विलायती खाऊ-पारसी पाटीया



आपल्याकडे पारसी लोक आले ते इराणमधून. गुजराथच्या किनाऱ्यावर ते आले आणि दुधात साखर विरघळावी तसे गुजराथी संस्कृतीमधे विरघळून गेले. त्यांची भाषा, पेहराव आणि खाणे यावरही गुजराथचाच प्रभाव आहे. त्यांचे सल्ली बोटी, पात्रा नु मच्छी, लगन नु कस्टर्ड असे अनेक पदार्थ प्रसिद्ध आहेत. पण मूळातच त्यांची संख्या कमी झाल्याने ते चालवत असलेली इराणी उपहारगृहे देखील अगदी मोजकी उरली आहेत. तिथेही असे पारंपरीक पदार्थ मिळतील याची खात्री नाहीच.

पाटीया हा अत्यंत रुचकर प्रकार आहे. तो बहुदा मासे वापरूनच केला जातो. मी इथे शाकाहारी प्रकार देत आहे. शाकाहारी पाटीयादेखील खुपच छान लागतो. 

साहित्यात आपल्याला, २ वाट्या हिरवे मटार (ताजे किंवा फ्रोझन), १ वाटी काजू ( नाही घेतले तरी चालतील, एखादा बटाटा किंवा आणखी १ वाटी मटार घेता येतील), २ लाल टोमॅटो, १ कप भरुन बारीक कापलेली कोथिंबीर, ५/६ हिरव्या मिरच्या, १०/१२ लसूण पाकळ्या, १ टेबलस्पून जिरे, १ टिस्पून मिरे, १ इंच आले, १ कांदा, अर्धा कप व्हीनीगर, मीठ आणि साखर किंवा गूळ लागेल.

पाटीया करण्यासाठी, कांदा आणि टोमॅटो बारीक कापून घ्या. जिरे आणि मिरे कोरडेच भाजून भरड पूड करून घ्या. कोथिंबीर, आले, मिरची आणि लसूण यांचे एकत्र बारीक वाटण करुन घ्या. मग तेलाची फोडणी करून त्यात कांदा गुलाबी परता. मग त्यावर जिरे आणि मिरे पूड घालून थोडे परता. मग त्यावर मिरचीचे वाटण घालून, कच्चट वास जाईपर्यंत परता. मग त्यावर व्हीनीगर घाला व मिश्रणाला उकळी आली कि त्यात साखर घाला. (साखर घातल्याने व्हीनीगरचा वास रहात नाही. त्यामूळे ती अवश्य वापरायची) मग त्यात कापलेला टोमॅटो घालून तो शिजेपर्यंत परता. मग त्यावर मटार आणि बटाटा वा काजू घालून परता. वरुन गरम पाणी घालून भाज्या शिजू द्या. त्या शिजल्या की मीठ घाला. आंबट, गोड, तिखट चवीचा हा पाटीया खुपच छान लागतो. साधा भात किंवा चपाती, दोन्ही सोबत खाता येतो.



दिनेश शिंदे



No comments:

Post a Comment