'उरी - द सर्जिकल स्ट्राईक'


बरेच दिवसांनी पाहिलेला एक छान चित्रपट! पूर्ण तीन तास लक्ष वेधून घेणारा आणि खुर्चीला खिळवून ठेवणारा असा चित्रपट. चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येकाला समरस व्हायला लावणारा चित्रपट. ह्या करिता आदित्य धर ह्या नवोदित लेखक-दिग्दर्शकाचे खूप कौतुक. त्यांना जो मेसेज पोहोचवायचा होता तो प्रत्येक चित्रपट पाहण्यांऱ्यापर्यंत नक्की पोचतो ह्यातच या सिनेमाचे यश आहे. ह्या व्यतिरिक्त कुठलाही खान नसताना, कुठलीही लोकप्रिय नायिका नसताना, कुठल्याही वादविवादात चित्रपट सापडला नसताना, टिपिकल मसाला मुव्ही नसताना चित्रपटाला मिळालेले घवघवीत यश हे icing on the cake म्हणता येईल. चित्रपट झाल्यावर बाहेर पडताना प्रत्येकाच्या हृदयात देशप्रेम आणि आपल्या भारतीय सैन्यदलाबद्दल, प्रत्येक सैनिकाबद्दल आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल प्रचंड आदर वाढतो.
१८ सप्टेंबर २०१६ रोजी पहाटे चार अतिरेकी LOC जवळ असलेल्या उरीमधील भारतीय सेना मुख्यालयावर हल्ला करत झोपलेल्या निरपराध सैनिकांना मारतात. याचं प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सरकार आणि भारतीय सेनादल एक मोहिम आखते. ती मोहिम म्हणजे 'उरी - द सर्जिकल स्ट्राईक'. हल्ला झाल्याच्या केवळ दहा दिवसात हे मिशन पूर्ण होते. उरीतील हल्ल्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी भारतीय जवानांनी अतिरेक्यांच्या नाकात घातलेली वेसण म्हणजे सर्जिकल स्ट्राइक! 
खरेतर आम्ही सर्जिकल स्ट्राकेली हे कुठलाही देश कबुल करत नाही. गुप्ततेने होणाऱ्या ह्या मिशन असतात. भारताने केलेले हे पहिलेच यशस्वी मिशन. तुम्ही आमच्या निरपराध सैनिकांना माराल, तर आम्ही गप्प बसणार नाही. हा नवा भारत आहे. 
आमचे सैनिक माराल, तर आम्ही तुम्हाला तुमच्या घरात घुसून मारू हा अतिशय सणसणीत संदेश या सर्जिकल स्ट्राकच्या माध्यमातून भारताने आपल्या शत्रूला दिला, ह्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे.

चित्रपट पाच उपकथांमधून उलगडत जातो. चित्रपटाची सुरुवात ४ जून २०१५ म्हणजेच भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक करण्यापूर्वी एक वर्ष अगोदर घडलेल्या घटनेपासून होते. भारतीय सैनिकांच्या बसवर फिदाईन हल्ला होतो. या हल्ल्यात बरेच जवान शहिद होतात. या हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारतीय जवानांची एक तुकडी अतिरेक्यांना कंठस्नान घालते. या तुकडीचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या मेजर विहान शेरगिलसह (चित्रपटाचा हिरो-विकी कौशल) संपूर्ण तुकडीचं खूप कौतुक होतं. पंतप्रधानांकडूनही पाठ थोपटली जाते, पण आईला अल्झायमर असल्याने विहान रिटायर्ड होणार असल्याचं सांगतो. त्यावर पंतप्रधान त्याची ट्रान्सफर दिल्लीतील मुख्यालयात करतात. ज्यामुळे विहानला आईसोबतच देशाचीही सेवा करता येते. तिकडे गुरुदासपूर, पठाणकोट यांसारख्या ठिकाणांवर फिदाईन हल्ले सुरूच असतात.

मध्यंतरापूर्वी सर्जिकल स्ट्राक करण्यामागील पार्श्वभूमी दाखवली आहे, तर मध्यंतरानंतर सर्जिकल स्ट्राची तयारी, जुळवाजुळव आणि कारवाई दाखवली आहे. सिनेमाची कथा सत्य घटनेवर आधारित असली, तरी त्यातील काही व्यक्तिरेखा आणि बरेच प्रसंग काल्पनिकही आहेत. पण काही प्रसंग सोडल्यास ते आपल्याला पटणारे वाटतात. अशा तऱ्हेच्या सैनिकी कारवाया अत्यंत गुप्ततेने केल्या जातात. त्यामुळे नक्की काय आणि कसे घडले हे कोणीच सांगू शकत नाही. 
देशहिताच्या दृष्टिकोनातून जे दाखवणं उचित आहे, तेच या चित्रपटात चित्रीत करण्यात आलं आहे. काही ठिकाणी मात्र कल्पनाशक्तीला बहर आलेला दिसतो. DRDO मधील प्रसंग असाच आहे. एका intern कडून एका दिवसात गरुड – Robot droneतयार करून घेऊन ते ह्या सिक्रेट मिशनमध्ये वापरले आणि त्याची जबाबदारी ह्या छोट्या मुलावर टाकली आहे. असे काही प्रसंग खटकतात. अशा महत्वाच्या आणि गुप्त मिशनसाठी असे काही केले असेल हे खरे वाटत नाही.
सर्जिकल स्ट्रामात्र उत्तमरीत्या सादर करण्यात आली आहे. कॅमेरावर्क आणि व्हीएफएक्स सुरेख आहे. फाईट्सही दमदार आहेत. 'मंजर है ये नया...', 'मै लड जाना...' ही गाणी चांगली आहेत. खरं तर ह्या चित्रपटाला गाण्यांची गरज नाही पण अनेक गोष्टी दाखवण्यासाठी गाण्यांचा छान उपयोग केला आहे.
विकी कौशलने शारीरिकच नव्हे, तर मानसिकदृष्ट्याही खूप मेहनत घेतल्याचे जाणवते. परेश रावल यांनी अजित डोवाल यांची व्यक्तिरेखा साकारली असली तरी त्यांचा उल्लेख गोविंद असा करण्यात आला आहे. त्यांनी नेहमीप्रमाणे आपलं काम चोख बजावलंय. याशिवाय किर्ती कुल्हारी, मोहित रैना, योगेश सोमण, रजत कपूर, मानसी पारेख या सर्वांनीच चांगलं काम केलंय.
चित्रपट गृहातील प्रत्येकजण इतका रंगून गेला होता की चित्रपट झाल्यावर सगळ्यांनीच उत्स्फूर्तपणे जोरात टाळ्या वाजवल्या. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते
हाउ’ज द जोश ?
हाय सर!!!!!
निर्माता : रोनी स्क्रूवाला
लेखन-दिग्दर्शन : आदित्य धर
कलाकार : विकी कौशल, परेश रावल, रजत कपूर, यामी गौतम, किर्ती कुल्हारी, मोहित रैना, योगेश सोमण, मानसी पारेख, स्वरूप संपत, आणि इतर

मंजिरी सबनीस



No comments:

Post a Comment