किस्से दुसऱ्या महायुद्धातील- भाग १०


हीरू ओनोडा

तो एकोणतीस वर्षे जास्त लढला. द्वितीय महायुद्ध २ सप्टेंबर १९४५ ला जपानच्या औपचारिक शरणागती नंतर समाप्त झाले. पण लेफ्ट. हीरू ओनोडासाठी ते पुढील २९ वर्षे सुरूच राहिले. त्याचीच ही कथा आहे.

एका शिक्षकाचा मुलगा असलेल्या हीरूचा जन्म १९ मार्च १९२२ साली कैनान ह्या गांवी झाला. १९३९ ला शालेय शिक्षण संपवून त्याने जपानी सैन्यात प्रवेश घेतला. त्याने सैन्य हेरगिरीच्या विद्यालयातून प्रशिक्षण घेन लेफ्टनंटचा हुद्दा मिळविला. १९४४ च्या डिसेम्बर महिन्यात त्याची नेमणूक लुबांग नावांच्या, मनिला पासून ९० मैलांवर असलेल्या, एकाकी बेटावर झाली.

Hiroo Onuda - तेव्हा
त्याच्या दोन महिने आधीपासूनच अमेरिकन जनरल डग्लस मॅक्आर्थरच्या सैन्याने फिलीपीन्सच्या एकेका बेटावर ताबा मिळवणे सुरू केले होते व मार्च १९४५ मधे त्यांनी राजधानी मनिलाला मुक्त केले. ओनोडा बरोबर आणखीन काही सैनिक भूमिगत झाले व त्यांनी गनिमी युद्ध चालूच ठेविले. पुढे काही वर्षांनी त्यातील एक सैनिक शरण आला व उरलेल्यांना फिलीपीन्सच्या पोलीसांनी एका चकमकीत ठार केले. त्यामुळे अजून युद्ध चालूच आहे ही ओनोडाची समजूत आणखीनच घट्ट झाली.

अजून काही वर्षे गेल्यानंतर ओनोडाच्या परिवाराने त्याला ध्वनिक्षेपकाच्या व विमानातून टाकलेल्या पत्रकांद्वारे, "आता युद्ध संपले आहे व तू आता शरण ये" हे समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काही परिणाम नाही झाला. सरतेशेवटी, फेब्रु. १९७४ ला ओनोडाच्या मागावर असलेल्या, नोरियो सुझुकी नामक जपानी तरूणाशी त्याची भेट झाली. ह्या भेटीचा सुद्धा ओनोडावर काही परिणाम झाला नाही, "जोवर माझे वरिष्ठ मला आदेश देत नाही तोवर मी युद्ध चालूच ठेवणार" असे त्याने  स्पष्ट केले.

त्याचा निरोप घेन सुझुकी टोकियोला आला. आता ओनोडाच्या वरिष्ठांची, मेजर योशिमी तानीगुचीची, शोधाशोध सुरू झाली. तो आता एक पुस्तकविक्रेता म्हणून काम करत होता. तानीगुचीला लुबांग बेटावर नेण्यात आले. त्याच्या समोर, आपली रायफल घेउन ओनोडा उभा राहिला. तानीगुचीने जपानी सैंन्याने शरणागती पत्करल्याचा जाहीरनामा वाचून दाखविला. ओनोडाने कडक सॅल्यूट  करून, आपण २९ वर्षे करत असलेल्या कामगिरीचा रिपोर्ट दिला व मगच, आपली व्यवस्थित चालू असलेली रायफल खाली ठेविली.

त्यानंतर लगेचच ५२ वर्षांच्या हीरू ओनोडाने आपली, सामुराई तलवार फिलीपीन्सचे राष्ट्रपति मार्कोस ह्यांना अर्पण केली. त्यांनी ओनोडाला क्षमा केल्याचे प्रतीक म्हणून त्यांस ती परत केली व अशा प्रकारे एकदाचे, दुसरे महायुद्ध समाप्त झाले.

Hiroo Onuda -नंतर
आपल्या देशात परतल्यावर ओनोडाचे, त्याच्या नावांप्रमाणे, एखाद्या हीरोसारखे स्वागत झाले. त्याला बघायला विमानतळावर हजारो लोकांनी गर्दी केली. त्याच्याबद्दल, जपानच्या तत्कालीन प्रधानमंत्री केकुई तनाका यांनी जाहीररीत्या गौरवोद्गार काढले.




पुढे, १९७६ मध्ये ओनोडानी, ३८ वर्षांच्या, माची ओनुकीशी विवाह केला व त्या दोघांनी जंगलात कसे तग धरून रहावे ह्याचे तरूणांना प्रशिक्षण देणारी संस्था चालविली. हीरू ओनोडाचे निधन २०१३ मध्ये, वयाच्या ९१ व्या वर्षी टोकियोतल्या एका इस्पितळात झाले.


डॉ.दिलीप कानडे


संदर्भ व छायाचित्रे:
1. विकीपीडीया
2. Second World War by Martin Gilbert.

No comments:

Post a Comment