तराजूत बंद होतय कित्येकांच जगणं
असे कित्येक तराजू तयार झाले आहेत.
शोषणाचे,रंगभेदाचे,जातीधर्माचे,लिंगभावाच्या
विनाशाच्या खाईत कोसळले आहेत.
कित्येक गटांना बंदिस्त करणारे असे कित्येक जीव फिरवले जातात तराजू मधून
एका पैके साठी बर्बाद झालेली जिंदगी जगत राहते
रस्त्यावरून,पुलांवरून,सिग्नलच्या चौकातून,
रेल्वेच्या रुळावरून लेकरं भटकत राहतात
टोचण्या मारून चघळत असतात शिळे कुटके
आणि भुकेच्या गदारोळात सापडलेली भाकरी
गिळत राहते झोपडपट्टी पाण्याच्या घोटाबरोबर.
कित्येक वर्ष जगत असलेली शोषणाची व्यवस्था जिंदगी
बनलीय त्यांची आता.
स्थलांतराच कारण देऊन घेतला जातो सूड त्यांचा,तुमच्या आमच्या सगळ्यांकडून.
गिधाडाच्या अवलादी तयार झाल्यात सगळीकडे.
या सगळ्या गिधाडाच्या छातडावर नाड धरून उभी आहे माझी
कविता.
स्वातंत्र्याच्या लक्तरांवर कोरलेल्या अक्षरांची एक
निःशब्द कविता... !!
अक्षय छाया नंदकिशोर
No comments:
Post a Comment