विलायती खाऊ - ११-कोथु रोटी -श्रीलंकन स्ट्रीट फूड



कोथु रोटी म्हणजे कापलेली रोटी. हा श्रीलंकेतील एक लोकप्रिय खाद्यप्रकार आहे. पण हा प्रकार जेवणामध्ये  खात नाहीत ( जेवण म्हणजे भात आणि करी ). साधारण आपल्या फोडणीच्या चपातीसारखा प्रकार पण जरा खमंग.
मी शाकाहारी प्रकार देत असलो तरी यात अंडे आणि चिकनही घालतात. अंडे थेट वापरतात तर चिकन करी वेगळी करून मग मिसळतात.


यासाठी रोट्या करतात, त्यापण आपल्या चपातीपेक्षा वेगळ्या असतात. मैदा सैलसर भिजवून त्याचे गोळे करतात. मग ते गोळे हाताने आपटत आपटत विस्तारतात. या पोळ्या पूर्ण भाजलेल्या नसतात. भाजताना एकावर एक अश्या टाकत जातात, आणि अश्या अर्धवट भाजलेल्या रोट्यांचे चॉपरने बारीक तूकडे करतात.

अर्थात आपल्या चपात्या, फुलके किंवा अरबी खबूसही वापरता येतील. मला इथल्या तूर्की रेस्तराँ मधे अशी रोटी मिळाली, मी तिच वापरली.


तर लागणारे जिन्नस असे,
) तयार रोट्या किंवा पर्याय.
) ओबड धोबड कापलेल्या भाज्या ( यात कांदा, कोबी, गाजर, मिरच्या वगैरे सर्व साहित्य आपल्या आवडीप्रमाणे घ्या )
) आवडता मसाला ( तिथे त्यांची करी पावडर वापरतात. जरा तिखटच असते ती. ) मिरची पावडरही चालेल.
) मीठ, तेल, कढीपत्ता.
क्रमवार पाककृती:-

) तयार रोटीचे तुकडे करून घ्या.



) भाज्याही कापून घ्या. (मूळ कृतीत आंबट पणासाठी काही घालत नाहीत. माझ्याकडे कैरी होती म्हणून मी तिचे तूकडेही घेतलेत.)


) कढईत तेल तापवून कढीपत्ता व नंतर त्यात सर्व भाज्या एकदमच टाका. (आधी कांदा परतून घ्यायचा नाही. सर्व भाज्या करकरीतच हव्यात.)
) त्या जरा शिजल्या की मसाला टाका, मीठ टाका आणि रोटीचे तुकडे टाका. (अंडे वापरत असाल तर भाज्यांवर फोडून घाला.)
) नीट परतून सर्व मिसळून घ्या. आणि गरमागरम खायला घ्या. हा प्रकार रुचकर लागतोच शिवाय पोटभरही होतो. मी फार कमी तेल वापरलेय, तिथे जरा जास्त वापरतात.


अधिक टिपा :- फोडणीत राई, जिरे, हिंग पण वापरू शकता. पण भाज्यांचा नैसर्गिक स्वाद लपणार नाही, एवढेच मसाले वापरा.


दिनेश शिंदे 



No comments:

Post a Comment