मित्रमंडळ इंदिरानगर, बेंगळुरू या संस्थेने भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट, २०२१ रोजी ‘ भारताचा विस्मृतीतला स्वातंत्र्यलढा ‘ या वेगळ्या विषयाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मार्गदर्शक म्हणून लाभल्या होत्या वीरमाता अनुराधा गोरे. त्यांचाही वाढदिवस १५ ऑगस्ट याच दिवशी. त्यामुळे एक अपूर्व असा योग जुळून आला. त्यांच्याशी सुसंवाद साधला गंधाली सेवक यांनी.
मनोरमाताईंनी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनुराधाताईंची ओळख करून दिली. हुतात्म्यांच्या नातेवाईकांना मदतीचा हात असो किंवा सैन्यातल्या विविध पदभरतीसाठी युवा पिढीला उद्युक्त करणे असो, त्या सतत देशासाठी या ना त्या रूपाने झटत असतात. त्यांच्या नसानसात देशप्रेम आहे.आदर्श शिक्षिका, प्रथितयश लेखिका म्हणून सर्वजण त्यांना ओळखतात. २००९ ते २०२१ या कालावधीत त्यांची २४ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या कार्याची दखल अनेक वृत्तपत्रे आणि वाहिन्या यांनी घेतली आहे. सह्याद्री वाहिनीचा ‘हिरकणी पुरस्कार’, महाराष्ट्र शासनाचा ‘वीरमाता पुरस्कार’ अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे.
गंधालीने कुसुमाग्रजांच्या “अनाम वीरा... ” या कवितेने साजेशी सुरुवात केली. अनुराधाताईंचे आवडते कार्यक्षेत्र, इतिहासातला भारतावरचा पहिला हल्ला, हिंदुस्तानची सत्ताविसावी फाळणी, इतिहासातल्या स्वातंत्र्य लढ्यातला स्त्रियांचा सहभाग अशा प्रकारचे सुंदर प्रश्न विचारून अनुराधाताईंकडून माहितीचा खजिना प्रेक्षकांपर्यंत गंधाली यशस्वीपणे पोहचवत होती.
आपल्याला फक्त मुघलांचा इतिहास माहीत असतो. परंतु त्याआधी ग्रीक, शक, कुशाण, हूण, तुर्क, अफगाण यांनीदेखिल भरतखंडावर कसे आक्रमण केले, त्यांचा प्रतिकार आपल्या इथल्या राजांनी कसा केला याची उदाहरणे देत अनुराधाताई आपल्याला इतिहासात घेऊन गेल्या. अलेक्झांडरच्या भारतावरच्या हल्ल्यामागील सुप्त हेतु, शकांनी उद्ध्वस्त केलेली तक्षशिला, गुजरात मधले परिहार घराणे, हिंदुकुश हे पर्वताला कसे नाव पडले असे इतिहासातले एकेक पदर त्या आपल्या ओघवत्या वाणीने उलगडत होत्या. एकीकडे उत्तरेत परकीय हल्ले होत असताना दक्षिणेत व्यापार-उदिम भरभराटीला आला होता. व्हिएतनाम, सिंगापूर, कोरिया, मालदीव, इत्यादी देशात हिंदूंचे राज्य होते हे ऐकून नवल वाटले. दक्षिणेमधले ताकतवर व समृद्ध ‘चोला घराणे’ या राज्यांशी व्यापार करायचे. वास्को-द-गामा आपल्या ७-७ मजली व्यापारी बोटी बघून अचंबित झाला होता.
स्त्रियांच्या इतिहासातल्या स्वातंत्र्यलढयामधल्या सहभागाविषयी नव्यानेच माहिती कळली. महंमद कासिमच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या दाहिर या हिंदू राजाच्या दोन मुली, पोर्तुगीजांचा सात वेळा पराभव करणारी अबक्का राणी, देवदासी प्रमुख शोभा सोमनाथ यांचा लढा, लढाईत कच खाणाऱ्या नवऱ्याला स्वत:चे मस्तक भेटवस्तू म्हणून देणारी नववधू राणी तर पहिला ह्यूमन बॉम्ब् म्हणून इतिहासात जिची नोंद झाली ती कुली अशा पडद्यामागच्या कितीतरी कहाण्या अनुराधाताईं सांगत असताना अंगावर काटा येत होता.
इतिहासातले सगळे प्रसंग जणू काही त्यांनी प्रत्यक्ष बघितलेले आहेत असेच वाटत होते. इतिहासातल्या सगळ्या नोंदी, सनावळी त्यांना मुखोद्गत आहेत. अडीच हजार वर्षांमधला रणांगणातल्या इतिहासाचा अनुराधाताईंचा अभ्यास आहे. यावर ‘आओ फिरसे दिया जलाये’ याचे चार खंड प्रसिद्ध करण्याचा त्यांचा मानस आहे. १९७१ च्या युद्धाला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने एक नाटक तीन भाषांमध्ये करण्याची त्यांची इच्छा आहे.
हाडाच्या शिक्षिका असल्याकारणाने, मुलांना शिकविण्यात जास्त आनंद मिळतो असे त्या म्हणाल्या. स्वतः एखादे सायंटिफीक खेळणे बनविल्याचा जो आनंद त्यांना मुलांच्या चेहेऱ्यावर दिसतो तो त्यांना खूप भावून जातो. ‘इतिहासाला ज्यांना धरून रहाता येत नाही त्यांचा भूगोल बदलतो’ हे सगळ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. सद्यपरिस्थितीत युद्धसिद्धता, offensive defense हाच उपाय असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. जबरदस्तीने दुसऱ्या धर्मात ओढल्या गेलेल्या लोकांना आपल्या धर्मात परत घेतले गेले पाहिजे, हे सावरकरांचे विचार आचरणात आणले जात नाहीत ही खंत त्यांनी व्यक्त केली. त्यांचा मुलगा दि. कॅप्टन विनायक गोरे, त्यांची प्रेरणा आहे. देव वेगवेगळ्या रूपात त्यांना मदत करत असतो अशी त्यांची श्रद्धा आहे. पोटतिडीकीने आपल्या देशाविषयी इतके समरसून बोलणाऱ्या अनुराधाताईंकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. आपल्या लिखाणातून सर्वांना विशेषतः आजच्या युवा पिढीला जागृत करण्याचे मोठे काम त्या करत आहेत. भरतखंडातल्या देशभक्ती, शौर्याचा वारसा युवा पिढीने पुढे चालवावा असे त्यांना मनापासून वाटते. ‘गझवा ए हिंद’ चे स्वप्न पूर्ण व्हायला नको असेल तर आपल्या मनावरची ग्लानी झटकून द्यायला हवी असे परखड मत त्यांनी मांडले.
नरेन नंदे आणि श्वेता पानवलकर या मित्रमंडळ कार्यकारिणी सदस्यांनी कार्यक्रमाची तांत्रिक बाजू सांभाळली. कोरोना काळातही एक उत्कृष्ट कार्यक्रम मित्रमंडळाने सादर केला. कार्यक्रमाच्या शेवटी मित्रमंडळाच्या उपाध्यक्ष स्नेहा केतकर यांनी अनुराधाताईंचे आभार मानले. आगामी गणेशोत्सव कार्यक्रमाविषयी माहिती दिली आणि कार्यक्रमाचा समारोप केला.
वीरमाता अनुराधा गोरे यांची मुलाखत पहाण्यासाठी खालील लिंक क्लीक करा.
भारताचा विस्मृतीतला स्वातंत्र्यलढा - YouTube
रुपाली गोखले
No comments:
Post a Comment