हा आहे एक अरेबिक पदार्थ. (सौदी
किंवा इजिप्त) आता पहिली ठेच लागणार, ती या नावालाच. अर्थातच हा अरेबिक शब्द आहे आणि त्याचा
अर्थ अलिची आई (उम्म=आई). पण हा 'म्म' इतका कठोर नसतो आणि अलिचा उच्चार
मात्र थोडा घश्यातून करावा लागतो. अहमद आणि अलि या दोन शब्दातले, "अ"
वेगळे आहेत.
तर कुण्या अलि नावाच्या मुलासाठी
त्याच्या आईने केलेला हा पदार्थ, तिच्याच नावाने ओळखला जातो. चवीला अर्थातच
भन्नाट लागतो.
या पदार्थाचे घटक आपल्या मनाप्रमाणे
बदलू शकता, आणि आपापले version करु शकता. (कोण जाणे, कदाचित तो पदार्थ तुमच्याही नावाने ओळखला जाईल.)
साहित्य-
१) दोन टेबलस्पून बदाम/पिस्ते यांचे तुकडे (बदाम/पिस्ते
इराणमधे मुबलक पिकतात. अरब जगतात ते सढळ हस्ते वापरतात.
काजू मात्र शक्यतो नसतात.)
२) दोन टेबलस्पून खजूर
३) १ टिस्पून तूप
४) अर्धा कप दूध
५) २ कप आटवलेले दूध
किंवा २ टिन इव्हॅपोरेटेड मिल्क किंवा २ कप बासुंदी किंवा १ टिन मिल्कमेड +
१ कप दूध
६) सुक्या खोबऱ्याचे
पातळ तुकडे १ टेबलस्पून
७) लागलीच तर साखर
८) पफ पेस्ट्री
( म्हणजे आपली खारी, पण बेसिक पफ पेस्ट्री खारी
नसते. सुपरमार्केट्च्या फ्रोझन सेक्शनमधे मिळेल. पण पर्याय सुचवतोय ते पहा.
) ४ चौरस इंच किंवा १ एक मध्यम क्रोसैन्त ( कदाचित
फ्रेंच उच्चार कृतां असा असेल, चंद्रकोरीच्या आकाराचा कुरकुरीत
फ्लेकी पाव. या शब्दाचा अर्थच चंद्रकोर असा आहे. हा पण बेकरीत तयार मिळेल. घरी करणे फार जिकीरीचे आहे.) किंवा आपल्या आवडीचे बिस्किट ( आकारानुसार १ ते २
)
१०) ऑरेंज ब्लॉसम वॉटर,
एक टी स्पून ( हे संत्राच्या मोहोराचे पाणी असते.
गुलाबपाण्यासारखे वापरतात. ते न मिळाल्यास ताज्या
संत्राची किसलेली साल १ टी स्पून (फक्त केशरी भागच घ्या) किंवा संत्राची पाकवलेली साल. (आपल्याकडे सुक्या मेव्याच्या
दुकानात मिळते. Candied peel ))
आता कृती पाहू या.
१) फ्रोझन पफ, पेस्ट्री वापरत असाल तर ती बेक करून
कुस्करून घ्या. क्रोसैन्ट पण असेच जरा गरम करुन कुस्करून घ्या. बिस्कीट
वापरत असाल तर तसेच कुस्करून घ्या.
२) तुपात खोबऱ्याचे तुकडे, बदाम पिस्ते जरा
परतून घ्या. नंतर त्यावर खजूरही टाकून परता. पण खजूर फार परतू नका, कडू होतो.
३) मग त्यावर साधे
दूध घालून सगळे एकजीव करा. त्यावर पेस्ट्री / कृतां / बिस्किटाचा चुरा घाला. मिनिटभर शिजू द्या.
४) मग त्यावर आटवलेले
दूध (किंवा त्याचे पर्याय) घाला.
हवी तर साखर टाका आणि ढवळा.
५) खाली उतरून,
बोलमधे घालून वर ऑरेंज वॉटर वा त्याचे पर्याय टाका. आणि चमचा चमचा भर खात रहा.. झोप लागेपर्यंत.)
घटक वेगळे आहेत खरे, पण याची चव भन्नाट असते. हा प्रकार गरमच
खायचा असतो. खरं तर घरात उपलब्ध असतील ते पदार्थ वापरून
करायचा प्रकार आहे. स्पंज केकचा तूकडा, असेल तर तोदेखील
वापरु शकाल. हे सगळे घटक मिळून जे रसायन तयार होते ते अप्रतिम लागते. आणि त्यातले
घटक वेगवेगळे ओळखता येत नाही. त्यामुळे तुमच्या अलि, (पिंट्या, मुन्ना,
बबडी, रज्जू.. जो कोणी असेल तो) खुश होऊन
जाईल.
No comments:
Post a Comment