बस अगदी सुटता सुटता पकडली. पुढच्या दारातून चढल्यामुळे कंडक्टर, ड्रायव्हर, आणि गर्दीचा भाग असूनही
गर्दीचा त्रास होणारे काही प्रवासी वैतागले. मी मागे सरकायचा प्रयत्न केला. एक वेळ
सुनामीच्या लाटेविरुद्ध पोहता येईल, पण मुंबईच्या बसमधे
गर्दी विरुद्ध जाणं? मुश्कील ही नहीं, नामुमकीन
है. मग तिथेच उभा राहून आजूबाजूला नजर टाकली. कानात इयर फोन घातलेल्या, फोनवरून बोटं फिरवणाऱ्या, निर्विकार चेहऱ्यांच्या
गराड्यात अडकल्याचं लक्षात आलं. त्यात एक कॉलेजचा ग्रुप होता, पण त्यातले ही सगळे आपापल्या फोनवर बिझी होते. आम्ही कसे गाण्याच्या
भेंड्या खेळत जायचो हे आठवलं. अचानक त्या परक्या वाटणाऱ्या गर्दीत काहीतरी वेगळं,
सुखद असं नजरेस पडलं.. वाऱ्यावर फडफडणारं एक पुस्तक.. आणि त्यामागे,
पुस्तकावर डोळे खिळलेला एक सुंदर चेहरा. खरंच, कॉलेजमधले थोर विचारवंत, सुंदर मुलींना
"हरियाली" का म्हणायचे हे आज मज
पामराला कळलं.
ती कुठली तरी इंग्लिश कादंबरी वाचत होती. बहुतेक रोमँटिक स्टोरी असावी, कारण वाचताना ती लाजून हलकंसं हसत होती.. मधेच खिडकीबाहेर आकाशात पाहून पुन्हा स्वतःशी हसत होती. परत कादंबरीत शिरत होती. खिडकीतून आत येणारा वारा तिच्या केसांची आणि पुस्तकांच्या पानांची एकाच वेळी छेड काढत होता. पण ती त्या दोघांनाही सहजतेने सावरत होती.
तिच्यासमोरची सीट रिकामी होतेय हे पाहून मी शर्थीच्या प्रयत्नांनी ती सीट पटकावली. तेवढ्यात वाऱ्याने दगा केला. तिच्या पुस्तकातून बूकमार्क उडाला आणि माझ्या पायाशी पडला. मी तो उचलून तिला दिला, आणि संधीचा फायदा घेऊन काहीतरी बोलावं म्हणून "It is so good to see someone reading a book in such a noisy crowded place. You inspired me." - असं म्हणालो. ती माझ्याकडे कपाळाला आठ्या घालून पाहत राहिली.
माझं वाक्य संपल्यावर हसली आणि पुन्हा कादंबरीत शिरली. त्या कादंबरीच्या कथेतल्या सगळ्या छटा आता तिच्या चेहऱ्यावर उमटत होत्या. "एखादा चेहरा इतका बोलका कसा असू शकतो?"- मी हा विचार करतोय तोच तिच्या शेजारी बसलेल्या मुलीने तिच्या हातून कादंबरी खेचून घेतली, आणि काही खाणाखुणा केल्या. हीने ही काही खुणा केल्या. दोघी उठल्या, आणि आपल्या खुणेच्या भाषेत बोलत बोलत बसमधून उतरल्या...
काही गोष्टी सुरु होण्याआधीच अर्धवट राहून जातात. आज ही मी त्या बसमधे तो
बोलका चेहरा शोधतोय. आणि ती दिसल्यास तिला काय आणि कसं सांगायचं हा विचार करतोय.
मानस
(अर्धवट राहिलेल्या गोष्टींना समर्पित)
No comments:
Post a Comment