विलायती खाऊ उगाली आणि सुकुमा विकी


मी जवळजवळ २० वर्षे भारताच्या बाहेर रहात आहे. यात ओमान (मस्कत) सारखे प्रगत देश होते, तर नायजेरिया,अंगोलासारखे अप्रगत देशही होते.

मी अगदी लहानपणापासून शाकाहारी आहे. अंडेसुद्धा खात नाही. या सर्व देशात  माझ्या कंपनीतर्फ़े जेवणाची सोय होती, तरीही हौस आणि आरोग्यपूर्ण आहाराची आवड यातून मी कायम स्वत: जेवण करून,जेवत आलो आहे.
भारतात एखादी पाककृती वाचल्यावर आवडली आणि करून बघावीशी वाटली तर आपण सहज बाजारात जातो,घरात नसतील ते घटक विकत घेतो आणि तो पदार्थ करून खातो. 
माझ्यासाठी हे इतके,सोपे कधीच नव्हते. 
अनेक देशात घटक पदार्थ उपलब्ध नसत,असले तरी वाटेल तेव्हा दुकानात जायची सोय नव्हती,तर कधी आवश्यक ती उपकरणे आणि भांडी नव्हती.
पण हे सर्व असले तरी माझी उमेद कधीच कमी झाली नाही. जे घटक उपलब्ध होतील,ते मिळवून, त्यात मला रुचतील असे बदल करत हे पदार्थ मी करतच आलोय. मित्रमंडळींना गोळा करून,त्यांना खाण्यासाठी बोलावत आलोय. त्यातून जे काही पदार्थ घडत गेले,त्यातले काही इथे लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे.
बाजारात मिळणारे आणि त्यातही सामान्य लोक खात असणारे पदार्थ हे रुचकर,सहज उपलब्ध होणाऱ्या घटकांपासून बनणारे आणि बहुतांशी आरोग्यपूर्ण असे असतात. 
बहुतांशी आरोग्यपूर्ण असे म्हणण्याचे कारण,तेलात तळणे आणि तेच तेल परत परत तळण्यासाठी वापरणे,हा तर मी सामाजिक गुन्हा मानतो. (अनेक देशात तेलाच्या अश्या वापरावर बंदी आहे.) मी स्वत: शक्यतो भर तेलात तळणे कायमच टाळत आलो आहे.
या मालिकेत मी वेगवेगळ्या देशांतील शाकाहारी पदार्थ लिहिणार आहे. 
मूळ कृतीत मी,आपल्याला रुचतील असे किंचीत बदल केलेले आहेत. हे पदार्थ आरोग्यपूर्ण तसेच रुचकर नक्कीच आहेत. फक्त ते आपल्याला थोडे अनोळखी आहेत.

भाग १ - उगाली आणि सुकुमा विकी


हा आहे केनयातील लोकांच्या रोजच्या आहारातील पदार्थ. अनेक कुटुंब वर्षभर केवळ हाच आहार घेतात. आणि तरीही त्यांची प्रकृती अत्यंत काटक राहतेच.
उगालीचा मराठीत अर्थ सांगायचा तर मक्याच्या पिठाची उकड. यात मक्याचे जाडसर पीठ आणि असलेच तर मीठ वापरतात. ( हो,तिथे काही जणांना मीठदेखील परवडत नाही.)  तर उकळत्या पाण्यात हे
पीठ घालून ढवळले आणि झाकण ठेवून एक वाफ़ आली,की झाली उगाली तयार. 
यात पाण्याचे आणि पिठाचेही प्रमाण ठरलेले नाही. उपलब्ध पीठ आणि खाणारी तोंडे यावर ते ठरते. अगदी सुशिक्षित केनयन लोक देखील हाच आहार घेतात,फ़क्त मुख्य फ़रक म्हणजे त्यांच्यासाठी खास कोंडा काढलेला मक्याचा रवा उपलब्ध असतो;तर साधारण गरीब वर्ग,मका दळून कोंड्यासकट वापरतात.


सुकुमा विकीचा अर्थ आठवडा ढकला. आणि हाच या भाजीचा व्यवहारातला अर्थ आहे. 

मोहरीच्या वर्गातली ही एक वनस्पती आहे. याची पाने फ़ूटभर लांब असतात आणि केनयात ती सहज उगवते. अनेक जणांच्या अंगणात ही भाजी लावलेली असतेच. अत्यंत मोठी पाने असल्याने ही पाने माणशी एक-दोन   देखील पुरतात. ही पाने अगदी बारीक कापून किंचीत मीठ घालून शिजवतात. उपलब्ध असेल तर त्यात कांदा, टोमॅटो वगैरे घालतात,पण ते जरुरी नाही. उगालीचा हातात वळून खोलगट वाटीसारखा आकार करतात आणि त्यात ही भाजी भरून खातात.

अगदी या स्व
रूपात देखील हे दोन्ही प्रकार रुचकर लागतात. तरी आपल्या पद्धतीने करताना तुपातली हिंग जिऱ्याची फ़ोडणी करून त्यात मक्याचा रवा (इडली रवा पण चालेल) थोडा परतून घ्यायचा आणि मग त्यात दूध मिश्रीत पाणी घालून शिजवायचे.  दूध-तूप घातल्याने,ही उगाली बराच वेळ म राहते.
सुकुमा विकी ही भाजी आपल्याकडे मिळणार नाही. त्या जागी पालक,मेथी,चाकवत,अळू अश्या भाज्या वापरता येतील. त्यात हवे तर मक्याचे दाणे,शेंगदाणे किंवा भोपळा देखील वापरता येईल. अत्यंत साधा असा हा न्याहारीचा  प्रकार नक्की करून पहा.


दिनेश शिंदे

No comments:

Post a Comment