पहाटेच जाग आली आणि बर्थवरून खाली उतरले. बहुदा इतक्यात स्टेशन येणार नसावं
म्हणून बहुतेक सगळे प्रवासी गाढ झोपेत होते. झोप येईना आणि बर्थवर बसता येणं कठीण
होतं. नुसतंच काय उभं राहायचं म्हणून बाहेर गेले आणि ट्रेनचा बंद दरवाजा उघडला. आत
AC असल्याने
बाहेर किती थंडी आहे हे कळलंच नव्हतं. दरवाजा उघडला आणि गाडीच्या वेगामुळे थंड
हवेच्या झोताने अंगावर शिरशिरी आली. बाहेर मिट्ट काळोख होता. थोडा वेळ उभं राहून
थंडी सहन होईना म्हणून आत वळणार तोच त्या मिट्ट काळोखाला छेदून लालसर गुलाबी आभा
हलकेच डोके वर काढू लागली. बघता बघता सूर्याचं कोवळं लालसर बिंब हलके हलके वर येऊ
लागलं. वर येतांना धावत्या गाडीच्या वेगाने ते ही धावत होतं. कोवळ्या प्रभेची एक
पुसटशी रेषा मागे उमटवत धावणारं ते सूर्यबिंब इतकं मोहक दिसत होतं की मध्यान्ही
हेच आग ओकू लागेल यावर विश्वास ठेवणे कठीण जावं! सारा काय तो
पाच दहा मिनिटांचा खेळ. पण तेवढ्या वेळातले ते सूर्य दर्शन माझ्या कायम स्मरणात
राहिलं.
अशी तर
सूर्याची आणि माझी भेट रोजच होत असते. आता तुम्ही म्हणाल, सूर्याची काय भेट
व्हायचेय! सूर्य उगवायचा तेव्हा उगवणार आणि मावळायचा तेव्हा मावळणार आणि या
दोन्हीच्या मध्ये तापायचा तो तापणारच! हे जरी खरं असलं तरीही आपण जर ठरवलं तरच सूर्य
आपल्याला भेटतो.
पहाटे फिरायला
जाते तेव्हा अगदीच काळोख असतो. मग हळू हळू पायाखालचा रस्ता दिसू लागतो तेव्हा अभावितपणे
आभाळाकडे नजर जाते. पूर्वेकडे तांबडं फुटू लागलं की आपोआप पावलं पुन्हा घराकडे
वळतात. किती वाजलेत बघायची गरज ही भासत नाही. संध्याकाळी ट्रेनमधून परतीच्या
गडबडीत काही सूर्याची भेट होत नाही. पण कधीतरी अवचितच समोर अस्ताला जाणारं सूर्यबिंब
उद्याच्या नव्या पहाटेची जाणीव करून देतं.
कुठे फिरायला
गेलं की सनसेट आणि सनराईझ पॉईट न बघता परत येणं म्हणजे जणू काही गुन्हा असावा या
भावनेने लोक तिथे जातातच. मी एकदाच अशा ठिकाणी गेले होते. तेव्हा एक गंमतीशीर
गोष्ट लक्षात आली. तिथे जमलेल्यांपैकी अनेक लोकांना सूर्य अस्ताला कधी गेला ते
मुळी कळलं देखील नाही. मुळात मला असं मुद्दाम सूर्य उगवताना-अस्ताला जातांना
बघायला आवडतच नाही. सूर्य कसा अचानक समोर आला पाहिजे. आणि असा तो येतो......अशी
सूर्याची अन माझी भेट कित्येकदा झाली आहे.
एक जानेवारीची
कडाडती थंडी. पहाटेच डोळे उघडले असले तरी, आदल्या रात्री मनालीतलं टेम्परेचर चार
डिग्री असल्याने बाहेर जायची काही हिंम्मत नव्हती. उठून खिडकीवरचा पडदा दूर केला
तो काय, समोरच हिमाचा मुकूट घातलेला हिमालयाचा माथा उगवत्या सूर्याच्या किरणांमुळे
झळाळून उठला होता. जणू कोणी हिऱ्यांची पखरण केली असावी. अशाच चमचमत्या सूर्याची
भेट कच्छच्या रणात झाली होती. ती ही रणरणत्या दुपारी.
सूर्याच्या उन्हाला रणरणतं का म्हणतात हे तिथे समजलं. सातपुड्याच्या रांगांच्या
पल्याड अस्ताला जाणारे सूर्यबिंब बघणे यासारखा दुसरा अनुभव नाही. चेंडू घरंगळत
जावा तसा सूर्य एकेका रांगेवरून गडगडत जातो आणि बघता बघता नाहीसा होतो....मागे
उरतो तो मिट्ट काळोख....अंधार करणारा म्हणून सूर्यास्त नकोसा वाटतो अनेकांना. पण
सूर्यास्त म्हणजे उद्याची नवी पहाट हा जर विचार केला ना तर मात्र सूर्यास्ताचा
अर्थच बदलून जाईल.
मनीषा सोमण
No comments:
Post a Comment