१९८६
च्या उन्हाळ्यातली जून महिन्यातली गोष्ट असावी. मी पाचवीतून सहावीत जाणार तो
उन्हाळा. शाळा ८-१० दिवसात सुरू होणार
होती. मी माझ्या मावशीकडे नागपुरातील महाल भागात तिच्या प्रशस्त वाड्यात आणि
संयुक्त कुटुंबात दरवर्षीप्रमाणे १५-२० दिवस उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करून
माझ्याच वयाच्या मावसबहिणीला घेऊन आमच्या घरी परतलो होतो. त्या दिवशी संध्याकाळी
माझे बाबा ऑफिसमधून लवकर घरी आले आणि आम्हाला पाहून म्हणाले,
"लवकर तयार व्हा, आपल्याला एक इंग्लिश
सिनेमा बघायला अलंकार टॉकीजमध्ये रात्री ९ वाजता जायचे आहे." आणि मी उडालो. एकतर
चौथीपर्यंत पूर्ण मराठीमध्ये शिकून पाचवीत "लोअर इंग्लिश"च्या नावाखाली
इंग्रजी भाषा नुकतीच कुठे शिकायला लागलो होतो. त्यामुळे अक्षराला अक्षर लावून
वाचायच्या दिवसात इंग्लिश सिनेमा? काय कळणार
कप्पाळ! दुसरं म्हणजे अलंकार टॉकीज त्या वेळचे नागपुरातील सर्वात
चांगले चित्रपटगृह आणि रात्री ९ ला जायचे म्हणजे रात्री १० वाजता झोपी जायच्या
शालेय दिवसात “लास्ट शो”चा
माझा पहिलाच अनुभव. आता इतकं करून असा कुठला पिक्चर बाबा दाखवणार आहेत त्याचा
विचारच करत होतो तर त्यांनी नाव सांगितले, "गन्स ऑफ
नॅव्हरॉन".
त्यांनी पुढे असेही सांगितले की त्यात त्यांचा फेव्हरेट इंग्लिश हिरो ग्रेगरी पेक
आहे आणि हा चित्रपट दुसऱ्या महायुद्धातील एका प्रसंगावर आहे. त्यावेळी दुसरं
महायुद्ध काय ते ही माहीत
नव्हते. ह्या चित्रपटाचा तो शेवटचा दिवस होता म्हणून “लास्ट डे लास्ट शो” ! त्या वेळी आमच्याकडे असलेल्या
"हिरो मॅजेस्टिक" ह्या लुनाच्या स्पर्धक असलेल्या दोनचाकी गाडीवर माझे
वडील आणि त्यांच्या मागे मी व माझी मावसबहीण,
अशी आमची वरात निघाली. सिनेमा बघितला, अर्थात एकही संवाद ओ
की ठो कळला नाही. पण चित्रपट काय आहे त्याचा अंदाज आला.
एका
जर्मन बेटावर असलेल्या दोन अजस्त्र तोफा ज्यांच्यामुळे मित्रपक्षांची जहाजे बुडत
होती. त्या तोफा निकामी करण्यासाठी एक मोजक्या लोकांची तुकडी नॅव्हरॉन बेटावर
पोहोचते. त्या तुकडीसमोर आलेली संकटे, त्यातून
त्यांनी काढलेला मार्ग, त्यांचा एकमेकांमध्ये असलेला संवाद
तसेच विसंवाद, जर्मन सैन्याचे आव्हान या सर्वांना सामोरे
जाऊन शेवटी यशस्वीपणे त्या तोफांचा लावलेला निकाल, असा तो
चित्रपट होता. काहीतरी भव्यदिव्य पाहिल्याची जाणीव झाली तसेच चित्रपटाचा हिरो
ग्रेगरी पेक (जो देव आनंद सारखा दिसतो म्हणून आधीच्या पिढीत आवडता होता) याने
दाखवलेले नेतृत्वगुण तसेच कर्तव्यनिष्ठा मनात ठसली. एका अर्थाने हा एक युद्धपट
होता पण त्यातील लोकांच्या एकमेकांमधील संबंधांमुळे नाट्य निर्माण झाले होते.
तोपर्यंत माझ्या वडिलांसोबत मी काही हिंदी क्लासिक्स, जसे श्री
४२०, मुघल-ए-आझम, इन्सानियत (देव आनंद
आणि दिलीप कुमारचा एकमेव एकत्र चित्रपट) असे थिएटरमध्ये जाऊन बघितले होते, मात्र इंग्लिश क्लासिक बघण्याची ही पहिलीच वेळ होती. आता लक्षात येतंय,
हे चित्रपट दाखवणे म्हणजे आपल्या मुलाला चांगलं काय आहे ते समजले
पाहिजे हा वडिलांचा भाव असावा, एक प्रकारे त्यांच्याद्वारे
कळत नकळत केलेला संस्कारच होता तो.
त्यानंतर
खरंच चांगले इंग्लिश सिनेमे बघण्याची सवय लागली. सुदैवाने त्या वेळेस अलंकारटॉकीज
बरेच इंग्लिश क्लासिक चित्रपट लावत असे, मग
त्यातूनच त्याच ३-४ वर्षांत शाळेत असतानाच मित्रांसोबत
"बेन हर" बघितला, "टेन
कमांडमेंट्स" बघितला, "फॉर अ फ्यू डॉलर्स
मोर" किंवा "गुड बॅड अग्ली" सारखे काऊबॉय मुव्हीज बघितले, पण मनात घर केले ते काही युद्धपटांनी. त्यात "व्हेअर इगल्स
डेअर" आणि "फाईव्ह मेन आर्मी" हे दोन आठवणारे चित्रपट.
त्यातही "व्हेअर ईगल्स डेअर"मध्ये आमचा
फेव्हरेट काऊबॉय हिरो क्लिंट ईस्टवुड असल्यामुळे अधिक आकर्षण. हा चित्रपट होता
देखील प्रचंड वेगवान आणि अनेक वळणे घेणारा. पुन्हा दुसरे महायुद्ध,
जिथे गरुडदेखील जाऊ शकणार नाहीत असा एक कारागृहवजा
महाल आणि जर्मनीने पकडलेल्या एका हाय-प्रोफाइल अधिकाऱ्याला सही-सलामत परत आणण्याची
कामगिरी एका छोट्या तुकडीवर दिलेली. त्या चित्रपटातील कमीतकमी संवाद,
एकीकडे युद्धपटाप्रमाणे वेगवान अॅक्शन्स तर
दुसरीकडे मानसशास्त्रातील बुद्धिबळाचे डावपेच यांनी कुमारवयात मनाचा
ठाव घेतला नसता तरच नवल! शिवाय रिचर्ड बर्टन
तसेच क्लिंट ईस्टवुड सारखे कामाशी काम ठेवणारे कसलेले कलाकार. अजून एक गोष्ट मनात
ठसली ते म्हणजे त्या तुकडीचे प्रसंगावधान आणि परिस्थितीप्रमाणे निर्णय बदलण्याची
क्षमता.
त्यानंतर ३० वर्षांत
"ब्लॅक हॉक डाउन" किंवा "बिहाईंड एनिमी लाईन्स" सारखे
युद्धचित्रपटही प्रचंड आवडले, पण का कुणास ठाऊक "व्हेअर इगल्स
डेअर" हा एकदा बघितल्यावर त्या कुमारवयात मनात ठसला तो कायमचाच.
आता
हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी माझी आता नववीत असलेली मुलगी
धनश्री माझ्या मागे लागली की "उरी" हा चित्रपट बघायचाय म्हणून. मी हो
म्हटलं, पण केव्हा जाणार हा प्रश्न जवळजवळ दररोज विचारला जात होता.
मी कुतूहलापोटी विचारलं की इतकी काय घाई
आहे?
तर उत्तर मिळाले की त्यांच्या शाळेमध्ये मुलांचे सरळ सरळ दोन गट पडले आहेत,
"उरी" बघितलेले आणि न बघितलेले. आणि "उरी"
बघितलेले लोक न बघितलेल्या लोकांना दररोज चिडवतात. नागपुरातील काही शाळा आणि
शिकवणी वर्गांनी अख्खे शोज बुक करून मुलांना दाखवलेत म्हणे. मी रिव्ह्यू वाचला
होता पण तो "ठीक आहे"च्या दोन-अडीच स्टार्सच्या वर नव्हता. म्हणून मी
फार लक्ष घातले नव्हते. तसेही हिंदी युद्धपट म्हटले की माझ्या अंगावर काटा
येतो. एकतर आपल्याकडे युद्धपट बनवण्याची इच्छा किंवा क्षमता दोन्ही नाही. हिंदी
युद्धपटांची नावे सांगा म्हटल्यावर आमची गाडी "हकीकत" किंवा
"बॉर्डर"च्या पलीकडे जात नाही.
बरं फक्त युद्ध दाखवले किंवा घडलेल्या
घटनांचा आधार घेतला म्हणजे युद्धपट होतो असे नाही. "बॉर्डर"ची घटना खरी
असली तरीही खऱ्या लोकांनी "बॉर्डर" मध्ये सनी देवल करतो इतकी बडबड केली
असेल त्यावर माझा विश्वास नाही आणि सुनील शेट्टीने नक्की काय केले,
कॉमेडी केली की वीररस दाखवला हे त्यालाही माहिती नसेल. कमीतकमी
बोलून कामाशी काम ठेवणारा शेवटच्या ३-४ फ्रेम्समधला फायटर पायलट जॅकी श्रॉफ फक्त खरा वाटतो. हिंदीतल्या सर्वात
गाजलेल्या युद्धपटाची ही कथा. बाकी काय बोलायचे? त्यामुळे "उरी" हा हिंदी युद्धचित्रपट आहे आणि त्यात विकी कौशल
हा इतरत्र सहायक भूमिकेत दिसणारा नट हिरो आहे आणि फक्त मॉडेलिंग करणारी यामी गौतम
हिरोईन आहे म्हटल्यावर माझ्या विशेष अपेक्षा नव्हत्या. पण घरच्यांसोबत पुलंवरचा "भाई"
बघायला गेलो तर "उरी"च्या स्क्रीनला प्रचंड गर्दी दिसली. हळूहळू न्यूज
आर्टिकलवरूनही चित्रपट गाजतोय ते कळायला लागले आणि २-३ विश्वसनीय मित्रांनी प्रचंड
स्तुती केली त्यामुळे शेवटी सहकुटुंब बघितलाच, जो आवडला देखील.
२०१६
च्या उरीनंतरच्या सर्जिकल स्ट्राईकवरचा हा चित्रपट. गरजेपुरते संवाद,
हिरो-हिरोईनचे काही जमतेय किंवा त्यांचे बागेतले गाणे वगैरे असा
काही प्रकार नाही, सैनिकांची तुकडी शांतपणे आपले शत्रूला
मारायचे काम खूप डायलॉग न मारता पार पाडते. आता थोडं स्वातंत्र्य नक्कीच घेतलं आहे,
काही डायलॉग आता वायरल झाले आहेत (“हाऊ इज द
जोश” किंवा “ये नया इंडिया है, घर में घुसेगा भी और मारेगा भी” इत्यादी ), पण ते नसतील तर हिंदी चित्रपट चालणार कसे? थोड्या
एक-दोन इकडच्या तिकडच्या कथाही गुंफल्या आहेत ज्या नक्कीच वास्तवाला धरून
नाहीत,
पण या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर एक चांगला युद्धपट त्याला
म्हणता येईल. गम्मत म्हणजे हा चित्रपट बघताना मला "व्हेअर ईगल्स डेअर" आठवला, कारण या चित्रपटात ड्रोन
कॅमेरा यांत्रिक गरुडाच्या मागे लपवला होता जो शत्रूच्या गोटातली ("जहाँ कोई
पर भी नही मार सकता" कॅटेगरी जागेवरची) बित्तमबातमी गोळा करतो (हे पण दिग्दर्शकाचे स्वातंत्र्य
बहुधा). बाकी "उरी"ला
आतापर्यंतचा सगळ्यात चांगला हिंदी युद्धपट म्हणायला हरकत नसावी हा चित्रपट अजूनही चांगलाच चालतो आहे आणि
कदाचित २५० कोटींचा आकडा पार करेल. इनमीन ४० कोटी बजेटचा सिनेमा, एकही मोठा स्टार नसताना इतका चालणे हे सिनेमावाल्यांसाठी एक
आश्चर्य आहे. हा चित्रपट चालण्याची अनेक कारणे असावीत. सर्वात महत्त्वाचे "स्टोरी
वेल टोल्ड" आणि आजचे अद्ययावत तंत्रज्ञान वापरून केलेले त्याचे चित्रीकरण.
दुसरं म्हणजे हा युद्धपट आहे, याची पटकथालेखक तसेच दिग्दर्शकाला असलेली
जाणीव. तिसरं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे चित्रपटाचं अचूक टायमिंग.
निवडणूक तोंडावर आली असताना या चित्रपटाने नकळत कुठेतरी सर्वांच्या मनात एक तार
छेडली आहे आणि सध्याच्या सरकारची संरक्षणविषयक भूमिका अधोरेखित केली आहे.
रवींद्र केसकर
No comments:
Post a Comment