विलायती खाऊ -९ नेपाळी दम आलू



नेपाळ जरी वेगळा देश असला, तरी भारताच्या अनेक भागात नेपाळी लोक स्थायिक झालेले आहेत. त्यांचे पदार्थ आपण दार्जिलिंगसारख्या ठिकाणी पण खाऊ शकतो. तशी तर अगदी साधी बटाट्याची भाजी. पण रंगाला आणि चवीला अगदी मस्त. तिथल्या कडाक्याच्या थंडीत ही भाजी आणि फुलके खाणे म्हणजे मौजच.
'दम' या शब्दाने आपल्या डोळ्यापुढे दम पुख्त प्रकारच्या डिशेस येतात, तशी ही नाही. करायला अगदी सोप्पी. घटकही फारसे नाहीत. या भाजीसाठी बटाटे आधी उकडून घ्यायचे आहेत. पण ते जरा अर्धवट उकडलेले चांगले. कारण भाजीत ते न गळता, थोड्या फोडी राहणे अपेक्षित आहे. कधीकधी भाजीसाठी बटाटे उकडताना, आपल्याकडून अर्धेकच्चे राहतात, त्यावेळी ही भाजी करणे उत्तम.

तर लागणारे जिन्नस असे -

१) अर्धा किलो बटाटे
२) पाव किलो पिकलेले टोमॅटो
३) १ टेबल स्पून टोमॅटो पेस्ट
४) १ टेबल स्पून पंचफोडण ( यात नेमके काय असावे याचा विचार न करता, आपल्याकडे असतील त्यापैकी, राई, जिरे, मेथी, बडीशेप, कलौंजी , तीळ वगैरे घ्यावेत)
५) काश्मिरी लाल तिखट.. अर्थात आवडीप्रमाणे. पण ही भाजी जरा जास्त तिखट करतात. (सुक्या काश्मिरी मिरच्या भिजत घालून, त्याची वाटून केलेली पेस्ट केल्यास जास्त चांगले)
६) फोडणीसाठी तेल. शक्य असल्यास राईचे.
७) मीठ


१) बटाटे अर्धेकच्चे उकडून त्याच्या फोडी करून घ्या.
२) टोमॅटो बारीक कापून घ्या.
३) तेल तापवून त्यात पंचफोडण टाका, ते तडतडले पाहिजे.
४) मग त्यावर टोमॅटोच्या फोडी टाका व परतत रहा.
५) त्या फोडी गळून गेल्या की टोमॅटो पेस्ट व लाल तिखट (वा पेस्ट) टाका.
६) मग त्यात पाणी टाका व पाण्याला उकळी आली कि मीठ व बटाट्याच्या फोडी टाका.
७) बटाट्याच्या फोडी शिजेपर्यंत उकळा.


तिथे ही भाजी घट्ट किंवा पातळ अश्या दोन्ही प्रकारे खाल्ली जाते. फुलक्यासोबत खाताना पातळसर तर नुसती खाताना घट्ट. कांदा, लिंबू, कोथिंबीर असले लाड नसतात, पण तुम्ही खाताना वरून हे जिन्नस घेऊ शकता.

दिनेश शिंदे 


No comments:

Post a Comment