आयुष्याचा
बराच भाग डॉक्टरकी केलेले हे गृहस्थ मला त्यांच्या मेडिकल कॉलेजमधल्या आठवणी सांगत
होते. मी ही उत्साहाने ऐकत होते, “कोणी झोपलेला असला की त्याला उठवायचं नाही, असा अलिखित
नियम होता आमच्याकडे. कोण कुठली शिफ्ट करून आलं असेल, कशी केस करून दमलं असेल काही
सांगता येत नाही. आणि तातडीच्या सेवेला त्या व्यक्तिला (डॉक्टरला) उठवावं लागतंच. पण
इतर कुठल्याही कारणास्तव उठवायचं नाही हे ठरलेलं, अगदी जेवायला सुद्धा. कारण जेवणाच्या
आधी झोपेचा नंबर लागतो. झोप पुरेशी नसली की शरीराची सिस्टिमच खलास!”
माझ्या मनात
असं आलं की हाच नियम आपण सामान्य आयुष्यात का वापरत नाही? खूप दमून भागून झोपलेले असलो
की झोप पूर्ण झाल्यावर भुकेची जाणीव होऊन माणूस जागा होतोच. आता ती वेळ जेवणाची नसेल
कदाचित. पण घरात राहात असलो तर अन्न झाकून (आणि आता तर फ्रिजमध्ये) ठेवताच येतं. अशा
क्वचितच जागा असतील जिथे अवेळी काही खायला मिळणार नाही म्हणून आहे तेव्हा उठून जेवून
घ्यायची गरज असेल.
पण समाज म्हणून आपण
झोपेला खूप कमी दर्जा देतो. झोप आणि आळस यामध्ये गफलत करतो. जास्त झोपेची गरज असलेल्या
माणसाला कमी लेखतो. हीणवतो. लोकं काय म्हणतील म्हणून आपली घेतलेली झोप दडवतो. म्हणजे
नीट झोपलेल्या माणसाला उठल्यावर विचारलं तर तो म्हणतो, “झोपलो नव्हतो, पडलो होतो. जरा
डोळा लागला. पाच मिनिटंपण झोप लागली नाही.”
त्यात स्त्रीने
तर अजिबातच झोपायचं नसतं. सगळे झोपायला गेल्यावर झोपायचं आणि सगळे उठायच्या आधी उठायचं.
हा काळ आता शहरात मागे पडत असला तरी एकत्र कुटुंब, लहान घर, गावाकडे हे चित्र काही
अजून पूर्ण पुसलं गेलं नाहीए. बाळंतीणीला पहिल्या सव्वामहिन्यात कश्शाला हात लावू न
देणारी कुटुंबं नंतर मात्र तिच्याकडून पूर्ण कामाची अपेक्षा करताना दिसतात.
एकत्र कुटुंबातल्या
एक बाई त्यांच्या सुनेबद्दल सांगत होत्या. सुनेला दोन मुलं. दोन्ही लहान लहान. त्या
बाईंचं म्हणणं होतं, “तिच्या दोन पोरांचं, तिच्या नवर्याचं आणि स्वयंपाकाचं तर तिला
पाहायलाच लागेल ना!” हे सगळं त्या आईनं पाहिल्यावर अजून काय पाहायचं राहिलं होतं. त्या
घरात स्त्रीने नोकरी करणं अपेक्षित नव्हतं एवढीच काय ती समाधानाची गोष्ट. नाहीतर नोकरीही
करायची, मुलंही सांभाळायची, नवर्यालाही सांभाळायचं आणि स्वयंपाकही करायचा, हे सगळं
कुठल्याही मदतीशिवाय!
आपल्या रात्री
झगमगत्या होण्यापूर्वीपर्यंत म्हणे लोकं दोन टप्प्यात झोपायचे! करणार काय, काही करायला
पुरेसा उजेडच नव्हता ना! आणि या दोन टप्प्यांच्या मध्ये २-३ तासाच्या जागेपणात शांतपणे
करता येण्यासारख्या, प्रार्थना, ध्यान धारणा, हळू हळू गप्पा अशांसारख्या गोष्टी करायचे.
एडीसनला जर ह्याची कल्पना थोडीतरी आली असती तरीही त्याने विजेचा शोध लावण्यापूर्वी ९९९ वेळा विचार केला असता. आणि अगदीच नाही तर लावताना त्याबरोबर ‘डिसक्लेमर’ जोडला असता, ‘कुठल्याही कारणास्तव सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी
विजेचा वापर करण्यात येऊ नये. केलेला आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.’
झोपेला कमी
लेखणं कसं सुरू झालं असेल ह्याचं मूळ काही मला आत्ताच्या घडीला सापडलं नाहीए पण हे
असं कमी लेखणं लहान मोठ्या सगळ्यांना सारखंच हानिकारक ठरतंय हे मात्र खरं. कमी झोपेमुळे
मनावरचा आणि शरीरावरचा ताण वाढतोय, वेगवेगळे आजार जडताहेत ज्यांची उकलही होत नाहीए.
खरंतर मोठ्या
माणसांना आपापल्या झोपेची गरज स्वतःला तरी ठाऊक असते. (आणि अजूनही जर
कळली नसेल तर
एकदा असं करून बघा की कुठल्याही प्रकारे गजर न लावता आणि कोणीही न उठवता किती झोपता
याचं निरीक्षण करा. काही दिवसांतच तुमची खरी गरज किती आहे हे तुम्हाला सापडेलंच.) तेव्हा
झोपेला पूर्ण न्याय देऊन झाल्यावर राहिलेल्या तासामध्ये वैयक्तिक वेळ, कुंटुंबाचा वेळ
आणि कामाचा वेळ अशी विभागणी करायला हवी. सगळ्यांनी आठ, दहा, बारा ... तास काम करायलाच
हवं असा अट्टहास कशाला? पैश्याच्या शर्यतीत कोणीच कधीच जिंकत नाही. अगदी जगातला सगळ्यात
श्रीमंत माणूसही आनंदी असेल याची शाश्वती नाहीच ना! त्यापेक्षा समाधान आणि आनंदाच्या
शर्यतीत उतरलो तर! ती शर्यत स्वतःशीच असते.
Source : Google |
source: Google |
याविषयीचा
एक शास्त्रीय अभ्यास खूप बोलका आहे. क्ष अक्षावर आनंद आणि य अक्षावर पैसा असं ठेवलं
तर सुरूवातीचा ग्राफ चढता असतो. पण पुढे मात्र पैसा कितीही वाढला तरीही आनंद वाढत नाही
आणि त्यापुढे तर चक्क पैसा वाढला की आनंद कमीच होतो.
आता तुम्ही
म्हणाल की असं जर झोपू दिलं तर लोकं फक्त झोपूनंच राहतील. हे काही खरं नाही. झोप पूर्ण
झाल्यावर झोपून राहायला लागलं तर ते शिक्षेपेक्षा काही कमी नसतं. कुठलाही प्राणी गरजेपेक्षा
जास्त झोपू शकत नाही आणि गरजेहून कमी झोपेवर जगू शकत नाही. माणूसच तो, असे सगळे बदल
करणारा! एवढंच नाही तर झोपेचं हे समाजशास्त्र नवजातांनाही लागू करणारा! झोपलेलं बाळ
एवढं गोड दिसतं की त्याला उठवावसं कसं वाटू शकतं? पण वेगवेगळ्या कारणांसाठी आपण त्यांना
उठवतो. आपल्या झोपेच्या वेळा टिकवून ठेवण्यासाठी त्यांना झोपेतून उठवणं कितपत योग्य
आहे? झोपेतून मुद्दाम उठवल्यामुळे किरकिरी झालेली बाळं तुमच्या परिचयाची आहेत ना! अनावर
झोप आलेली असताना झोपू न देणार्या आया, आज्ज्याही भेटतात, अधूनमधून. का तर, आत्ता
झोपला तर मग जागवशील सगळ्यांना! हे खरंय की बाळ जागं म्हणजे एका मोठ्या व्यक्तिला
(साधारणपणे आईला) जागं राहणं भाग आहे. पण कुठलंच बाळ हे मुद्दामहून करत नाही हे का
आपल्याला कळत नाही. झोप आलेली नसताना डोळे मिटून पडून राहाणं आणि आलेली असताना जीवाला
ताणणं हे फक्त मोठी माणसंच करू जाणे.
त्यात भर
म्हणजे जन्माला आलेलं बाळ आणि प्रौढ माणसं यांच्या झोपेत मुळातूनच फरक असतो. आणि हा
बदल सतत घडत बाळं मोठी होत असतात. हा फरक, हा बदल आपल्या लेखीही नसतो आणि आपण त्यांच्यावर
आपल्यासारखंच किंवा आपल्या सोयीने झोपणं लादत असतो. आपलं बाळ त्याच्या गरजांसाठी आपल्यावर
पूर्णपणे अवलंबून आहे. त्याचं हे परावलंबन आपण तेव्हाच मान्य करून बसलो आहे जेव्हा
आपण स्वतःहून ठरवून बाळ जन्माला घातलंय. तेव्हा झोपू द्या रे बाळाला आणि बाळाच्या आईलाही...!
No comments:
Post a Comment