‘वॄद्धाश्रम’ हा शब्दच आपल्या समाजात स्वतःभोवती बरीचशी नकारात्मकता लेऊनच वावरतो असं मला नेहमी वाटत आलंय. वॄद्धाश्रम - अर्थात वॄद्धांसाठी असलेला आश्रम. आश्रम - घर नव्हे, घर का नाही? कारण या वृद्धांनाच घर नाही म्हणून. त्यांना त्यांच्या मुला-सुनेने, लेक-जावयाने या ठिकाणी आणून सोडलं आहे, त्यांची जबाबदारी घ्यावी लागू नये म्हणून... बिच्चारे, कसे जगत असतील इथे?
साधारणपणे हे आणि असंच बोललं
जात असतं वॄद्धाश्रमांबद्दल. मग समाजातून अशा ज्येष्ठांबद्दल निघणारे दयार्द्र उद्गार, त्यांच्या अपत्यांबद्दल
अपशब्द हे आणि असंच सारं... क्वचित प्रसंगी एखाद्या जोडप्याने स्वखुशीने वॄद्धाश्रमाचा पर्याय स्वीकारला
तरीसुद्धा ते आपल्या मुलांच्या चुकांवर कसे पांघरूण घालत आहेत या बद्दल चर्चा रंगतात. एकुणातच काय, लहान मुलांना
सांभाळण्यासाठी पाळणाघराचा पर्याय जसा सहजतेने स्वीकारला जातो तसा स्वीकार वॄद्धाश्रमांबाबत
होताना दिसत नाही. त्याभोवती नेहमीच संशयाची सुई फिरत असते.
आपण सारेच
हे मान्य करू की काळ खूप झपाट्याने बदलत चाललाय. अगदी १०-१५ वर्षांपूर्वी असलेली
जीवनव्यवस्था आता समूळ बदललेली दिसते.
प्रत्येक बाबतीत संगणकाचा,
प्लॅस्टीक पैशाचा वापर,
त्यामुळे प्रत्येक बाबतीचा वाढलेला वेग आणि त्या वेगाशी मिळतंजुळतं घेण्याचा
प्रयत्न करणारे आपण सारे. याचा उहापोह इथे करण्याची गरज इतकीच की या बदलत्या काळानुसार जसे आपण
स्वतःला बदलत चाललो आहोत,
अगदी तसंच या बदलत्या काळाची 'वॄद्धाश्रम' हीसुद्धा एक गरज झाली आहे
असं मला वाटतं.
आता वॄद्धाश्रम
ही काळाची गरज कशी काय असू शकते याचा जरा विचार करुयात.
सर्वांत पहिला आणि महत्वाचा
मुद्दा म्हणजे सर्वच बाबतीत आलेली स्त्री-पुरुष समानता. मुली/स्त्रिया या अक्षरशः सर्वच
बाबतीत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समाजात वावरतात, आपापल्या क्षेत्रात कार्य
करत प्रगती साधताना दिसत आहेत. हे प्रगतीचं चित्र नक्कीच सुखावह आहे. पण त्याचमुळे पूर्वापार
चालत आलेल्या कुटुंबव्यवस्थेला आणि या व्यवस्थेला पूरक मानल्या जाणाऱ्या आधीच्या पिढीतील
स्त्रीच्या नोकरी/व्यवसायाच्या संकल्पनेला कुठेतरी छेद जात आहे. आधीच्या पिढीपेक्षा या पिढीतल्या
मुली अधिक शिकलेल्या, सक्षम आहेत. आधीच्या पिढीत होत्या, नाही असं नाही, पण तरीही
कुटुंबाचा विचार करताना, घरात काही अडचण
आली किंवा अपत्य संगोपनासाठी म्हणून किंवा ज्येष्ठांच्या आजारपणात म्हणून
पती-पत्नी दोघांपैकी एकाला अधिक वेळ घरी थांबणं भाग असेल तर बऱ्याचदा ही घरची
आघाडी स्त्रियाच सांभाळत आल्या आहेत; प्रसंगी आपल्या करियरला तिलांजली देऊनही!
मात्र
यापुढे हे प्रत्येक वेळी शक्य होईलच असं नाही. स्त्रीची नोकरी गॄहीत धरण्याचा
काळ केव्हाच मागे पडला.
तीसुद्धा एका आस्थापनामध्ये जबाबदार
पदावर काम करत असते. मूल जन्माला घालायचं की नाही? उत्तर हो असेल तर केव्हा?
घरी/ऑफिसात त्या वेळची पर्यायी
व्यवस्था काय असेल या सर्वांचा विचार
करूनच तो निर्णय घेतला जातो. मात्र अचानक आलेलं घरातील वॄद्धांचं आजारपण आणि त्यावर करायची उपाययोजना
या किंवा अशाच वॄद्धांशी निगडीत समस्यांना बदलत्या काळात पती किंवा पत्नी यांनी काही काळासाठी का होईना
पण नोकरी सोडून घरी राहणं हे उत्तर असू शकत नाही. किती दिवस रजा घेऊ शकतो
यावर मर्यादा असतेच. नोकरी सोडल्यास नंतर लगेच तशीच मिळेल याची शाश्वती नाही. त्या काळात होणारी आर्थिक
ओढाताण, आजारपणामुळे आधीच वाढलेला खर्च या आर्थिक बाबी विचारात घेता दोघांची नोकरी असणं
गरजेचं.
एखादा
चांगला वॄद्धाश्रम बघून त्यात अशा वृद्धांची सोय करता आली, तर अनेक प्रश्न मार्गी लागू
शकतात. अशा ठिकाणी असलेले मदतनीस प्रशिक्षित, सेवाभावी वॄत्तीचे
असतात. वेळप्रसंगी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जाते. तसंच आपल्या समवयस्कांशी
भेटीगाठी होत राहिल्यामुळे वॄद्धांनाही एकाकी वाटत नाही. बऱ्याचदा घरात ज्येष्ठ नागरिकांच्या
सोयीसाठी 'अँटी स्कीड टाईल्स, हँड रेलिंग, टॉयलेट सीट्स' अशा लहानसहान सोयींची उणीव जाणवते. वॄद्धाश्रमात मात्र या साऱ्या पर्यायांचा
विचार करून उपाययोजना केलेली असते.
वॄदधांचं
आजारपण हे एकच कारण नाही, तर अनेकदा फ्लॅट संस्कृतीत वॄद्धांना घरात एकटं ठेवणं हेही
जोखमीचं असतं. बंद दारांच्या फ्लॅट्समध्ये पूर्वीसारखं खुट्ट झालं की शेजारी मदतीला
हजर असणं शक्य नसतं. अशा परिस्थितीत घरी मदतनीस ठेवणे हा एक पर्याय असू शकतो. मात्र तो तितकाच जोखमीचाही
आहे. मदतनीस विश्वासू,
प्रामाणिक, वॄद्धांना सांभाळण्यात तरबेज
असायला हवा. त्या पार्श्वभूमीवर
ऑफिसातही पती-पत्नी घरात असणाऱ्या पालकांच्या
चिंतेने कामावर लक्ष एकाग्र करू शकणार नाहीत.
वॄद्धाश्रमाची
गरज ही केवळ रुग्ण, विकलांग अवस्थेतच भासते असा काही भाग नाही. खरं तर पूर्वपार चालत आलेल्या
आश्रम पद्धतीनुसार ‘वानप्रस्थाश्रम’ व्यतीत करण्याची सुयोग्य जागा म्हणजे वॄद्धाश्रम. ज्येष्ठ
नागरिकांनी शरीराने, मनाने सक्षम असतानाच घराची,
कुटुंबाची धुरा पुढच्या पिढीकडे सोपवून स्वेच्छेने या पर्यायाचा विचार
करून पहावा.
नव्या पिढीला त्यांच्या मतानुसार जगण्याची-वागण्याची मुभाही मिळेल. एका घरात दोन पिढ्यांत सतत होणारे मतभेद, कुरबुरी यांपासून सुटका होईल. समवयस्कांसोबत खेळीमेळीने जीवन व्यतीत करता येईल. एखादा सामाजिक उपक्रमही सगळ्यांनी मिळून राबवता येईल. जेव्हा मुलांना आपली वा आपल्याला मुलांची गरज भासेल/आठवण येईल तेव्हा घरीही आनंदाने राहता येईल. पुण्यातील 'अथश्री' याच संकल्पनेवर कार्यरत आहे.
एकमेकांशी सतत भांडत, धुसफुसत एकमेकांना सहन करत रहाण्यापेक्षा दूर राहून स्नेह कायम ठेवणं हे केव्हाही श्रेयस्करच! मात्र हे घडून येण्यासाठी मानसिक तयारीचीही गरज आहेच; विशेषतः स्त्रियांना घरावरील, मुलावरील आपले अधिकार असे सहजासहजी सोडावेसे वाटत नाहीत. ते जर जमलं तर पुढची मोहीम फत्ते होणारच.

काळानुरूप
वागायचं तर ‘वॄद्धाश्रम’ या संकल्पनेतही काही सकारात्मक बदल घडणं गरजेचं आहे, ज्यामुळे तिथल्या वास्तव्याचं
आकर्षण वाढेल. आपला माल विकण्यासाठी अवलंबलेला 'मार्केटींग फंडा' म्हणू शकतो याला. वॄद्धाश्रमाशी संलग्न
असं पाळणाघर सुरू केल्यास
आजी-आजोबांना वेळ घालवण्याचा प्रश्न
भेडसावणार नाही, कारण अनेक चिमुरडी त्यांच्या अवतीभवती असतील. या मुलांनाही आजी-आजोबा मिळतील. दिवसातील
काही वेळ दोघांना एकत्र आणलं तर मुलांना गोष्टी सांगणं, खेळवणं अशी कामं थोडा वेळ
करून ज्येष्ठांना बरं वाटेल आणि मुलं आजी-आजोबांकडून संस्कार ग्रहण
करतील.
वॄद्धाश्रम व पाळणाघर संलग्न असल्यामुळे मदतनीस, इतर साहित्य सामायिकपणे वापरता येईल, त्यामुळे बचतही होईल आणि वातावरण उत्साही राहील, जे अधिक महत्त्वाचं. ही संकल्पना काही ठिकाणी राबवली जातेय आणि त्याला जोरदार प्रतिसाद मिळतो आहे.
त्याचप्रमाणे वॄद्धांसाठी वाचनालय, टी.व्ही., त्यांच्या आवडीनुसार एखाद्या विषयावर व्याख्यान किंवा तेथे रहात असलेल्याच एखाद्या सभासदाच्या कार्याच्या स्वरूपाची इतरांना ओळख असे कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात. महिन्यातून एकदा जशी वैद्यकीय तपासणी होत असते, तसंच एखाद्या डॉक्टरचं, आहार तज्ज्ञाचं व्याख्यान, व्यायामाचं सत्र, समुपदेशन या सुविधांचाही विचार व्हावा, जेणेकरून तिथलं वास्तव्य ज्येष्ठांना हवंहवंसं वाटेल. या व अशा अनेक लहान मोठ्या उपायांचं फलित म्हणून या ज्येष्ठांचं तिथलं वास्तव्य हे त्यांना नैराश्याच्या गर्तेत घालणारे न वाटता नवनवीन उत्साहवर्धक उपक्रमांची रेलचेल असलेले सकारात्मक वाटू लागेल आणि त्यांच्या आयुष्यातील उत्तरार्धातही सौख्याचे क्षण येऊ शकतील.

गेल्या
तीस-चाळीस वर्षांत संगणक हा एक स्मार्ट ऑप्शन न रहाता आजच्या युगाची गरज बनून गेला
आहे. तसंच त्या अनुषंगाने बऱ्याच गोष्टी विजेच्या वेगाने बदलत राहणार आहेत. बदललेली कुटुंबव्यवस्था
आणि कुटुंबव्यवस्थेचे भरभक्कम आधारस्तंभ म्हणजे पाळणाघरं, वॄद्धाश्रम या व अशा सोयी
पुरविणाऱ्या संस्था, हे असं चित्र काही वर्षांतच सर्वदूर पहायला मिळेल. गरज आहे ती या चित्रात आपण
स्वतःला बेमालूमपणे फिट करून घेण्याची,
जेणेकरून चित्रात कुठेही खाडाखोड होणार नाही, चित्र विजोड दिसणार नाही.
यासाठी सर्वांनीच थोडी कालसापेक्ष लवचीकता स्वीकारायलाच हवी.
No comments:
Post a Comment