किस्से दुसऱ्या महायुद्धातील-११: जपानची शरणागती


पूर्वसूत्र:
दि. १६ जुलै १९४५ रोजी अमेरिकेने न्यू मेक्सीकोच्या लॉस अल्मोस ह्या ठिकाणी परमाणु अस्त्राचे सफल परिक्षण केले. दुसऱ्या दिवशी जर्मनीत पॉटसडॅम Potsdam येथे युद्धोत्तर वाटाघाटींसाठी सुरू झालेल्या परिषदेत राष्ट्रपती ट्रूमन ह्यांनी ही बातमी दोस्त राष्ट्रांच्या इतर नेत्यांना दिली. वरील परिषदेत जपानशी सुरू असलेल्या युद्धाबद्दल चर्चा झाली व त्या राष्ट्रास, २६ जुलै १९४५ रोजी, विनाअट व संपूर्ण शरणागतिचे आवाहन करण्यात आले. इकडे दोस्तांच्या सैन्याने ज. मॅकआर्थरच्या नेतृत्वाखाली फिलीपीन्सला मुक्त करून प्रशांत महासागरातील एकेक बेट काबीज करीत जपानच्या जवळील सागराचा ताबा मिळवीला होता. जपानच्या मुख्यभूमीवर सागरी चढाई केल्यास त्या देशाचा प्रतिकार अत्यंत कडवा असेल व अशा निर्णायक लढाईत दोन्ही बाजूंचे लाखो सैनिक हताहत होतील ह्या गोष्टीची पूर्ण कल्पना दोस्तांच्या नेत्यांना व सेनापतींना होती.



जपानला पुढे वाढून ठेवलेल्या अनर्थाची कल्पना देण्यासाठी, दि. मार्चच्या रात्रीपासून टोकियोवर सुरू झालेल्या बॉम्बवर्षावात ४८ तासांत एक लाख नागरिक मारले गेले. दहा लाख बेघर झाले व शहराचा ४१ वर्गकिमीचा परिसर पूर्णपणे नष्ट झाला. तथापि जपान्यांच्या मनोबलावर ह्या संहाराचा काहीही परिणाम नाही झाला. आतां राष्ट्रपती ट्रूमन धर्मसंकटांत सापडले. परमाणु अस्त्र वापरल्यास होणाऱ्या परिणामांची पूर्ण कल्पना त्यांच्या सल्लागारांना पण नव्हती. आणि ते वापरून पारंपारिक युद्धात अटळ असलेली सैनिक हानी टाळण्याऐवजी, इतका प्रचंड वेळ, मनुष्यबळ व साधनसामग्री खर्चून मिळवलेले अस्त्र न वापरल्याबद्दल देश आपल्याला कधीच क्षमा करणार नाही हे पण त्यांना माहित होते. सरतेशेवटी परमाणु अस्त्र वापरण्याचा निर्णय घेण्यात आला व त्या प्रमाणे दि. ६ आणि ९ ऑगस्टला हिरोशिमा व नागासाकीवर ते टाकण्यात आले ज्यात क्षणार्धात, अनुक्रमे ८०,००० व ४०,००० लोक दगावले. आता मात्र जपानच्या सम्राटांनी हस्तक्षेप करून ताबडतोब शरणागती पत्करून, त्वरित युद्ध थांबण्याचे आदेश आपल्या नेत्यांना दिले.



शरणागती :
दि. १५ गस्ट १९४५ हा दिवस शस्त्रसंधिसाठी निश्चित करण्यांत आला. त्यामुळेच भारताला पण दोन वर्षांनी त्याच दिवशी स्वातंत्र मिळावे असा आग्रह लॉर्ड माउंटबॅटन ह्यांनी धरला होता कारण जपानच्या शरणागतिच्या वेळेस ते दोस्तांचे सरसेनापति होते. शरणागतीद्वारे जपानवर अत्यंत जाचक अटी लादण्यात आल्या. त्यांचे अधिकार क्षेत्र काही द्विपांपुरतेच मर्यादित ठेवण्यात आले व त्यांच्या नेत्यांवर युद्धगुन्हेगार म्हणून खटले चालवण्याचे निश्चित करण्यात आले. जपानच्या सम्राटांवर सुद्धा खटला चालवावा असा पण एक मतप्रवाह होता. पण जपानी नागरिक त्यांच्या सम्राटांना देव मानत असल्यामुळे, तशी अट घातल्यास ते शस्त्रसंधिस कधीच मान्यता देणार नाहीत, हा साक्षात्कार झाल्यामुळे, तो विचार फेटाळण्यात आला.

ह्या रणसंग्रामाच्या तोफा जरी आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या बरोबर दोन वर्षे आधी थंडावल्या तरी जपानच्या शरणागतिच्या मसुद्यावर सह्या दि. २ सप्टेंम्बर १९४५ रोजी, अमेरिकेच्या USS Missouri ह्या युद्धनौकेवर झाल्या व विसाव्या शतकांतील सगळ्यात संहारक युद्धावर पडदा पडला.


उपसंहार:
द्वितीय महायुद्धाच्या सांगतेला ह्या महिन्यात पाण शतक, ७५ वर्षे पूर्ण होत आहे. मागे वळून पाहिल्यास ह्या समराने मानवी जीवनाच्या बहुतांशी बाबींवर आपला कायमस्वरूपी ठसा उमटविलेला दिसतो. ह्या युद्धाद्वारे परमाणु शक्तिचा उदय झाला, ज्याची तुलना बाष्प किंवा विद्युत शक्तिच्या शोधाशीच करता येऊ शकते. ह्या युद्धात वापरलेले V-2 अग्णिबाण म्हणजे, पुढील दशकांमध्ये विकसित झालेले आणि अवकाशांत उपग्रहांची भरारी व मानवाचे चंद्रावर पदार्पण शक्य करणाऱ्या महाकाय अग्णिबाणांचे पूर्वज होत. त्यांचा विकास, वर्नर वॉन ब्रॉन इत्यादि जर्मन तंत्रज्ञांच्या मदतीनेच, अमेरिका व रशिया यांनी करून घेतला.

चिकीत्सा क्षेत्रात पेनिसिलीन ह्या प्रथम प्रतिजैविकाची व्यापारिक स्तरावरील निर्मितीबद्दल प्रगती ह्या महायुद्धाच्या काळातच केम्ब्रिज विश्वविद्यालयात झाली. काही वर्षे ते औषध फक्त सैनिकांवर वापरण्यासाठी राखून ठेवलेले होते. प्लास्टीक सर्जरीतील प्रगतीसाठी सुद्धा युद्धात जायबंदी झालेल्या सैनिकांवरील उपचार कारणीभूत ठरले.

द्वितीय महायुद्धामुळे वसाहतवादाला कायमची मूठमाती मिळाली. भारतासकट आशिया व फ्रिकेतील बहुतांशी देशांनी पारतंत्र्याचे जोखड झुगारून दिले. ब्रिटीश साम्राज्यावरील सूर्य, एकदाचा मावळला.

ह्या समराचा सर्वाधिक परिणाम अर्थातच युरोपीय समाजावर झाला. एक संपूर्ण पिढी काही दशांशांनी घटली. आज सुद्धा तेथील बहुतांशी घरांच्या दिवाणखान्यात गणवेश घातलेल्या तरूणाचा फोटो दिसतो. स्वित्झर्लंडमधील लहानांहून लहान गावांमधे व इतर देशांमधील गावांमधे प्रामुख्याने दिसणारा फरक म्हणजे, अशा सर्व गावांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले, त्या गावांतील युद्धात कामी आलेल्या नागरिकांची नावे लिहीलेले, स्मारक होय. ह्या महायुद्धापासून महिलांनी घराच्या चार भिंती लांडून, मोठ्या संख्येने अर्थाजनाच्या क्षेत्रात पदार्पण केले.

अंतत:, खालील विचार आपणांस अंतर्मुख होण्यास भाग पाडतो. द्वितीय महायुद्धाचा प्रारंभ एका देशाची, पोलंडची, स्वायत्तता टिकविण्यासाठी झाला. २०७५ दिवसांत ६,००,००,००० मनुष्यप्राण्यांचा बळी घेउन जेंव्हा ते समाप्त झाले तेंव्हा, एकाच्या जागी आठ देश, पूर्व जर्मनी, पोलंड, रूमेनिया, बल्गेरिया, हंगेरी, आस्ट्रिया, झेकोस्लोवाकिया आणि अल्बानिया, ह्यांचे सार्वभौमत्व धोक्यात येउन ते सोव्हियत यूनियनच्या वर्चस्वाखाली, पोलादी पडद्यामागे लुप्त झाले, शस्त्रस्पर्धा आणखीनच वाढली व जगाला शांततेसाठी, बर्लिनची भिंत ढासळण्याची (९ नोव्हेंबर १९८९) वाट पहावी लागली. युद्ध हे कोठल्याही समस्येचे उत्तर नाही हेच पुन्हा खरे ठरले.


दिलीप कानडे

ता.: ह्या लेखा द्वारे "किस्से द्वितीय महायुद्धाचे" ही माझी लेखमाला समाप्त करत आहे. आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. संपर्कासाठी खालील मेलवर उपलब्ध आहे.


No comments:

Post a Comment