतो.
च्यु ज्यु या पवित्र्याने आणि दृढनिश्चयाने
सरपंच अस्वथ होतो.
दुसरीकडे सरकारी यंत्रणा तितक्याच तटस्थपणे आणि निर्विकारपणे या जिद्दी स्त्री
ला टोलवत राहतात.
हा खरेतर फक्त चीन मधीलच अनुभव नाही तर
अन्यत्रही हा अनुभव येत असतो. तिचे
दुर्गम खेड्यातून आणि गोठवणाऱ्या थंडीतून खडतर प्रवास करणे हे तिच्या व्यक्तिमत्वाला
साजेसेच आहे.
शहरात अनोळखी, अपरिचित ठिकाणी तिला काही भलेबुरे अनुभव
येतात.
काही भली माणसेही भेटतात. पण कोणालाच तिच्या मनातले काही कळत नाही. शेवटी ती न्यायालयाचे दार ठोठावते. न्यायालयासमोर येणारी बाब सुद्धा न्यायाधीशाच्या
दृष्टीने अगदी साधीशीच असते. चित्रपट
संपत येतो तेव्हा तिचे दिवस भरत आलेले असतात.
संपूर्ण चित्रपटभर एकाच ध्यासाने च्यु
ज्युची चाललेली धडपड आणि तिचे गरोदरपण या दोन्हीतून सुटका व्हावी असे वाटत असतानाच
च्यु ज्यु बाळंत होऊन तिला मुलगा होतो आणि सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण होते. मग बारशाचा दिवस येतो. घर छान सजवले जाते. बारशाचा कार्यक्रम होतो आणि न्यायालयातून निरोप
येतो आणि सरपंचाला
अटक होते.
शेवटच्या प्रसंगात च्यु ज्यु अस्वस्थ
होऊन पोलिसांची गाडी थांबवू पाहते. पण
सरपंचाला घेऊन गाडी कधीच निघून गेलेली असते.
हा चित्रपट कशाविषयी आहे असे आपल्याला
वाटले तर,
"न्याय-अन्याय, पोलीस, सरकारी यंत्रणा, न्यायालये ही खरोखरच त्यांची कामे करतात
का? सर्वसामान्य माणसाला न्याय किंवा त्याचा
आत्मसन्मान मिळवून देऊ शकतात का? मानवी
संवेदनशीलतेचा प्रश्न पोलादी सरकारी चौकटीत हाताळता येईल का? सर्वसामान्य माणसांच्या असलेल्या माफक
अपेक्षांचे ओझे कुठली व्यवस्था बाळगणार?", असे प्रश्न हा चित्रपट निर्माण करतो.
चित्रपट संपला तरी अशा अनेक विचारांची
मालिका घेऊन आपण जेव्हा बाहेर पडतो, तेव्हा
खऱ्या अर्थाने तो चित्रपट, जागतिक दर्जाचा, अभिजात चित्रपट असतो. चित्रपटाच्या शेवटपर्यंत तिचा चेहरा आपल्या
लक्षात,
आठवणीत राहतो. अवघडलेल्या अवस्थेत ती ज्या पद्धतीने
न्याय मिळविण्यासाठी झगडत असते ते; त्याचबरोबर
चीनच्या वाद्य संगीताचे सूर सतत सिनेमात पार्श्वसंगीत म्हणून वापरले आहेत. च्यु ज्युचा निरागस चेहरा आणि ते संगीत, असे दोन्ही आपल्याबरोबर घेऊन प्रेक्षक
बाहेर पडतो.
वैखरी
फडणीस
vaikhariphadnis@gmail.com
No comments:
Post a Comment