एक निवृत्त
व्यक्ती घरी रोज काही कामांची जबाबदारी स्वीकारतो. सकाळी दूध तापवणे, पाणी भरणे. आणि त्याचा समज होतो की मी निवृत्त झालो आहे आणि त्यामुळे माझी बायको निवांत झाली आहे . एकदा नवरा आपल्या बायकोला
सांगताना ऐकतो की “आजकाल माझे मिस्टर घरात मला खूप मदत करतात,
मलाच कसंतरी वाटतं”. यावेळी नवऱ्याला झालेली
ही उपरती ...
घर नावाची उबदार जागा होती
त्यात नोकरी ती करत नव्हती
वेतन न घेता चोवीस तास झटत होती.
पै पाहुणा आला गेला दुखणं खुपणं
हसत हसत निभावत होती.
कौतुक किंवा शाबासकी याची तमा
ती बाळगत नव्हती
प्रोमोशन,मोटिवेशन कसलीच तिची
अपेक्षा नव्हती
निश्चित केला नव्हता कामाचा रोल
कोणत्याही कामाचं लावलं नव्हतं मोल
सगळीच कामं होती मात्र बहुमोल
वेळ आणि अखंड परिश्रम करून
आनंद लुटत होती अनमोल
फंड किंवा पेन्शन तिला मिळणार नव्हती
मिळणार होता फावला वेळ
नि स्वतःसाठी थोडीशी उसंत
प्रेम माया आपुलकी यांचच
सेविंग केलं होत फक्त
जबाबदारीतून तिलाही व्हायचं होतं मुक्त
बदल म्हणून मी घरकामं केलं
याचं ही तिला ओझं वाटलं
तोंडभरून कौतुक तिने माझंच केलं
न बोलता जर मी इतकंसं केलं
तर त्यात एवढं काय बिघडलं ????
No comments:
Post a Comment