अंगोला या देशाबद्दल आपल्याला फार माहिती असायचे काही कारणच नसते. आफ़्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरचा हा देश आहे.
पेट्रोल आणि हिरे यामुळे खूपच समृद्धी आहे तिथे. या देशात माझे ५ वर्षे वास्तव्य झाले.
तिथे भारतीय फारच तुरळक आहेत. त्यामुळे खास भारतीय भाज्या मिळत नसत. पण तरीही तिथे असणाऱ्या चिनी आणि इस्रायली लोकांच्या शेतीमुळे स्थानिक भाज्या मिळत असत.
आपल्यासारखे खूप मसाल्याचे पदार्थ
अर्थातच तिथे नसतात. पण तिथे शेंगदाण्याचा खूप वापर असतो.
खमंग भाजलेले शेंगदाणे तिथे कोपऱ्याकोपऱ्यावर विकायला असतात.
बाजारात हातयंत्र वापरून त्या दाण्यांचे (सालीसकट)
केलेले कूटही तिथे मिळते. हे कूट ते ग्रेव्हीसाठी
वापरतात. हे कूट वापरून केलेली कोबीची सोपी भाजी इथे देत आहे.
ही भाजी मी आपल्या चवीनुसार थोडी बदलली आहे.
यासाठी आपल्याला अर्धा किलो कोबी, एक वाटी भाजलेले
दाणे (तुमच्या आवडीनुसार सोलून किंवा सालासकट ), १ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, लाल मिरचीचे भरड, तेल, साखर,
मीठ एवढे साहित्य लागेल.
या भाजीसाठी कोबी अगदी पातळ असा
लांब चिरून घ्यायचा. दाण्यांपैकी थोडेसे वगळून बाकीचे दाणे मिक्सरमधून
बारीक वाटून घ्या. थोडे पाणी घातले तरी चालेल. (तयार खारे दाणे पण वापरू शकता. तसे वापरले तर भाजीत मीठ
बेताने घाला.)
तेल तापवून हिंग जिऱ्याची फ़ोडणी करा. त्यावर चिरलेल्यापैकी अर्धा कोबी घालून परता. तो किंचीत मऊ झाला की दाण्याचे वाटण आणि थोडे मीठ आणि साखर घाला. त्यात पाणी घालून शिजू द्या. मग एका प्लेटमधे बाकीचा कापलेला कोबी घ्या. त्यावर शिजवलेला कोबी घाला. वरून लाल मिरचीचे भरड घाला.
तेल तापवून हिंग जिऱ्याची फ़ोडणी करा. त्यावर चिरलेल्यापैकी अर्धा कोबी घालून परता. तो किंचीत मऊ झाला की दाण्याचे वाटण आणि थोडे मीठ आणि साखर घाला. त्यात पाणी घालून शिजू द्या. मग एका प्लेटमधे बाकीचा कापलेला कोबी घ्या. त्यावर शिजवलेला कोबी घाला. वरून लाल मिरचीचे भरड घाला.
अत्यंत चवदार अशी ही डिश नुसती
किंवा टोस्टसोबत खाऊ शकता. नुसती चवदारच नव्हे तर ही भाजी आरोग्यपूर्णदेखील
आहे. मॅगीसाठी हा अत्यंत चांगला पर्याय आहे. यात तुम्ही गाजर, बीट पण वापरू शकाल. मूळ पदार्थात मिठाशिवाय काहीच घालत नाहीत, पण तुम्ही
हवा तो मसाला वापरू शकाल. मॅगीला पर्याय म्हणून करत असाल,
तर तो मसालाही वापरू शकाल.
दिनेश शिंदे
No comments:
Post a Comment