'तू दाटताना'

 



व्हावे फिरुन तुझी ती

अर्धीकच्ची आई,

माझी धडपड परिपक्वतेसाठी अन्,

तुझी मोठ्ठं होण्याची, कोण घाई...

 

वाटते चांदीच्या वाटीत

परत म दुधभातास कालवावे

चिकाचे जग आहे इथेच,

तुला ते नव्याने दाखवावे...

 

अजुनही खांद्यावर माझ्या

तुझ्या दुध लाळेचा गंध रेंगाळतो..

चांदोमामाच्या अंगाईत असाच

माझाही डोळा पेंगाळतो...

 

बोट अजुनही हुळहुळते

कधी चालीसाठी तू धरलेले

तू जाशी जग धुंडाळण्या

तुझ्या बालविश्वाशी माझे

अजुनही ओले नाते...

 

अशीच असणार सगळीकडे

मायमातीची कोवळीक

श्वास फिरतात दूर दूर

सांगत नाळेशी जवळीक..!!!



सौ.विदुला जोगळेकर




No comments:

Post a Comment