मराठी चित्रपट सृष्टीच्या पुनःरुजीवनाच्या कालखंडात सुमित्रा भावे- सुनील सुकथनकर द्वयीच्या "दोघी" नंतरचा लक्षणीय चित्रपट म्हणजे "वास्तुपुरुष" २००२ साली जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा तो पाहिला होता. वास्तुपुरुष ही सर्वार्थाने चित्रपटातील प्रमुख पात्र भास्करची गोष्ट. स्वातंत्र्योत्तर पहिल्या दशकातील महाराष्ट्रातील भास्करचे कुटुंब हे मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंब आहे. महाराष्ट्रभर पसरलेल्या एकेकाळी जमीनजुमला बाळगून असलेल्या असंख्य कुटुंबांची गांधी वधानंतर वाताहत झाली. त्यात जात्याच बुद्धिप्रधान असलेली मंडळी शहरांच्या आश्रयाला गेली. मागे उरलेल्या कुटुंबांपैकी एक महाराष्ट्राच्या कोल्हापूरकडील छोट्या गावातील भास्करचे देशपांडे कुटुंब.
चित्रपटाची सुरुवात होते ती आता वयस्कर, प्रतिष्ठित
असलेल्या डॉ.भास्करच्या धीरगंभीर, आत्म-निवेदनाने. यथावकाश
आपण देशपांडेंच्या वास्तूत पोहोचतो. भास्करचे वडील नारायण देशपांडे
स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी बैठक असलेले पण नाकर्ते. घरातील
इतर पुरुष मंडळी म्हणजे भास्करचा काका आणि मोठा भाऊ निशिकांत हे देखील
अर्थाजनासाठी काहीही न करणारे.
कूळ कायद्यात जमिनी कुळांकडे गेल्या व उत्पन्नाचे दुसरे कुठलेच साधन
नसतानाही कुटुंबाचा गाडा समर्थपणे हाकणारी "सरस्वती"
ही भास्करची आई. जणू घराचा आधारस्तंभच. प्राप्त परिस्थितीतून मार्ग
काढायचा व रोज काय रांधायचे हा प्रश्न भेडसावत असतांना, धीर
न सोडता खंबीरपणे उभी राहणारी सरस्वतीच जणू 'वास्तुपुरुष'
आहे असे जाणवत राहते. तिची सर्व आशा जात्याच हुशार असलेल्या
भास्करवर केंद्रित झालेली आहे. गोंधळलेला, अपरिपक्व भास्कर
हताशपणे सभोवताली घडणाऱ्या प्रसंगाचा साक्षी आहे.
देशपांडेंच्या वाड्याचे भव्यपण आतून पोखरलेले आहे. त्यात सरस्वती सहजपणे
वावरते. किंबहुना तेच तिचे विश्व आहे. सरस्वतीचा परीघ जरी फक्त तिच्या घरापुरता
सीमित असला तरी तिला सामाजिक, राजकीय परिस्थितीचे भान
आहे. ती बंडखोर नाही पण व्यवहार आणि वास्तवाची सांगड समर्थपणे न कोलमडता घालते.
आजूबाजूला घडणारे घटनाक्रम ती स्थितप्रज्ञ होऊन पाहते. ती त्या वास्तूतून बाहेर
पडू शकत नाही. पण बदलत्या सामाजिक परिवेशाचे वारे अचूकपणे ओळखते. अखेर भास्कर
जेव्हा वैद्यकीय शिक्षणासाठी अपरिहार्यपणे शहरात जातो तेव्हा सरस्वती भग्न
वास्तूच्या आश्रयानेच आपले जीवन समर्पित करते.
पुरुषकेंद्री समाजात "वास्तुपुरुष"
ही संकल्पना संयुक्तिकच आहे. पण अशा
अनेक सरस्वती त्या वास्तुपुरुषांच्या मागे न कोलमडता उभ्या होत्या. वास्तुपुरुष ही
देशपांडे कुटुंबांचीच कथा नसून प्रातिनिधिक अर्थाने स्वातंत्र्योत्तर काळातील एका
समाजवर्गाचा चित्रपटरूपी आलेख आहे.
सरस्वती बरॊबरच दुसरे महत्वाचे स्त्री पात्र हे "कृष्णा" चे आहे. तिची नाळ
अनेक अर्थाने देशपांडे कुटुंबियांशी बांधलेली आहे. सरस्वतीच्या बरोबर आणि तिच्या
पश्चात ती भास्करची पाठराखण करते. खऱ्या अर्थाने सरस्वतीचे आईपण सांभाळते.
वैखरी फडणीस
vaikhariphadnis@gmail.com
No comments:
Post a Comment