मॉरिशियस म्हणजे
भारताची छोटी आवृत्तीच आहे. तिथल्या बहुतेकांचे मूळ गाव भारतातलेच आहे आणि त्यांनी
आपली संस्कृती आणि भाषा जपण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. यात काही
खाद्यपदार्थही आहेत पण काही शतकांत या पदार्थात काही बदलही झाले आहेत.
दाल पुरी, हा
असाच आपल्या पुरणपोळीशी साम्य
असणारा त्यांचा पदार्थ. पण हा गोड नसतो, तसाच तिखटही नसतो.
नाव पुरी असले तरी ती पोळीच असते. हा प्रकार तिथे रस्तोरस्ती मिळतो. खुपदा गरमागरम आपल्यासमोर करून दिला जातो. या पदार्थासोबत
वेगवेगळ्या भाज्या दिल्या जातात, त्याने याची लज्जत वाढते. अगदी मूळ
स्वरुपातही तो खमंगच लागतो. मला तरी तो पुरणपोळीपेक्षा सोपा वाटतो.
साहित्य:
चणा डाळ, कणीक, तेल, जिरे,
मीठ आणि हिंग एवढेच लागेल.
दाल पुरी करण्यासाठी, चणा
डाळ स्वच्छ धुवून त्यात हिंग, हळद घालून कूकरमधे मऊ उकडून
घ्या. ती शिजेपर्यंत नेहमी चपातीसाठी भिजवतो तशी कणीक भिजवून घ्या. (त्यातही
तेलाचे मोहन आणि मीठ अवश्य घाला.)
डाळ शिजली की त्यात मीठ आणि भाजलेले जिरे घालून चांगली घोटून घ्या.
पाणी राहिलेच असेल तर आटवून घ्या. हे मिश्रण पुरणासारखे घट्ट हवे.
कणकेचा गोळा
घेऊन त्याची पारी करा. त्यात डाळीचे पुरण भरुन, गोळा बंद करुन
घ्या. मग हलक्या हाताने तो लाटून घ्या. पुरणपोळीपेक्षा ही लाटायला खूपच सोपी जाते. मग
तव्यावर मंद आचेवर भाजून घ्या.
आपल्या आवडीप्रमाणे ती खरपूस भाजून घ्या. (तिथे ती
खमंग भाजत नाहीत. खमंग भाजली तर ती कोरडी होते आणि आतले पुरण बाहेर पडते.) ही पुरी (पोळी) लोणचे किंवा तुपासोबत छान लागते. तिथे ती वेगवेगळ्या भाज्यांसोबत खातात.
खास करुन लाल
टोमॅटोची भाजी आणि हिरव्या मिरचीची चटणी, या सोबत ती खातात. ती
कधी कधी तांदळाच्या खिरीसोबतही खातात. (खरं तर ते अगदी परिपूर्ण जेवण आहे.)
दिनेश शिंदे
No comments:
Post a Comment