विलायती खाऊ – १२ - त्रिनिदाद डबल


त्रिनिदाद डबल, हा त्रिनिदादमधला एक स्ट्रीट फूडचा प्रकार आहे, आणि तो खूप लोकप्रियही आहे. हा पदार्थ आपल्या छोले-भटूरेला खूपच जवळचा आहे, पण काही फरकही आहेतच.


मुख्य फरक आहे तो काबुली चणे शिजवताना जो मसाला वापरतात त्यात. आपल्याकडे त्यात बरेच गरम मसाले असतात. आणि ते मसालेही बराच वेळ परतले जातात. तिथे मात्र यासाठी करी पावडर वापरली जाते.

भारतात आपण करी पावडर हा शब्दही सहसा वापरत नाही. आपल्याकडचे जे मिश्रण असते त्याला खास नावे असतात (गोडा मसाला, मालवणी मसाला वगैरे) किंवा त्या त्या पदार्थाचे नावच आपण त्या मसाल्याला देतो (पावभाजी मसाला, सांबार मसाला). पण भारताबाहेर मात्रकरी पावडरआणि त्यातहीइंडीयन करी पावडरअसा मसाला मिळतो.

हा बहुदा ब्रिटिशांनी जन्माला घातलेला मसाला आहे. त्यातले घटक बघितले तर त्यात प्रामुख्याने हळद आणि थोडीफार मिरी असते. क्वचित लवंग, जिरे, धणे, मेथी असल्या मसाल्यांचा उल्लेख असतो, पण त्याची चव मात्र जाणवत नाही. मिरची असेल तर नावालाच असते. दाटपणासाठी तांदळाचे पीठ मिसळलेले असते. हा मसाला वापरून केलेले पदार्थ रंगाला आपल्या वरणासारखे पिवळे धम्मक होत नाहीत, तर मातकट पिवळे होतात. चवीला वरणापेक्षा फार वेगळे नसतात.

पण त्रिनिनादमधे मात्र या पदार्थात वरून काही चटण्या, सॉसेस मिसळतात. त्यापैकी एक असतो तो कच्ची कैरी आणि खास तिखट मिरच्या घालून बनवलेला असतो. (या मिरच्या आपल्या सिमला मिरच्यांची छोटी आवृत्ती असल्यासारख्या दिसतात, पण भारी जहाल असतात. माझ्यासारखे काही लोक तर त्यांना हातही लावू शकत नाहीत.) त्यामुळे आपल्या चवीनुसार हा पदार्थ तिथे तिखट, आंबट करून घेता येतो.

भटुरे सदृष्य जे काही असते त्याला तेबराम्हणतात. पण ते आपल्या भटुऱ्यासारखे टम्म फुगलेले नसते, तर नानसारखे जाडसर असते. ते यीस्ट वापरूनच करतात आणि भर तेलात तळतात (मी सेल्फ रेझिं फ्लोर वापरलेय आणि थोडे जास्त तेल वापरून, पण तव्यातच तळलेय.) आणि 'डबल' म्हणायचे कारण म्हणजे असे दोन बरे घेऊन त्यांच्या मधे छोल्यांचे मिश्रण भरून खाण्याची प्रथा आहे तिथे.

तर लागणारे जिन्नस :-

) दोन कप सेल्फ रायझिंग फ्लोअर (दुकानात तयार मिळते. नाहीतर नेहमीच्या पिठात सोडा आणि बेकिंग पावडर मिसळून वापरता येईल.)
) मीठ
) तेल
) कपभर छोले ( काबुली चणे ) भिजवून, शिजवून घेतलेले. ( टिन वापरला तर सोयीचे होते. १ टिन पुरेल)
) १ मोठा कांदा. ऊभा चिरून
) /६ लसूण पाकळ्या, बारीक चिरून
) १ टेबलस्पून करी पावडर ( त्याएवजी हळद, धणेजिरे पूड, थोडा गरम मसाला असे मिसळून घेतले तरी चालेल )
) वरून घेण्यासाठी आवडत्या चटण्या व सॉस.

क्रमवार पाककृती:-
) कुकरमधे तेल तापवून त्यात कांदा व लसूण परता.
) त्यात करीपावडर ( वा पर्याय ) घालून परता.
) मग चणे टाकून पुरेसे पाणी टाका, मीठ टाका आणि चणे नरम होईतो शिजवून घ्या.
) सेल्फ रेझिग फ्लोरमधे मीठ व तेल घालून, पाण्याने सैलसर मळा.
) हे मिश्रण लगेच फुगू लागते. त्याचे लिंबाएवढे गोळे करून घ्या.
) तेलाचे बोट लावून हातानेच पुरीएवढे थापून घ्या.
) तव्यावर तेल घालून ते सोनेरी रंगावर तळून घ्या.
) डिशमधे छोले घ्या, सोबत आवडत्या चटण्या घ्या आणि बऱ्यासोबत खा.


अधिक टिपा :-
हा प्रकार छोले भटुऱ्यापेक्षा फारच सौम्य चवीचा असल्याने, लहान मुलांसाठी चांगला आहे. मोठी व तिखट खाणारी माणसे, आपल्याला हवे तेवढे तिखट वा आंबट करून घेऊ शकतात.

दिनेश शिंदे

No comments:

Post a Comment