एक उनाड दिवस

 

परवाच्या दिवशी म्हणजे ३० नोव्हेंबरला मी मैत्रीणीच्या शेतात गेले होते. त्याचं असं झालं, माझ्या वाढदिवसाला तिचा फोन आला होता. तेव्हाच तिने शेती घेतल्याचे सांगितले होते आणि आपण एकदा मिळून जाऊ म्हणाली होती. माझंच जमत नव्हतं पण तिला नक्की येईन म्हणाले होते.

 

ही माझी हरहुन्नरी मैत्रीण सतत काहीतरी नवीन करण्यात गुंतलेली असते. आता लॉकडाऊन मध्ये शेती घेऊन नवीन तंत्रज्ञान वापरून तिने भाताचे पीक घेतले. आता गहू लावलाय त्याला आम्ही तिथे जाऊन पाणी दिले. तिने शेती करायचे मनावर घेतले आहे तर ती तिथे आठवड्यातून दोनदा जातेच. जातीने पाणी देते, कुदळ फावडे घेऊन काय काय करत असते. परवा मला जमणार होते  म्हणून सहज तिला फोन केला. ११च्या सुमारास आली गाडी घेऊन. गाडीत इतकं सामान होतं, की, गाडीतल्या सामानात मी स्वतःला बसवलं. सोबत पाणी, पालक पराठे, लोणचं, तुपसाखर, पोळी, खारे शंकरपाळी, लाडू असं काय काय घेतलं होतं.

 

शूज वगैरे घालून तयार होते मी. शिवाय हॅट, गॉगल, स्वेटर आणि छत्री हेही बरोबर ठेवलं होतं. एकतर आजकाल दुपारी खूप ऊन होतं पण तिथे गार हवा असेअसंही वाटलं! म्हणून ही सर्व तयारी. तिच्या गाडीत तर इतक्या वस्तू होत्या, अस्ताव्यस्त  पसरलेल्या की काही बोलायची सोय नाही! त्रिंबक रोडवर तळवडे फाट्यापासून आत जावे लागते. जसे आत जात होतो तसे दुतर्फा द्राक्षाचे मळे, ऊस आणि हिरवीगार शेती बघूनच मन रमून गेले. दिवसभर आमच्या गप्पा, खाणं, (तिनेही कप केक, बारवडी आणली होती) भटकणं, फोटो असं चालूच होतं. दीड वर्षापूर्वी घेतलेल्या शेतीविषयी ती भरभरून बोलत होती. अगदी तिच्या जमीन खरेदीचा सर्व्हे झाला तिथपासून ते तिच्या पुढीलवर्षाचे काय काय प्लॅन्स आहेत तिथपर्यंत.

 

आता तिथे आंबा, कडुलिंब, शेवगा, बांबू फणस लावले आहेत. तेवर्षात कसे मोठे होतील, मग केळीची बाग करायची, तिथेच घर बांधून रहायचे, (सध्या खोली आणि गाडीसाठी शेड केली आहे.) राहायला आले की मग देशी गाय घेणार इत्यादी. आणि कुत्राही! तिला कुत्री, मांजर प्रचंड आवडतात. आताही तिच्याकडेमांजर आहे. गाडीत असलेले Parle G चे पुडे रस्त्यावरील कुत्र्यांसाठीच होते. असो.

 


मला त्या दिवशी खूप निवांत वाटत होतं. बऱ्याच दिवसांनी असं नजरेत मावेल इतकं मोकळं आकाश दिसलं. आजूबाजूला जंगल, समोर पर्वत रांगा आणि आल्हाददायक हवा!!! भरभरून मोकळा श्वास घेतला. आम्ही बँकेत एकत्र काम करायचो. तेव्हा आमच्या रोज गप्पा व्हायच्या. अगदी वेगवेगळ्या विषयांवर. परवा खूप दिवसांनी भेटलो तरी त्यात काही फरक पडलेला नव्हता. वयं  वाढली होती, पण मोकळेपणा मात्र कायम होता.

 

एखादया नव्या ठिकाणी जाताना आपल्याला वेळ लागतो, पण परतीचा प्रवास तुलनेने लवकर होतो, असं आपल्याला वाटतं. सर्वसाधारणपणे सगळ्यांचाच हा अनुभव आहे. पण परवा येताना मात्र द्राक्ष्यांचे  मळे बघत, भेटलेल्या श्वानांना बिस्किटे देत, त्रिंबक रोडवरची कुल्फी, असं टंगळमंगळ करत परतीचा रस्ता कापत होतो. तो एक उनाड दिवस होता.

 

आमच्या बरोबर खरं तर अजून एक मैत्रीण येणार होती. पण ऐनवेळेस तिचं रहित झालं. 'काय करू ग? सगळ्यांना खुश ठेवणे कठीण आहे,' एवढाच मेसेज आला तिचा. माझी मैत्रीण खूप नाराज झाली, चिडली! पण मी दुर्लक्ष केलं. काल अचानक आलेल्या पावसाने मैत्रीणीला म्हटलं, आता गव्हाला पाणी देण्यासाठी जायची गरज नाही ना? तर म्हणाली द्राक्षवाल्यांचं काय? त्यांचे किती नुकसान झाले असेल! माझ्याही डोळयांसमोर त्या वेली दिसत होत्या. मनात म्हटलं, निसर्गही एका वेळी सगळ्यांना नाही खुश ठेवू शकत. तिथे माणसाची काय कथा! हे वाचून तिसऱ्या न आलेल्या मैत्रिणीचा आत्ता मला msg आला thankyou म्हणून!

मी समजून घेतलं तिचं busy असणं म्हणून.


मैत्री अशीच तर अधिक परिपक्व होत जाईल, हिच्या शेतातल्या फळासारखी. मात्र त्यासाठीही असाच एक उनाड दिवस मैत्रिणीसोबत, निसर्गासोबत आणि हो मुख्य म्हणजे स्वतःसोबत घालवायला हवा ..........


उल्का कुलकर्णी



No comments:

Post a Comment