वाट पाहून तुझी, अश्रूही
थकले माझे
उसास्यांच्या गर्दीत अनाहूत, हसू
हरवले माझे
धबधब्यात शब्दांच्या, मन
अबोल तहानलेले माझे
गजबजाटात दिवसाच्या, मन
रिते अस्वस्थ माझे
शांततेत रात्रीच्या मुक्या, अशांत
मन एकले माझे
छेडते तळ्याकाठी सुक्या, साठवणींचे
तरंग मन माझे
सोडवू कोडे कसे आठवणींचे सांग ना सजणा
सुमधुर सुगंध सायलीचाही, सख्या
सले सुन्न मना
पाहून पुनव चंद्रमा, दाटी
नयनी पाऊस रे सजणा
सोनचाफा आठवणीतला, सोडे
मागे, ओघळत्या खारट खुणा
सुमन गंधाळली रजनी, सजा
देई मज नकोशी
ओथंबल्या वेड्या नयनी, समजावू
तरी मी कशी
एकाकी उशी, सहू मी कशी, या निर्दयी निशी
सुखावेल मजसी ती हसरी मिशी अन प्रेमळ
कुशी
चित्रात तुझ्या हसऱ्या, शोधते
हसू रुसलेले माझे
दाटल्या गळा, आवंढे
नकोसे, गिळले मी माझे
वाटेवर तुझ्या, अधीर
डोळे खिळले हे माझे
वाट पाहून तुझी, अश्रूही
थकले रे माझे
वाट पाहून तुझी, अश्रूही
थकले रे माझे.....
प्रशांत नांदे
No comments:
Post a Comment